कुडाळमधल्या तन्वीची महाराष्ट्रभर हवा, कमी कालावधीत मिळवलं प्रेक्षकांच्या मनात स्थान!

शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी या दोन तगड्या अभिनेत्यांसमोर तितकाच तोलामोलाचा अभिनय करत तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. 'पाहिले न मी तुला' या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीत मिळवलेल्या यशाचा आनंद तन्वीनं 'नवराष्ट्र'सोबत शेअर केला.

    ‘ईच्छा तेथे मार्ग’ असं आपण नेहमीच म्हणतो, पण काहींनी हे सार आपल्या जीवनात उतरवत यश मिळवलं आहे. कोकणच्या लाल मातीत जन्मलेल्या तन्वी मुंडले या मुलीनंही केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपली स्वप्नं साकार केले आहे. मराठी रंगभूमीशी आपली नाळ जोडत तन्वीनं आज मालिका विश्वाच्या आकाशात गरुडभरारी घेतली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत ती महाराष्ट्रासोबतच जगभर पसरलेल्या मराठी माणसांच्या घरात पोहोचली आहे. शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी या दोन तगड्या अभिनेत्यांसमोर तितकाच तोलामोलाचा अभिनय करत तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीत मिळवलेल्या यशाचा आनंद तन्वीनं ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला.

    तन्वी मुंडलेच्या रूपात कोकणचं आणखी एक कन्यारत्न मालिका विश्वाच्या तारांगणात चमकू लागलं आहे. घरी कोणतीही अभिनयाची परंपरा नसताना तन्वीचा आजवरचा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आणि अभिनयासाठी स्ट्रगल करणाऱ्या तरुणाईला प्रेरणादायी असाच आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीच्या श्रीगणेशाबाबत तन्वी म्हणाली की, मी सिंधुदुर्गमधील कुडाळमधली असून, वडील बँकेत नोकरीला, तर आई गृहिणी आहे. ग्रॅज्युएशन कुडाळमध्ये आणि मास्टर्स पुण्यात केलं आहे. मागील सहा वर्षांपासून थिएटरमध्ये काम करतेय. कोकणात बाबा वर्दम थिएटर ग्रुपच्या माध्यमातून नाटकात अभिनयाची कारकिर्द सुरू झाली. कॅालेजमध्ये असताना पुरुषोत्तम, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला. ललित कला केंद्रामध्ये नाट्यशास्त्रामध्ये मास्टर्स केलं आहे. मागच्या वर्षी पास झाले आणि त्यानंतर प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘कलरफुल’ या चित्रपटात काम केलं आहे. डिसेंबरमध्ये शूट पूर्ण झालेला हा सिनेमा लवकरच रिलीज होईल. त्यानंतर लगेचच मला ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेची आॅफर मिळाली.

    तन्वीनं हौशी रंगभूमीसोबतच माधव अभ्यंकरांच्या ‘घाशिराम कोतवाल’चे बेळगावमध्ये दोन प्रयोग केले आहेत. अभिनयाची गोडी लागण्याबाबत आणि मालिकेच्या आॅफरबाबत तन्वी म्हणाली की, युथ फेस्टिव्हलपासून खऱ्या अर्थानं माझ्या अभिनयाला सुरुवात झाली. तिथं केलेलं स्कीट मुंबई युनिर्व्हसिटीला फायनलसाठी सिलेक्ट झालं. त्यामुळं आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेत थेट लीडमध्ये काम करण्याची संधी लाभली. आमच्या थिएटर ग्रुपनं विश्वास दाखवला आणि हौशी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी रौप्य पदक मिळालं. कुटुंबियांचाही पाठींबा होता. त्यामुळं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर अभिनयाकडेच वळण्याचा निर्णय घेतला. आमच्या मालिकेचे एचओडी प्रवीण भोळे सर यांनी आॅडीशन्स नेहमी सुरू असल्याचं सांगितलं होतं. मालिकेत काम करायची इच्छा असेल तर आॅडीशन दे असं ते म्हणाले होते. त्यानुसार मी आॅडीशन पाठवलं. त्यावेळी लाॅकडाऊन असल्यानं घरातूनच मोबाईलवर शूट करून पाठवलं. महिन्याभरानंतर त्यांनी कॅाल करून आणखी वेगवेगळ्या मूडसमधील आणि कॅरेक्टर्समधील आॅडीशन्स मागवल्या. मी चार-पाच आॅडीशन्स करून पाठवली. माझी पहिलीच मालिका असल्यानं मुलाखत घेऊन त्यांनी सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि माझी निवड झाली.

    … तरी माझा विश्वास नव्हता

    झी मराठी वाहिनीवरील सर्व मालिका मी लहानपणापासून आवडीनं पहात आले आहे. आॅडीशन देत असताना आपल्याला झीसोबत काम करायला मिळेल असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मी केवळ आॅडीशन्स देत होते. झीवरील मालिकेत लीड म्हणून आयुष्यात काम करण्याची संधी मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. त्यामुळं प्रोमो शूट होऊन आॅन एअर गेला तरी माझा विश्वास बसत नव्हता. मी खरंच या मालिकेत आहे? असंच काहीसं फिलींग होतं. महेश कोठारेसरांचं प्रोडक्शन असल्यानं काम करताना एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याचा आनंद मिळत आहे. तीन वर्षे अभ्यास करून मगच अभिनयाकडं वळण्याचा घेतलेला निर्णय सार्थकी लागल्यासारखं वाटलं. या मालिकेचं दिग्दर्शन करणाऱ्या मनीष खंडेलवाल यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत आहे.