‘बाळूमामांची भूमिका एक थक्क करणारा अनुभव’, सुमितने नवराष्ट्रबरोबर शेअर केलेला हा प्रवास नक्की वाचा!

बाळूमामांप्रमाणे सुमितची भक्ती करू लागले आहेत. हा सर्व थक्क करणारा अनुभव 'नवराष्ट्र'सोबत शेअर करताना सुमितनं आपल्या आजवरच्या प्रवासाबाबतही सांगितलं.

  संतचरीत्रांवर प्रकाश टाकणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांना खुणावत असतात. त्यामुळंच विविध वाहिन्या मालिकांच्या माध्यमातून महान संतांची चरीत्र रसिकांसमोर सादर करत असतात. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका पहिल्या भागापासून रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. पाच राज्यांमध्ये भटकंती करणाऱ्या बाळूमामांचा भक्तपरीवार खूप मोठा आहे. या मालिकेत टायटल रोल साकारणाऱ्या सुमित पुसावळेला लोक बाळूमामा समजू लागले आहेत. बाळूमामांप्रमाणे सुमितची भक्ती करू लागले आहेत. हा सर्व थक्क करणारा अनुभव ‘नवराष्ट्र’सोबत शेअर करताना सुमितनं आपल्या आजवरच्या प्रवासाबाबतही सांगितलं.

  सुमितच्या घरी कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नाही. हॅाटेलमध्ये नोकरी, अभिनयाची आवड, दिग्दर्शनात असिस्टंट करता करता सुमितला बाळूमामा साकारण्याचीं संधी मिळाली. याबाबत सुमित म्हणाला की, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील देहंची हे माझं गाव आहे. वडील शेती करतात आणि गावीच वडीलोपार्जित एक छोटंसं रेस्टॅारंट आहे. आई गृहिणी आहे. हॅाटेल मॅनेजमेंट केल्यानंतर कोल्हापूरमधील हॅाटेल सयाजीमध्ये फ्रंट आॅफीस एक्सिक्युटीव्ह म्हणून काम करत होतो. तिथून मॅाडेलिंगला सुरुवात केली. पुण्यात ‘सरगम’ चित्रपटाची आॅडीशन सुरू होती. त्यात निगेटीव्ह रोलसाठी सिलेक्शन झालं. त्यानंतर नोकरी सोडून फिल्म इंडस्ट्रीत आलो. स्वत:हून, अनुभवातून शिकत गेलो. ‘सरगम’साठी असिस्टंटही केलं. ‘जवानी झिंदाबाद’मध्येही छोटा रोल केला. प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्सर्च कंपनीतील ‘काय रे रास्कला’ या मराठी आणि ‘सरवन’ या पंजाबी सिनेमासाठी असिस्ट केलं. राधिका राव आणि विनय सप्रू यांच्याकडे एक गाणं केलं होतं.

  प्रियंका चोप्राच्या कंपनीत असिस्टंट ते बाळूमामा बनण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत सुमित म्हणाला की, प्रियंकाच्या कंपनीत गिरीधरन स्वामींना असिस्ट करत असताना मी आॅडीशन्सही देत होतो, पण वेगवेगळ्या कारणांमुळं नाकारला जायचो. त्यामुळं दिग्दर्शनाचं काम सुरूच ठेवलं. मुख्य ओढ अभिनयाकडे होती. कॅमेऱ्यामागे राहून अभिनय शिकण्यासाठी मी दिग्दर्शनात असिस्ट केलं होतं. आॅडीशन देत असताना ‘लागीरं झालं जी’ आणि नंतर ‘संभाजी’मध्ये हर्जेराजे महाडीक ही व्यक्तिरेखा साकारली. संभाजी करतानाच ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. पूर्वी बाळूमामा छोटे होते, तेव्हा मी या मालिकेत नागराज नावाची छोटी व्यक्तिरेखा साकारली होती. ते काम निर्माते-लेखक-दिग्दर्शक संतोष आयाचित त्यांना काम आवडलं होतं. त्यामुळं मोठ्या बाळूमामाचं कास्टिंग करताना त्यांनी कॅाल केला. मी पश्चिम महाराष्ट्रातील असल्यानं बालपणापासून मामांबद्दल ऐकलं होतं. बाळूमामांचा रोल करण्यापूर्वी मी कोल्हापूरमधील अदमापूरला गेलो. मामांचं दर्शन घेतलं. मामांच्या जीवनचरीत्र ग्रंथ वाचला. बाळूमामांना पाहिलेल्या, त्यांच्यासोबत राहिलेल्या तिथल्या काही लोकांना भेटलो. त्यांच्याकडून माहिती मिळवली. संतोषसरांनी मार्गदर्शन केल्यानं मामा साकारणं सोपं गेलं. त्यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या युट्यूबवर तीन-चार फिल्म्सही पाहिल्या.

  मामांप्रमाणे माझीही भक्ती…
  बाळूमामांची भूमिका साकारत असल्यानं लोकांचं खूप प्रेम मिळत आहे. गावी लोकं घरी येऊन भेट देतात. बाळूमामांची व्यक्तिरेखा साकारत असल्यानं माझे फॅन्स नाहीत, तर भक्त आहेत. फॅन्स असणं वेगळं आणि भक्त असणं वेगळं. आम्ही तुम्हालाच मामा मानतो, सिरीयल सुरू झाली की आमचं अख्खं कुटुंब सर्व कामं सोडून पहायला बसतो, सिरीयल सुरू झावर आम्ही अगोदर तुमचं दर्शन घेतो अशा प्रकारच्या प्रतिक्रीया येतात. भक्तीभावानं लोकं जोडले गेले आहेत. त्यामुळं खूप मोठी जबाबदारी आहे. पंढरपूरमध्ये एक अनुभव आला. तो माझा चॅनलसोबत पहिलाच इव्हेंट होता. तिथे लोकांनी माझ्या पायावर लहान मुलं ठेवली. ‘मामा यांना आशीर्वाद द्या’, असं लोकं सांगत होते. त्यावेळी मला जाणवलं की ही भूमिका खूप मोठी आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करायचा आहे.

  पाच राज्यांमध्ये मामांची भटकंती
  १८९२मध्ये जन्म आणि १९६६ला मामांनी समाधी घेतली. त्यामुळं या मालिकेत तो कार्यकाल दाखवला जात आहे. सध्या चोराच्या जमातीची कथा सुरू आहे. या जमातीला लोकं गावात घेत नाहीत. मामा त्यांना कशाप्रकारे गावात आणतात ते दाखवण्यात येत आहे. मामांनी नेहमीच लोकांच्या अडीअडचणी दूर केल्या आहेत. चमत्कारही केले आहेत. कधी चमत्कारानं तर कधी औषधांद्वारे लोकांवर उपचार केले. हे सर्व संदर्भ ग्रंथांमध्ये आहेत. मागच्या वर्षी लॅाकडाऊनपूर्वी हौसा नावाच्या कॅरेक्टरची कथा आली होती. मृत पावलेल्या त्या लहान मुलीला तीन दिवस मामा रहात असलेल्या तळावर ठेवून जिवंत केलं होतं. असे बरेच चमत्कार मामांनी केले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश अशा एकूण पाच राज्यांमध्ये मामांनी पायी भटकंती केली होती. ५०० मेंढ्या होत्या. बरीच लोकंही सोबत असायची. लोकं यांना शंकराचा अवतार मानतात.

  खूप मोठी जबाबदारी आहे
  ज्यावेळी अशा प्रकारची महान व्यक्तिरेखा साकारतो, तेव्हा दडपण येतंच, पण काम चांगलं झाल्यानंतर प्रतिक्रीया आल्या की दडपणाचं रूपांतर जबाबदारीमध्ये होतं असं मला वाटतं. लोकांच्या प्रतिक्रीया ऐकल्यानंतर आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याचं जाणवतं. ‘डोळे झाकल्यावर मामांचा चेहरा म्हणून तुमचाच चेहरा दिसतो’, अशा प्रकारची जेव्हा प्रतिक्रीया मिळते तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. लोकांच्या भक्तीभावनेला कधीच धक्का लागता कामा नये ही आणखी एक मोठी जबाबदारी आहे. यापूर्वी मी खलनायकही साकारला आहे, पण आता तसं करता येणार नाही. बाहेर वावरतानाही खूप विचार करावा लागतो. इतकंच नव्हे तर सोशल मीडियाचा वापर करतानाही खूप जपून करावा लागतो.

  प्रेक्षक खूप प्रगल्भ झाला आहे
  आजचा प्रेक्षक खूप बदलला आहे. त्यांची विचारसरणी प्रगल्भ झाली आहे. पूर्वी एखादं कॅरेक्टर केलं की त्या कलाकाराला त्याच गेटअपमध्ये लोकांना पहायला आवडायचं. आता लोकांचे विचार बदलले आहेत. त्यामुळे भविष्यात इतर व्यक्तिरेखा स्वीकारल्या तरी नक्कीच मला रसिक अॅक्सेप्ट करतील असा विश्वास आहे. प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलल्यानं भविष्यात काही अडचण येईल असं वाटत नाही. इमेज ब्रेक करून करियर घडवतानाही मामांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचा नक्कीच फायदा होईल. मामांचा कृपाआशीर्वाद असल्यानंच मला बाळूमामा बनण्याची संधी मिळाली असून, भविष्यातील वाटचालीसाठीही त्यांचा आशीर्वाद कायम राहील याची खात्री आहे. पुढे जाऊन वेब सिरीज करण्याचं प्लॅनिंग आहे.