हरी उभा नाटकाच्या दारी…

हरी नाट्यगृहाच्या दारी उभा राहून केवळ पडदा उघडण्याची वाट पहात आहे. 'नवराष्ट्र'शी बातचित करताना हरीनं दीड वर्षांपासून सोसलेल्या परिस्थितीचा जणू पाढाच वाचून दाखवला.

  आज परिस्थितीच इतकी विचित्र आहे की भलेभले आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नाट्यसृष्टीलाही याचा फार मोठा फटका सहन करावा लागत आहे. केवळ रंगभूमीशी एकनिष्ठ असलेले कलाकार लॅाकडाऊनमुळं घरी बसले आहेत, पण चित्रपट-मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची गाडी धीम्या गतीनं का होईना सुरू आहे. खरा प्रश्न आहे तो नाट्यसृष्टीत काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचा. नाटकाचा पडदा ओढण्यापासून, घंटानाद करणाऱ्या आणि बुकिंग काऊंटरवर बसून तिकीटं विकणाऱ्यांचा… काल शिवाजी मंदिर नाट्यगृहातील बाळू चहावाल्याबाबत वाचलं. मागील बऱ्याच वर्षांपासून विविध नाटकांसाठी बुकिंग क्लार्क म्हणून काम करणाऱ्या हरी पाटणकरची अवस्थाही बाळूपेक्षा वेगळी नाही. फरक इतकाच की हरीनं मुंबई सोडली नाही. आज हा हरी नाट्यगृहाच्या दारी उभा राहून केवळ पडदा उघडण्याची वाट पहात आहे. ‘नवराष्ट्र’शी बातचित करताना हरीनं दीड वर्षांपासून सोसलेल्या परिस्थितीचा जणू पाढाच वाचून दाखवला.

  हरीनं आपल्या नेहमीच्या शैलीत बोलायला सुरु केली ती प्रश्नार्थक वाक्यानं… हरी म्हणाला की, आता या लॅाकडाऊनबद्दल काय बोलणार? आमची पुरती वाट लावून टाकली आहे. आज मुंबईत कोरोनाबाबत तितकीशी वाईट परिस्थिती नाही हे कोणीही सांगू शकेल. असं असतानाही नाटयगृहांना अद्याप टाळं असणं म्हणजे आमच्या पोटावर पाय आहे. रविवारी गडकरीला ‘स्त्री’ नाटकाचा प्रयोग झाल्यानं आमच्यासारख्या तळागाळातील नाट्यकर्मींना तसंच बॅक स्टेज आर्टिस्टना आशेचा किरण दिसला होता. या प्रयोगानंतर पुन्हा नाटक सुरू होईल अशी आशा होती, पण बुकींग चांगलं होऊनही प्रयोग बंद केल्यानं आता काय काम करायचं हा प्रश्न प्रत्येक बॅक स्टेज आर्टिस्टला सतावत आहे. सरकारचं आमच्याकडे लक्षच नाही. मध्यंतरी सरकारनं काही नाट्यनिर्मात्यांसोबत मिटिंग केली. त्यामध्ये अनुदानाबाबत चर्चा झाली. निर्मात्यांना अनुदान मिळेल, पण आमचं काय हा प्रश्न कोणीही सोडवलेला नाही. ज्यांनी नाटकं केली त्यांना अनुदान मिळण्याच्या विरोधात आम्ही मुळीच नाही, पण रंगमंच कामगार, सेट उभारणारे, लाईटमन आणि माझ्यासारख्या बुकिंग क्लार्कचं काय? आमच्या प्रश्नांकडे कोणाचं लक्षच नाही. आम्हा सर्व लोकांची अवस्था खूप वाईट आहे. आता तिसरी लाट येणार असल्याचं बोललं जातंय, पण मला काही तसं वातावरण वाटत नाही. आपल्यालाही सरकारच्या बरोबर राहूनच काम करावं लागेल. सरकारनं आमच्याकडेही लक्ष द्यायला हवं. अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेलं नाही.

  थिएटर दोस्त मदतीला धावला
  १५ मार्च २०२० पासून नाटक बंद झाल्यानंतर आम्हाला कोणी वालीच उरला नाही. पहिल्या लाटेमध्ये काही संस्थांनी अन्नधान्याची मदत केली. त्यामुळं थोडा फार तग धरता आला. आता दुसऱ्या लाटेमध्ये कोणाकडूनही काहीही मदत मिळालेली नव्हती. आता कोव्हिड रिलीफ अँड सपोर्ट थिएटर दोस्त नावाचा ग्रुप आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांनी रंगमंच कामगारांना औषधांच्या माध्यमातून मदत सुरू केली आहे. रुग्णालयांच्या खर्चासाठी मदत केली आहे. लसीकरण करण्यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात सपनामॅडम, सुनीलसर व जीतू पाटील यांनी पुढाकार घेतल्यानं आमच्यापैकी काही गरजूंना थोडा आधार मिळाला. सप्टेंबरपर्यंत अन्नधान्याच्या माध्यमातून १६० लोकांना मदत करण्याची त्यांची योजना आहे.  पाहू पुढं काय होतं ते.

  गेल्या वर्षी नाट्य परिषेदेची आर्थिक मदत
  पहिल्या लाटेनंतर झालेल्या लॅाकडाऊनच्या काळात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं जूनपासून प्रत्येकी चार हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. नंतर मदत थांबवली आणि थेट दिवाळीला तीन महिन्यांचे मिळून १२ हजार रुपये दिले होते. याखेरीज कोणाकडूनही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळं बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करावे लागले. मीसुद्धा बराच प्रयत्न केला आहे, पण आम्ही नाटकाची माणसं आहोत. आम्हाला नाटकाखेरीज दुसरं काही येत नाही हो. पोटाची खळगी भरण्याकरता आज जरी आम्ही काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असलो तरी त्यात राम नाही. आमचा जीव नाटकातच गुंतला आहे. आमचं नाटक एकदाचं सुरू करा बघा… आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. पडद्यामागचा कामगार कधी कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगला नाही. दोन वेळ उपाशी राहिला, पण नाटक करूनच जगला. असं असताना आज त्याच कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.

  पीठ-नारळ विकून दिवस काढले
  मी तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर गावातील आहे. मध्यंतरी गावावरून पीठीचं पीठ, तांदळाचं पीठ, नारळ मागवून विकण्याचं काम सुरू केलं होतं. त्यातून थोडं फार उत्पन्न झालं. आता तरी सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यायला हवं. आर्थिक मदत करायला हवी. अन्नधान्याची मदत मिळत आहेच, पण हातात पैसे नसल्यानं काहीच करता येत नाही. डॅाक्टरकडे जायला तरी पैसे असायला हवेत की नको? मी बुकींग क्लार्कचं काम करत असल्यानं नेहमी हातात पैसे खेळत असायचे. आज त्याच हातात पैसे नाहीत हे खेदानं सांगावंसं वाटत आहे. मुलगा चौदावी शिकला असून, तोदेखील माझ्यासोबतच शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये बुकींगसाठी मदत करतो. त्यामुळं आता घरी उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही.

  दिग्गजांसोबत केलं आहे काम
  हरीबद्दल सांगायचं तर कामगार विभागातून पुढे आलेलं हरहुन्नरी नाट्यप्रेमी व्यक्तिमत्व. लालबागला रहाणाऱ्या हरीची १९७८-७९मध्ये नाट्यसृष्टीची नाळ जोडली गेली. सख्खे मामा निर्माते मामा पेडणेकरांचा हात धरून नाट्यसृष्टीत आलेला हरी इथंच रमला आणि बुकिंग क्लार्कपासून नाट्यनिर्मितीपर्यंत बरीच कामं मनापासून करू लागला. ‘बायका त्या बायका’, ‘छावा’, ‘नटसम्राट’, ‘जय देवी संतोषीमाता’ या नाटकांसाठी मामांसोबत राहून हरीनं बुकींगपासून बॅकस्टेजची सर्व कामं केली. यशवंत दत्त, दिलीप प्रभवळकर, अरुण सरनाईक, प्रकाश इनामदार, कमलाकर सारंग, लालन सारंग, लक्ष्मीकांत बेर्डे, रुही बेर्डे, सतीश पुळेकर, निशिगंधा वाड, स्मिता तळवलकर, डॅा. गिरीष ओक, भरत जाधव, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे अशा एका पेक्षा एक दिग्गजांनी हरीच्या कामाचं कौतुक केलं आहे. बुकिंग करता करता हरीनं लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत ‘बिघडले स्वर्गाचे दार’ या नाटकाची निर्मितीही केली. त्यानंतर ‘सर आले धावून’, ‘कुणीतरी आहे तिथं’, ‘आली तर पळापळ’ या नाटकांच्या निर्मितीतही सहभाग घेतला. ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डेंच्या मालिकांमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केलं आहे. याशिवाय ‘लावण्य दरबार’ हा लावण्यांचा कार्यक्रम आणि स्वर्गीय गायक मोहम्मद रफींच्या गाण्यांचा ‘आॅर्केस्ट्रा ३जी’ हा त्यांचा शोसुद्धा सुरू आहे.