अमृताला लागली ‘संसाराची’ गोडी

नव्या मालिकेचं औचित्य साधत 'नवराष्ट्र'शी संवाद साधताना अमृतानं मालिका आणि आपल्या व्यक्तिरेखेविषयी सांगितलं.

  नव्या नात्यांच्या गाठी बांधत झी मराठीवर नवनवीन मालिका सुरू होत आहेत. यापैकीच एक आहे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’… ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत झळकलेली अमृता पवार या मालिकेत आजच्या युगातील तरुणी बनली आहे. नव्या मालिकेचं औचित्य साधत ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना अमृतानं मालिका आणि आपल्या व्यक्तिरेखेविषयी सांगितलं.

  काही कलाकारांचा स्ट्रगल नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असतो. रत्नागिरीतील संगमेश्वरजवळ असलेल्या नायरी गावची मूळ रहिवासी असलेली अमृता आज छोट्या पडदा गाजवत आहे. मुंबईत जन्मलेल्या अमृताच्या फॅमिलीत दूरवर कोणीही अभिनयात नाही. असं असूनही अभिनयाकडं वळण्याबाबत अमृता म्हणाली की, बालपणापासून मी एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हीटीजमध्ये भाग घ्यायचे. डान्ससोबत स्पोर्टस आणि वर्क्तृत्व स्पर्धांमध्ये आवड म्हणून सहभागी व्हायचे. तिथे केलेल्या कामाचं कौतुक झाल्यानं त्याची गोडी लागली. स्पर्धांसाठी नाटक बसवण्याची प्रोसेस आवडू लागली. आमच्या संस्कृतच्या शिक्षीका रजनी वेलणकरमॅडम स्पर्धांसाठी नाटकही बसवायच्या. शाळेत असताना त्यांच्या नाटकात काम केलं होतं. नाटकात साकारलेल्या व्यक्तिरेखेचं कौतुक झाल्यानंतर आपण हे पुढेही करायला हवं असं वाटलं. आई-बाबांची साथ होती. कॅालेजमध्ये गेल्यावर स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. कॅालेजच्या शेवटच्या वर्षातच ‘दुहेरी’ मालिका मिळाल्यानं अभिनयात करियर करायचं ठरवलं.

  ‘ललित २०५’ आणि ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकांनंतर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’मध्ये काम करण्याबाबत अमृता म्हणाली की, प्रोमो पाहिल्यानंतर लोकांची एक्साइटमेंट वाढली आहे. स्टोरीवाईज खूप डिफरंट मालिका आहे. मुलाकडची फॅमिली खूप मोठी असल्याचं प्रोमो पाहिल्यावर समजतं. अशा प्रकारची स्टोरी असल्याचं सांगण्यात आल्यावर मला ती खूप आवडली. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. कॅान्सेप्टच मला खूप भावली. एकत्र कुटुंबात कसं वातावरण असतं हे या मालिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकू. या मालिकेत मी साकारलेली तरुणी गर्दी बघितली की घाबरते. तिचं प्रेम असलेल्या मुलाची खूप मोठी फॅमिली आहे. त्यामुळं पुढं तिच्या आयुष्यात काय घडणार आणि या सर्वांतून ती आपला संसार कसा उभारणार ही स्टोरीलाईन उत्सुकता वाढवणारी होती. हि स्टोरी जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, तेव्हा त्यांनाही ती जवळची वाटेल. एकत्र कुटुंबातील गंमत काय असते, मोठ्या कुटुंबात आल्यानंतर तिला कशा प्रकारे बदल करावे लागतात हे हळूहळू उलगडत जाईल. याच कारणामुळं या मालिकेसाठी होकार दिला.

  श्रीमंत घरातील अदिती
  ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत मी अदिती हे कॅरेक्टर साकारत आहे. श्रीमंत घरातील असल्यानं ही ऐशोआरामात वाढलेली आहे. काही कारणांमुळं माणसं आजूबाजूला असली की तिला भीती वाटते. हा तिचा काहीसा वेगळा स्वभाव आहे. ज्या माणसांना तिनं आपलंसं म्हटलंय, त्यांच्यासाठी ती काहीही करू शकते हा तिच्या स्वभावातील प्लस पॅाईट आहे. सिद्धार्थवर ती प्रचंड प्रेम करतेय. त्याच्यासाठी काहीही करू शकते. सिद्धार्थवरील प्रेमासाठी ती माणसांबाबतची भीती बाजूला सारून त्याचा स्वीकार करेल का या प्रश्नाचं उत्तर मालिकेत मिळेल. अदितीला अमेरिकेत सेटल व्हायचं आहे. तसाच प्लॅन सिद्धार्थचाही आहे. आता हे दोघं आपली स्वप्नं साकार करतील की एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा पुढे नेतील हे पहाणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. या मालिकेत वेगवेगळ्या छटा आहेत.

  मी तो काळ मिस करतेय
  अमृता म्हणून मी एकत्र कुटुंब पद्धती कधी अनुभवली नाही, पण खूप एन्जॅाय करते. मला एकत्र कुटुंब आवडतं. अशा एखाद्या कुटुंबात जाण्याचा योग आला की मी त्यांच्यासोबत वेळ घालवते. गप्पा मारते. माझ्या अनुभवाबाबत सांगायचं तर शाळेला पूर्वी ठराविक सुट्ट्या असायच्या. या सुट्ट्यांमध्ये गणपती आणि होळीच्या सणांसाठी आम्ही गावी जायचो. गणेशोत्सवाला आम्ही सगळे नातेवाईक गावी भेटायचो. एकत्र ट्रॅव्हल करायचो, गावी जायचो, तिथं मोठ्या आनंदात रहायचो. तो काळ माझा खूप आवडता होता. आज मी तो काळ मिस करतेय. त्यावेळीही कधी एकदा गणपती येतात याची वाट बघायचे. सगळे एकत्र भेटायचो, एकत्र कामं करायचो, एकत्रच जेवायचो, त्यानंतर गप्पा मारायचो. त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धती मी खूप एन्जॅाय करते. अशा कुटुंबात एकमेकांची साथ असते. कितीही दु:ख असलं तरी आपल्याला एक आधार वाटतो. सर्व जण आपल्यासोबत असणार हे फिलींग विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये नसतं.

  ऐतिहासिक भूमिकेनंतर आजची तरुणी
  ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत जिजामाता या आदर्श मातेची भूमिका साकारल्यानंतर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत आजच्या युगातील तरुणी साकारताना खूप संयम ठेवावा लागत आहे. जिजामाता ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची होती. त्यानंतर अदितीची भूमिका साकारणं खूप चॅलेंजिंग होतं. या इंडस्ट्रीत टाइपकास्ट होण्याची भीती असल्यानं हे चॅलेंज स्वीकारायलाच हवं असं ठरवलं. झी मराठीसारख्या मोठ्या प्लॅटफॅार्मवर मिळालेल्या या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत आहे. जिजामातामधील टोन आणि भाषाशैली अदितीच्या कॅरेक्टरमध्ये उतरता कामा नये याची काळजी घेत आहे. शिवकालीन भाषेत काम केल्यानंतर आजच्या बोलीभाषेत स्वीच आॅन करणं सुरुवातीला थोडं डिफिकल्ट वाटत होतं, पण दिग्दर्शक आणि सर्व टीममुळं शक्य झालं. जिजामातांप्रमाणे अदितीही प्रेक्षकांना खूप आवडेल.

  हार्दिकसोबत छान गट्टी जमली
  हार्दिकला मी पर्सनली ओळखत नव्हते, पण राणादा म्हणून तो खूप गाजला आहे. लोकं त्याच्यावर खूप प्रेम करतात. आताही शूट करताना आम्हाला ते प्रेम पहायला मिळत आहे. एक कॅरेक्टर यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या भूमिकेच्या माध्यमातून पुन्हा रसिकांपर्यंत पोहोचण्याचं चॅलेंज आम्ही दोघंही फेस करत होतो. यासाठी दोघंही एकमेकांना मदत करत होतो. खूप कमी दिवसात आमची छान मैत्री झाली. मुंबईपासून दूर नाशिकमध्ये शूट सुरू असल्यानं एकमेकांना वेळ देऊ शकलो. सेटवरसुद्धा कॅरेक्टरबाबत गप्पा होतात. पहिल्या दिवशी हार्दिकसोबत काम करण्यापूर्वी मलाही थोडी भीती वाटत होती, पण आता त्याच्यासोबत काम करणं एन्जॅाय करतेय.

  दिग्दर्शकांची अभिनेत्री
  अमित सावर्डेकर या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करतेय. खरं तर मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. आपण केवळ आपल्या कॅरेक्टरपुरता विचार करतो, पण दिग्दर्शक पूर्ण सिरीयलचा विचार करतात. ते एका वेगळ्या पॅाइंट आॅफ व्ह्यूनं मालिकेकडं बघत असतात. त्यामुळं मी पूर्णपणे सरेंडर होऊन काम करते. सावर्डेकर खूप छान काम करत आहेत. या मालिकेसारखं वातावरण खूप कमी बघायला मिळतं. अदितीला माणसांबद्दल भीती असणं हा गुण वास्तवातही कुठे ना कुठे पहायला मिळतो. माणसं आपल्या आपल्यातच इतकी रमतात की, छोट्या कुटुंबातही त्यांचं एकमेकांकडं लक्ष नसतं. एकमेकांशी कम्युनिकेशनच नसतं. मोठ्या कुटुंबात न राहून आपण नक्की काय मिस करतोय हे आजच्या जनरेशनला या मालिकेच्या माध्यमातून समजेल. मोबाईल आणि कॅाम्प्युटरच्यापलिकडं जाऊन माणसांचंही एक जग असतं हे युथला समजेल. त्यात काय सुख असतं जाणवेल.