मराठमोळी दिप्ती साकारतेय पंजाबी गुलप्रीत!

'थ्री इडियट्स'मध्ये छोटीशी भूमिका साकारणारी दिप्ती सध्या झी मराठीवरील 'माझा होशील ना'मध्ये गुलप्रीत बनली आहे. या कॅरेक्टरबाबत 'नवराष्ट्र'शी बोलताना दिप्तीनं आजवरच्या आपल्या कारकिर्दीबाबतही सांगितलं.

  काही मराठी कलाकारांची कारकिर्द हिंदीपासून सुरू होते. हिंदीत यश मिळाल्यावर ते तिथेच रमतात, पण त्यांना कायम आपल्या मातृभाषेत काम करण्याची ओढ असते. यशावकाश जेव्हा मराठीत काम करण्याची संधी मिळते, तेव्हा मात्र त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. दिप्ती अभिजीत जोशी ही देखील अशीच एक अभिनेत्री आहे, जिनं बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘थ्री इडियट्स’मध्ये छोटीशी भूमिका साकारणारी दिप्ती सध्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’मध्ये गुलप्रीत बनली आहे. या कॅरेक्टरबाबत ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिप्तीनं आजवरच्या आपल्या कारकिर्दीबाबतही सांगितलं.
  बालपणापासून अभिनय करणाऱ्या दिप्तीला आई-बाबांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळालं. आई गृहिणी, तर बाबा केईएम हॅास्पिटलमध्ये सिनीयर टेक्निशियन होते. रहायला विरारला असूनही आई तिला सुट्टीच्या दिवशी नाट्य शिबिरासाठी मुंबईत आणायची. दोघीही नातेवाईकांकडे रहायच्या. आज दिप्तीनं हिंदी मालिका विश्वात चांगलं नाव कमावलं असून, सध्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत गुलप्रीत साकारत आहे. या कॅरेक्टरबाबत दिप्ती म्हणाली की, या सिरीयलमध्ये चार मामा आहेत. यापैकी तिसऱ्या मामानं लपूनछपून लग्न केलं आहे. १४ वर्षांनंतर ते उघड झालं आहे. तिसऱ्या मामांच्या भूमिकेत असलेल्या सुनील तावडेंशी गुलप्रीतचं लग्न झालं आहे. ही प्रचंड पॅाझिटीव्ह आहे. आपण जे करू त्यातून चांगलंच होणार याची तिला खात्री आहे. वाईटातूनही चांगलं घडू शकतं यावर तिचा विश्वास आहे. त्यासाठी संकटांच्या वेळीही ती नवऱ्याला म्हणते की, आपल्याला थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण घर तुटणार नाही हे पहायचं आहे. मला काहीही करून घरी घेऊन चला असं तिचं म्हणणं असतं. माझं मराठीमध्ये पहिलंच मोठं काम आहे.

  गुलप्रीतबाबत विस्तारानं सांगताना दिप्ती म्हणाली की, ही सिरीयल जरी मराठी असली तरी मी मात्र हिंदी आणि पंजाबीच बोलतेय. जानेवारीमध्ये या मालिकेत माझी एंट्री झाली. लोकांना मी साकारलेली गुलप्रीत किंवा गुल्लू आवडतेय. हे कॅरेक्टर मूळात पंजाबी असल्यानं प्रचंड एनर्जेटीक आहे. ब्रह्मे कुटुंबात येण्याचा ती १४ वर्षांपासून प्रयत्न करतेय. माझं लग्न झाल्याचं मालिकेत १४ वर्षांनी रिव्हील करण्यात आलं आहे. हिला आठ वर्षांचा मुलगा आहे. माझ्या कॅरेक्टरमध्ये उत्साहही कायम ठेवायचा आहे. मी जरी मराठी असले तरी एक पंजाबी स्त्री मराठी कुटुंबात आल्यानं सिरीयलमध्ये मराठमोळी संस्कृती समजून घ्यायची आहे. मराठमोळ्या चालीरीतींशी स्वत:ला एकरूप करून त्या आत्मसात करायच्या आहेत. मी घरात आल्यानं सुरू झालेली भांडणं थांबवायची आहेत. ब्रह्मे कुटुंब एकत्रित ठेवण्याची गुलप्रीतचीही इच्छा आहे. यासाठी बऱ्याचदा मी खूप एनर्जेटीक असते. सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असते.

  ‘थ्री इडियट्स’मध्ये झलक
  यापूर्वी बऱ्याच हिंदी मालिका केल्या आहेत. अँड टीव्हीवर ‘गंगा’मध्ये टीचर बनले. ‘जय संतोषी मां’मध्ये परिक्षीत साहनी, शादाब खान, रतन राजपूत, उपासना सिंग यांच्यासोबत पुष्पा साकारली. भाग्यश्री पटवर्धनची कमबॅक सिरीयल असलेल्या लाईफ ओकेवरील ‘लौट आओ त्रिशा’मध्ये माला बनले. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यात हॅास्पिटलमध्ये करीना कपूरची फर्स्ट अटेंडंट बनले. क्लायमॅक्समधील व्हॅक्युम क्लीनरच्या सीनमध्ये करीना, सुप्रिया जोशी आणि मी आहे. खरं तर यात माझा रोल बऱ्यापैकी मोठा होता, पण एडीटमध्ये खूप कट केलं गेल्यानं छोटाशा रोलमध्ये दिसले. याच वर्षी राजश्री प्रोडक्शनच्या एनडीटीव्हीवरील ‘दो हंसों का जोडा’ या सिरीयलमध्ये रामकटोरी हे कॅरेक्टर केलं. अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’मध्ये छोटीशी भूमिका केली आहे.

  हिंदीत काम केल्याचा फायदा
  कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासून मी मराठीत प्रयत्न केले, पण माझं नशीब हिंदी मालिकांच्या विश्वात घेऊन गेलं. त्यावेळी मी मराठीसाठी बऱ्याच आॅडीशन्स दिल्या, पण सिलेक्ट झाले नाही. याउलट हिंदीत लगेच निवडली गेले आणि यशस्वीही झाले. त्यामुळं तिथेच रमले. हिंदीत बिझी झाल्यानंतर बऱ्याचदा मराठीतून आॅडीशनसाठी कॅाल यायचे, पण तेव्हा मी हिंदी मालिकांसाठी तारखा दिलेल्या असल्यानं करू शकले नव्हते. मध्यंतरीच्या काळात सिरीयल्सही बंद झाल्या होत्या आणि लॅाकडाऊनमुळे घरी असतानाच ‘माझा होशील  ना’ची आॅफर आली. हिंदीत काम केलेलं असल्यानं आणि कॅरेक्टर माझ्या आवाक्यातलं असल्यानंच मला विचारणा झाली होती. मीदेखील गुलप्रीत साकारण्याचं आव्हान स्वीकारलं. खरं तर मला मराठी मालिका करायचीच होती. कारण किती झालं तरी मराठी मातृभाषा आहे.

  पाचव्या वर्षापासून रंगभूमीवर…
  वयाच्या पाचव्या वर्षापासून मी बालनाट्य रंगभूमीवर सक्रीय आहे. सुधाताई करमरकरांच्या शिबिरातून मी नाटकात अभिनय करण्याचे धडे गिरवले. बालनाट्यांमध्ये काम करण्याची आवड असल्यानं सुलभाताई देशपांडे आणि रमेश पुरव यांच्यासोबत ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकात काम करू लागले. बेसिकली डान्समुळे त्या नाटकात गेले होते. संध्या पुरेचांकडे मी भरतनाट्यम शिकले. झेवियर्स कॅालेजमध्ये सचिन-शंकर बॅले ग्रुपमध्ये फ्री स्टाईल क्लासिकल बॅलेसाठी सिलेक्ट झाले आणि बरेच डान्स परफॅार्मंसेस केले. मध्यंतरी अपघात झाल्यानं डान्स सुटल्यानं पुन्हा अभिनयाकडे वळले. पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘जाऊबाई जोरात’मध्ये काम केलं. त्यामुळं सुरुवात मराठी थिएटरपासूनच झाली, पण योगायोगानं हिंदीकडे वळले. आता मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्यानं आनंदी आहे. हिंदीत वावरल्यानं गुलप्रीत साकारणं कठीण नव्हतं. बंगाली, गुजराती, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तेलुगू भाषांमध्ये काम केल्यानं मी बायलँग्वेल आहे.

  उपासनानं दिला पंजाबीचा धडा
  गुलप्रीतची भूमिका साकारण्यासाठी पंजाबीचा लहेजा शिकण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. यासाठी मला उपासना सिंग यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव कामी आला. ‘जय संतोषी मां’ या मालिकेत मी उपासनांसोबत काम केलं आहे. त्या खऱ्या पंजाबी आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते जाणवतं. त्यामुळं बऱ्याचदा जेव्हा त्यांच्यासोबत असायचे तेव्हा मी त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करायचे. मजे मजेत मी त्यांच्यासोबत पंजाबी बोलायचे. त्या देखील मला चांगला प्रतिसाद द्यायच्या. त्याचा फायदा मला गुलप्रीतसाठी आॅडीशन देताना झाला. माझं आॅडीशन एफर्टलेसली झालं. हे कॅरेक्टर रसिकांना सांगतंय की, आयुष्यात बऱ्याचदा हवं ते घडतं, पण लोकांना दाखवू शकत नसतो. तरीही हिंमत हरता कामा नये. जे केलंय ते योग्य असल्याचा विश्वास असायला हवा. परिस्थितीमुळं काही लपवावं लागलं तरी आज ना उद्या ते उघडकीस या आशेवर रहायचं. कायम पॅाझिटीव्ह विचार करायचा. कोणत्याही प्रसंगाला हसत हसत सामोरं जायचं.