नृत्यांगना योगिताचे मन मालिकेत गुंतले

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे विविध रंग आहेत. अशाच एका अनोख्या प्रेमाची काहणी लवकरच कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

  ‘ईच्छा तेथे मार्ग’ असं आपण नेहमीच म्हणतो, पण काहींनी हे सार आपल्या जीवनात उतरवत यश मिळवलं आहे. अभिनेत्री योगिता चव्हाणने केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपली स्वप्नं साकार केले आहे. उत्तम नृत्यांगना असणाऱ्या योगिताने मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिकाकरून अभिनयाची आवड जपली. लवकरच योगिता कलर्स मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत योगिता अंतरा नावाच्या स्वाभिमानी मुलीची व्यक्तीरेखा साकारत आहे. योगिताने या अंतराविषयी ‘नवराष्ट्र’ बरोबर केलेली ही खास बातचीत.

  ही प्रेम कहाणी मात्र काहीशी वेगळी आहे. या प्रेमाला एक रांगडा बाज आहे. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. या मालिकेतून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  आणि अभिनयाकडे वळले…

  खरतर मी एक नृत्यांगना होते. त्यावेळी मी कलाकारांच्या मागे डान्स करायचे. त्याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेणं सुरूच होतं. त्यानंतर २०१६ मध्ये मी डान्सिंग सोडून अभिनयाकडे वळले. त्यानंतर मी माझा पहिला चित्रपट केला गावठी जी २०१८ मध्ये प्रदर्शित झाली. त्यानंतर जाडूबाई जोरात, बापमाणूस मध्ये छोट्या भूमिका केल्या. त्यानंतर नवरी मिळे नवऱ्याला ही मालिका केली. ही मालिका संपली आणि अंतरा माझ्या आयुष्यात आली.

  अंतराची ऑडिशन महत्त्वाची

  गेले काही अनेक महिने या मालिकेवर काम सुरू होतं. फेब्रुवारी महिन्यात मी या मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. त्यानंतर अनेक दिवस गेले आणि पुन्हा एक कॉल आला. पुन्हा एकदा ऑडिशन शूट करून पाठवायला सांगितली. ऑडिशन दिल्यानंतरच माझ्यात एक वेगळाय कॉन्फिडन्स आला, मला माहित होतं की माझं सिलेक्शन या भूमिकेसाठी होणार आहे. पण काही दिवसांनी मला कॉल आला की माझं सिलेक्शन झालय पण वेगळ्या भूमिकेसाठी. पण माझ्या मनात अंतरा हीच भूमिका होते. कारण मनापासून मी त्या भूमिकेची तयारी केली होती. असं म्हणतात आपण जे मनापासून मागतो ते आपल्याला मिळतच. असच काहीसं झालं आणि मातृदिना दिवशी मला फोन आला आणि मला अंतरा साकारायची आहे. अतिशय आनंदाची बातमी या दिवशी मिळणं या सारखं सूख नव्हतं. कारण मला आई नाहीये आणि कुठेतरी मातृदिना दिवशी ही मालिका मिळाल्यामुळे आईची इच्छा पुर्ण होतेय असच मला वाटलं.

  रिक्षा चालवायला शिकले

  मालिकेत मला रिक्षा चालवायची आहे हे ऐकल्यावर मी खूप जास्त एक्साईट झाले. कारण मला बुलेट चालवायला, कार चालवायला प्रचंड आवडतं. आपल्याला सगळं चालवायला जमलं पाहिजे या हट्टापाई मी केवळ हे सगळं चालवायला शिकले होते. पण कधी रिक्षा चालवायला लागेल असं वाटलं नव्हतं. पण खरं सांगते कार आणि बाईक चालवण्यापेक्षा रिक्षा चालवण्यात जी मज्जा आहे. ती कशातच नाहीये. मी रिक्षा चालवायला शिकल्यावर हे लक्षात आलं की जे लोक वर्षांनूवर्ष रिक्षा चालवत आहेत त्यांची कमाल आहे. आता सराव करून करून मी ही चांगली रिक्षा चालवायला शिकले. आता मी मोठे सीन या रिक्षा चालवाताना आहेत. त्याचबरोबर अनेक स्टंटही मी आता चांगल्या प्रकारे करू शकते.

  अंतरा योगितापेक्षा प्रचंड वेगळी

  अंतरा ही एक कॉलेज स्टुडंट आहे. ती आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवते. अंतरा ही आपल्या आयुष्यात नात्यांना खूप महत्त्व देते. ती प्रचंड स्वाभिमानी आहे. तिच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहेत अशी आहे अंतरा. जी माझ्यापेक्षा प्रचंड वेगळी आहे. अंतरा प्रचंड बडबड करणारी, कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलणारी त्याला मदत करायला तयार असणारी अशी आहे. त्या विरोधात मी आहे. मी फार बोलत नाही. अनोळखी व्यक्तीशी माझी पटकन ओळख होत नाही मला जरा वेळ लागतो.

  जबरदस्त ऑफस्क्रीन केमिस्ट्री 

  आमची पहिली भेट मालिकेच्या शुटींगच्या आधी झाली. त्यावेळी फार बोलणं झालं नाही. त्यानंतर आम्ही मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोकशनवर निघालो तेव्हा आम्ही सौरभच्या गाडीतून गेलो. त्यावेळी सुरूवातीला एकमेकांशी काय बोलायचं हा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला. पण संपूर्ण प्रवासात आम्ही प्रचंड गप्पा मारल्या. खूप छान प्रवास झाला. एकमेकांचा आत्ता पर्यंतचा प्रवास जाणून घेतला. खरतर तेव्हाच आमच्यात मैत्री झाली होती आणि आमची ती केमिस्ट्री पडद्यावरही पाहताना दिसते. प्रोमोमध्ये जरी आम्ही एकमेकांशी सतत भांडताना दिसत असलो तरी ऑफस्क्रीन आम्ही खूप चांगले मित्र झालो आहोत. प्रत्येक सीन शूट झाल्यानंतर एकमेकांना चूका सांगणं किंवा चांगला सीन झाला की कौतुक करणं, प्रोत्साहन देणं हे आम्ही नेहमीच करतो.

  मालिकेविषयी उत्सुकता

  मालिकेचे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतरच खूप चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या. सगळ्यांना प्रोमो बघून मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी माझा आवाज चांगला आहे अशा ही प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. घराचे ही प्रचंड खूश आहेत. आता काहीशी वेगळी असणारी मालिका बघायला घरचे आणि प्रेक्षक दोघही उत्सुक आहेत. दोन वेगळे राग जेव्हा एकत्र आल्यावर सुंदर गाणं तयार होतं. असच काहीसं प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळणार आहे. दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्व जेव्हा एकत्र येतात. तेव्हा नेमकं काय घडतं. तो गोड प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत बघायला मिळणार आहे.