वारकऱ्याची मन:स्थिती सांगणारं ‘येऊ देशील का वारीला…’दीपक कदम यांच्या संकल्पनेतून उतरलं हे खास गाणं

'येऊ देशील का वारीला...' या गाण्याद्वारे प्रत्येक वारकऱ्याची मन:स्थिती, या गाण्याची संकल्पना आणि प्रवास दीपकनं 'नवराष्ट्र'सोबत शेअर केला.

  वारी जवळ आली की वारकऱ्यांना जशी विठ्ठलभेटीच आस लागते, तशी मराठमोळ्या दिग्दर्शकांना पांडुरंगाशी निगडीत काही ना काही कलाकृती बनवण्याचा ध्यास लागतो. आजवर ‘वाक्या’, ‘नगरसेवक’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘आयपीएल’, ‘तुझ्याविना’, ‘अॅट्रॅासिटी’, ‘पुरषा’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक दीपक कदमच्या मनातही विठ्ठलभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित झाली आणि त्यानं थेथ विठ्ठलावर ‘येऊ देशील का वारीला…’ या गाण्याद्वारे प्रत्येक वारकऱ्याची मन:स्थिती सादर केली. या गाण्याची संकल्पना आणि प्रवास दीपकनं ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला.

  आजवर चित्रपट दिग्दर्शनात रमलेल्या दीपकनं प्रथमच अल्बम बनवला आहे. यामागील संकल्पनेबाबत दीपक म्हणाला की, मागच्या वर्षी वारी न झाल्यानं वारकरी निराश झाले होते. यंदाही वारी नसल्यानं वारकऱ्यांमध्ये आक्रोश होता. मागची वारी गेली. यंदा दुसरी वारीही कोरोनामुळं गेली. सरकारनं वारीवर आणलेले निर्बंध लोक हितासाठीच आहेत, पण वारकऱ्यांच्या मनात खदखद आहे. ती या गाण्याद्वारे मांडली आहे. विठोबा केवळ पंढरीतच नाही. प्रत्येक माणसात देव आहे हे खरं आहे. कोणाच्या रूपात देव भेटेल हे सांगता येत नाही. या भावनेतून एका वारकऱ्यानं विठ्ठलाला भक्तीमय साद घातली आहे. ‘आता तरी वारीला येऊ देशील का?’ हा प्रश्न त्यानं विठ्ठलालाच विचारला आहे. या मागची एकच भावना आहे की, तुला भेटायचं आहे. कोरोनारूपी संकट निवारण करून तुझ्या भेटीची लागलेली ओढ पूर्ण कर. आज सर्व आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. वारीमध्ये लाखो वारकरी येतात. जसे विठ्ठलाला भेटतात, तसे एकमेकांनाही भेटतात, दर्शन घेतात, गळाभेट होते, तेव्हा सोशल डिस्टन्सिंग राखलं जाऊ शकणार नसल्याची भीती प्रशासनाला असल्यानं वारी बंद आहे. आजही एखादा वारकरी पंढरपूरातून गावी गेला की सर्व लोकं त्याचं दर्शन घेण्यासाठी येतात. कारण तो पंढरीतून आलेला आहे. तिथला अंश त्याच्यात उतरल्याची भावना यामागे असते. मागील दोन वर्षांपासून हे सर्व बंद झालं आहे. अशा वेळी एखाद्या वारकऱ्याच्या मनात येणारे विचार या गाण्याद्वारे मांडले आहेत.

  वारकऱ्याच्या मनातील भाव मांडण्याबाबत दीपक म्हणाला की, शेतकरी हाच वारकरी आहे. शेतीची सर्व कामं करून जेव्हा शेतकरी आषाढीला निघतो, तेव्हा अति श्रमामुळं तो थकून जातो, पण जेव्हा विठ्ठलाचं दर्शन होतं, तेव्हा त्याचा सर्व थकवा दूर होतो. ‘मागील परिहार पुढे नाही क्षीण । झालीया दर्शन एक वेळा ।।’ या संतवचनानुसार तास न तास रांगेत उभा राहून जीव जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतो, तेव्हा त्याच्यात पुन्हा एक नव उर्जा संचारते. किर्तन-प्रवचनांच्या माध्यमातूनही त्याचा थकवा दूर होतो. ‘गाये नाचे उडे आपुलिया छंदे…’ याप्रमाणं मग तो आपल्याच आनंदात आवडीनं गाऊ लागतो, नाचू लागतो, उड्या मारू लागतो. ‘हा सुखसोहळा स्वर्गी नाही’ या वचनाप्रमाणं भूवैकुंठ पंढरीत मिळणारं सुख स्वर्गातही मिळू शकणार नाही. या सुखापासून दुरावलेला वारकरी या गाण्याद्वारे विठ्ठलाशी संवाद साधतोय. इथं फक्त वारकरीच येत नाहीत तर किर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, वासुदेव, पोतराज, भारूडकार, पिंगळे आदी सर्व असतात. इथली आर्थिक गणितं एकमेकांवर अवलंबून असतात, पण वारीच नसल्यानं सर्व ठप्प झालं आहे. त्यामुळं वारकरी आणि शेतकऱ्याची आर्त किंकाळी या गाण्यात जाणवते.

  कोकणच्या मातीनं सुचवली संकल्पना
  मुंबईत कामं बंद असल्यानं यंदा लॅाकडाऊन होण्यापूर्वीच गावी गेलो होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे हे माझं गाव. त्यानंतर दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होऊ लागल्यानं यंदा देखील वारी झाली नाही तर आपण यावर काहीतरी करायला हवं असा विचार मनात आला. या विचारानं अस्वस्थ झालो आणि गीतकार प्रकाश भागवत यांना फोन केला. त्यांनी छान गाणं लिहिलं. गायक सुदिन तांबे यांनी सुरेल गायन केलं. सोलापूरमधील जब्बार-धनंजय या संगीतकार जोडीनं या गाण्याला वारकरी धाटणीचं सुमधूर संगीत दिलं. गाणं रेकॅार्ड झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वारीच्या अगोदर शूट करून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यावेळी पंढरपूरात कर्फ्यू लागूनही विठ्ठलाची कृपा झाली आणि कोणतीही अडचण न येता या गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं. या कामी प्रशासनाची मदत झाली.

  आषाढीच्या पूर्वसंध्येला रसिकार्पण
  १५ जुलै रोजी गाणं शूट केलं आणि १९ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रिलीज करण्यात आलं. केवळ पाच दिवसांमध्ये हे सर्व केलं आहे. अत्यंत घाईघाईत सर्व कामं करूनही वारकऱ्यांच्या मनातील भाव टिपणारं एक सुंदर गाणं रसिकांच्या भेटीला आणल्याचं समाधान आहे. गाठीशी काहीही नसताना एक-एक गोष्ट जुळून आली आणि त्या पांडुरंगानंच हे गाणं करून घेतलं. ‘पाहशील का वाट आमुची, कृपेच्या तू सागरा. भरकटलेल्या नावेला या दावशील का किनारा. सांग बा सांग बा विठ्ठला येऊ देशील का वारीला…’ हे गाणं लिहिणाऱ्या गीतकार प्रकाश भागवत यांच्यावरच ते शूटही करण्यात आलं आहे. भागवत यांनी आपल्या अभिनयाद्वारे वारकऱ्यांच्या मनातील भावना अचूकपणे सादर केल्या आहेत. माय म्युझिक स्टेशन चॅनेलवर हे गाणं पाहता येईल. नवनाथ निकम या गाण्याचे एडीटर असून, कार्यकारी निर्माते राजेंद्र सावंत आहेत. वेशभूषा शारवीन जाधव आणि रंगभूषा नित्यानंद पेडणेकर यांनी केली आहे.

  अल्बमच्या विश्वात पदार्पण
  रिलीज होणारं हे माझं पहिलंच गाणं आहे. या गाण्यासाठी आम्ही चार दिवस पंढरपूरमध्ये राहिलो. चंद्रभागा घाट, पुंडलीक मंदिरा बाहेरील परिसर, पश्चिम दरवाजा, नामदेव पायरी, चोखा मेळा महाराजांची समाधी, बाजार, इस्कॅान मंदिर, चंद्रभागा, वृंदावन या ठिकाणी शूट केलं आहे. वृंदावनमध्ये विठ्ठलाची भव्य मूर्ती आणि तुळशीची मोठी बाग आहे. त्यात संतांच्याही मूर्त्या आहेत. यासाठी फॅारेस्ट विभागातील अधिकाऱ्यांची मदत झाली. शूटसाठी ड्रोनही वापरला आहे. रेड ड्रॅगन कॅमेऱ्यानं शूट केलंय. हे गाणं पाहताना कुठेही अल्बमधील गाणं पाहतोय असं वाटणार नाही. सर्व सीन्स एखाद्या फिल्मप्रमाणे शूट करण्यात आले आहेत. दिग्दर्शनासोबतच या गाण्याची निर्मितीही मीच केली आहे. याखेरीज ‘प्रेम झायलंय तुझ्यावरी…’ हे एक रोमँटीक कोळीगीत केलं असून, औरंगाबादमध्ये केलेलं आणखी एक साँग लवकरच प्रदर्शित होईल.

  पंढरीची वारी आहे माझे घरी…
  माझे वडील दत्ताराम कदम आणि आई सत्यवती हे दोघेही वारकरी होते. मी लहान असताना वडील मुंबईहून पंढरपूरला यायचे आणि आई आम्हाला घेऊन गावावरून यायची. आईचं वय झाल्यानं आता ती वारीला जात नाही. मला जसा वेळ मिळतो तसा मी पंढरीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतो. आम्हा कोकणातील लोकांची खरी वारी कार्तिकी आहे. कार्तिकी वारीला आम्ही जायचो. पावसाच्या हंगामात कोकणातील लोकं वारीला जाऊ शकत नाहीत. दिवाळीच्या सुमारास भातकापणी झाल्यावर कार्तिकी वारी करणं सोयीस्कर होतं. कोकणातील वारकरी तुळशीच्या लग्नासाठी वारीहून घरी परत येतात. आता नेमका योगायोग असा आला की सर्वांना वारी बंद होती आणि आम्ही पंढरपूरमध्ये होतो. विशेष म्हणजे या गाण्याचे लेखक आणि अभिनेते प्रकाश भागवतही वारकरी आहेत.

  विठ्ठल हृदयात वसलाय
  आजवर मी जे चित्रपट केले त्यात भक्तीगीतं किंवा अभंग केले, पण अद्याप धार्मिक चित्रपट केला नाही. यल्लमा देवीचा विषय घेऊन चित्रपट बनवला आहे. ‘संसाराची माया’मध्ये देवाला मानणाऱ्या लोकांचा विषय आहे, पण पूर्णपणे आध्यात्मिक सिनेमा बनवलेला नाही. कारण त्यासाठी तुम्हाला पूर्ण गोष्टींची जाण असावी लागते. आता या सिंगलद्वारे विठ्ठलावरील गाण्यानं सुरुवात झाली आहे. आजवर जे विठ्ठलावर बनलंय ते हिट झालंय. प्रल्हाद शिंदेंसारखे गायकही विठ्ठलाची गाणी गाऊन मोठे झाले. विठ्ठल लोकांच्या हृदयात वसला आहे. विठ्ठलाला लोकं सवंगडी, सखा मानतात. विठ्ठल या दैवताला लोकांना आपल्या नात्यांतील माणसांप्रमाणं भासतं. त्यामुळं आईला जशी एकेरी हाक मारली जाते, तशीच विठ्ठलालाही मारतात.