विविधांगी भूमिकेत रमणारी सुप्रिया!

मराठी मनोरंजन क्षेत्रात विनोदसम्राज्ञी म्हणून सुप्रिया पाठारे ओळखली जाते. पण केवळ कॉमेडीमध्ये न आडकता तीने वेगवेगळ्या भूमिका करण्यावर भर दिला.

    एका पठडीत अडकून न राहता अनेक अभिनेता – अभिनेत्री विविध भूमिका करण्यावर भर देतात. ते कधी नायिका, खलनायिका साकरत प्रेक्षकांच्या समोर येतात आणि प्रेक्षकांच्या घरातलेच होतात. एखादी भूमिका अमूक एक अभिनेता – अभिनेत्री साकारत आहे म्हटल्यावर प्रेक्षकही अगदी आवडीने ती मालिका बघतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. तर कधी तीने कॉमेडी करत प्रेक्षकांना पोटभर हसवलंही आहे. सुप्रियाने याआधी विनोदी कार्यक्रम ‘फु बाई फु’, जागो मोहन प्यारे यांसारख्या लोकप्रिय मालिकेतून रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात विनोदसम्राज्ञी म्हणून सुप्रिया पाठारे ओळखली जाते. पण केवळ कॉमेडीमध्ये न आडकता तीने वेगवेगळ्या भूमिका करण्यावर भर दिला.

    आता ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत देविकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. मालिकेतील कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे. सुप्रिया पाठारेच्या एंट्रीने मालिका आणखी रंजक होणार आहे. आपल्या विनोदी अंदाजाने सुप्रिया पाठारेनं रसिकांना पोट धरुन हसवण्यास भाग पाडलं. त्यामुळे आता ‘श्रीमंताघरची सून’  या मालिकेत सुप्रिया निगेटीव्ह भूमिकेतही रसिकांना खिळवून ठेवणार हे नक्की. सुप्रियाच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि देविकाच्या भूमिकेबद्दल तीने नवराष्ट्रशी साधलेला हा खास संवाद.

     देविका साकारताना…

    मी देविका ही भूमिका करायला खूप उत्सुक आहे. या प्रोडक्शन हाऊसबरोबर या आधीपण मी काम केलं होतं. त्याचबरोबर मी या आधीही अनेकवेळा निगेटीव्ह भूमिका केली आहे. त्यामुळे या भूमिकेबद्दल जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा व्हिलन साकारण्याचं टेश्नन आलं नाही. फक्त देविकाचा जो अटायर आहे. तो मला किती कॅरी करता येईल याबाबत थोडं टेश्नन होतं. मी खऱ्या आयुष्यात देविकासारखीच रहात असले तरी कॅमेराससमोर मी कशी दिसेन असं मनात येत होतं. पण शुटींग सुरू झालं आणि ही भितीही मनातून गेली.

    एखादी रिप्लेसपेंट करत असताना प्रेक्षक लगेच तुलना करतात. ही अभिनेत्री अशी भूमिका साकारायची, ही अभिनेत्री तशी भूमिका साकारते. पण मला एक फायदा झाला की, मी एकही एपिसोड या मालिकेचा पाहिला नव्हता. कारण मी या आधी सोनी वाहिनीवरच एका मालिकेत काम करत होते. त्यामुळे शुटींगमुळे मालिका पाहिला कधी वेळच मिळाला नाही. मी आधीची देविकाच बघितली नव्हती. केवळ मालिकेचा एक प्रोमो पाहिला होता. त्यामुळे मला माझ्यापद्धतीने देविका उभी करायला मिळाली. त्यामुळे आता प्रेक्षक समजून घेतील अशी अशा आहे. मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहून देविका साकारण्याचा प्रयत्न करणार आहे.

    रडणारी आई नकोच…

    मी सगळ्याच जास्त कॉमेडी करण्यात रमते पण खलनायिका साकारतानाही मला तितकीच मज्जा येते. फक्त इमोशनल आई साकारायला आवडत नाही. मला ते मुळमुळ रडलेलं आवडतं नाही. एकतर ते मला जमतही नाही. मी खऱ्या आयुष्यातही तशी नाहीये. डोळ्यातून पाणी काढायला मला आवडत नाही. त्यामुळे कॉमेडी आणि खलनायिकेत मी जास्त रमते. त्यामुळेच कदाचीत याच भूमिका मी जास्त केल्या आहेत.

    प्रेक्षकांची पोचपावती महत्त्वाची

    गेल्यावर्षी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतीं प्रेक्षक हे घरातच होते. त्यामुळे सतत कॉमेडी शोचे एपिसोड बघणं त्याचं चालू होतं. त्यामुळे जूने फु बाई फुचे खूप एपिसोड माझे आणि भाऊ कदमचे या काळात प्रेक्षकांनी बघितले. त्यावेळी अनेकांनी फोन करून सांगितलं. ‘या एपिसोडमुळे आत्ताचा जो काळ आहे त्या काळात आम्ही खूप रिलॅक्स झालो. खूप हलकं वाटलं.’ हे ऐकल्यावर खूप आनंद झाला. की आपल्यामुळे आपण या काळात प्रेक्षकांना आनंद देऊ शकतोय आणि प्रेक्षकांचे हे आशिर्वाद आम्हा कलाकारांसाठी खूप महत्त्वाचे असतात.

    विनोद कधीच म्हातारा होत नाही…

    विनोदाचा दर्जा खालावतोय असा सूर जरी उमटत असेल तर मला वाटत नाही यात काही तथ्य आहे. आपण महाराष्ट्राची हास्यजत्रेचं उदाहरण घेतलं तर त्यात सिच्युएशनल कॉमेडी मोठ्या प्रमाणवर करतात. कॉमेडीचा, किंवा एखाद्या कामाचा दर्जा कोणीच ठरवू शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी हे जज करण्यात अर्थ नाही. एखादा कार्यक्रम तुम्हाला नाही आवडला तर तो का वाईट आहे हे म्हणण्यापेक्षा तुमच्या हातात रिमोट आहे तुम्ही वाहिनी बदला. अनेकवेळा स्कीटसाठी विषय सुचणं, त्यात विनोद असणं हे खूप कठीण होतं. त्यामुळे एखाद्या स्कीटमध्ये आम्हालाही पाणी घालावं लागतं. खूप गोष्टी कराव्या लागतात. विनोद कधीच म्हातारा होणार नाही. जशी परिस्थिती बदलत जाते तसा विनोद बदलत जातो. फक्त मी खबरदारी घेते की कमरेखालचे विनोद मी कधीच करत नाही आणि करणारही नाही.