इंजिनियर असणाऱ्या सौरभचा जीव अभिनयात गुंतला!

अभिनया सोबतच त्याने फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीच योग्य तंत्र त्याने जाणून घेतलं. अभिनय करताना सातत्याने काम नसल्यामुळे अनेकदा आर्थिक अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं

    रंगभूमीने अनेक कलाकारांना घडवलं त्यांना मार्गदर्शन केलं आणि आज हेच कलाकार मनोरंजन सृष्टीत चांगलं नाव कमवत आहे. डॉक्टर असो इंजिनियर किंवा मग कोणतंही वेगळं प्रोफेशन या कलेची साधना हे सवड आणि मार्ग शोधतेच, असाच कलाकार म्हणजे सौरभ चौगुले.

    आपल्या भेटीला येणारी ‘जीव माझा गुंतला’ नवीन मालिकेतून सौरभ चौगुले हा अभिनेता मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. सौरभ हा इंजिनियर असून स्वतामधल्या अभिनेत्याला ओळखून त्याने वेळीच आपला कल अभिनयाकडे वळवला. इंजिनियर केल्यानंतर अभिनयाकडे वळण त्यासाठी सोपं नव्हतं त्यानेअभिनयाची सुरुवात एकांकिकापासून केली. डोंबिवली आणि परिसरातील अनेक नाट्यसंस्थासोबत स्वतःला जोडून घेत त्याने आपल्या रंगभूमीच्या प्रवासाची सुरुवात केली. एकांकिका प्रायोगिक नाटक, राज्य नाट्य संस्था या सगळ्या माध्यमातून तो रंगभूमीशी एकरूप होत होता.

    अभिनया सोबतच त्याने फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीच योग्य तंत्र त्याने जाणून घेतलं. अभिनय करताना सातत्याने काम नसल्यामुळे अनेकदा आर्थिक अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं. अशा वेळी त्याला फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचा चांगला फायदा झाला. तो अनेक शॉर्टफिल्म आणि वेबसिरीज यांचं छायाचित्रण करू लागला. हे काम करून येणारा मोबदला त्याच्या आर्थिक अडचणी दूर करत पण या कामासोबतच त्याने आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरूच ठेवली होती. मालिका आणि चित्रपटातुन छोटी पात्र तो साकारत होता. अशातच त्याला दक्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत नकारात्मक पात्र साकारायला मिळालं.

    आता पुन्हा या लॉकडाऊनच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सौरभ ‘जीव माझा गुंतला’ या एका वेगळ्या विषयाला हात घालणाऱ्या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत तो ‘मल्हार’ ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो योगिता चव्हाण या अभिनेत्री सोबत दिसणार असून मालिकेचा विषय हा स्त्री प्रधान आहे. ‘फार वेळ लागतो, स्वतःला तयार करायला, स्वतःला जगासमोर आणायला त्यावेळेत आपण काय करतो हे फार महत्वाच असत कारण ती वेळ प्रतीक्षेची असते.

    प्रामाणिकपणा हा यशाची गुरुकिल्ली आहे तुम्ही स्वतःशी स्वतःच्या कलेशी प्रामाणिक असाल तर यशस्वी नक्कीच व्हाल अस मला वाटत, माझा प्रवास हा सगळ्यांसारखाच आहे त्यात आलेल्या अडचणी सुद्धा स्वतःला वेळ द्यायला लागलो की सगळं सुरळीत होत असे मला वाटत.’ अस सौरभ आपल्या या संपूर्ण प्रवासाविषयी सांगतो.