भीमा साकारताना… सोहम शहाने सांगितला खास अनुभव!

'शिप ऑफ थीसस', 'तुम्बाड'सोबतच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महारानी'मधील त्याचं काम कौतुकास्पद आहे.

    सोहम शहा सध्या ‘महारानी’ या वेब सिरीजमुळं चर्चेत आहे. सोहमनं नेहमीच कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेला उचित न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. ‘महारानी’मध्ये मिळालेली व्यक्तिरेखाही त्याच्या अभिनयाचा कस लावणारी ठरली आहे. ‘शिप ऑफ थीसस’, ‘तुम्बाड’सोबतच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महारानी’मधील त्याचं काम कौतुकास्पद आहे.

    सोहमनं आजवर  साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. ‘महारानी’मध्ये सोहमनं एका बिहारी राजनेत्याची भूमिका साकारली आहे. याबाबत सोहम म्हणाला  की, मी ‘महारानी’च्या प्रदर्शनाबाबत खूपच उत्साहित आहे. ही खरोखरच एक बहुप्रतीक्षित रिलीज आहे. यातील भीमा भारतीची भूमिका साकारत असताना आजवर माझ्यातील कधीही न दिसलेले पैलू समोर आले आहेत.

     याबद्दल मी स्वतःच अनभिज्ञ होतो. हे केवळ सुभाषसरांच्या मार्गदर्शनामुळं शक्य झालं आहे. ‘महारानी’मध्ये देखील काहीतरी नवं करण्याचा माझा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल. या भूमिकेसाठी सोहमनं योग्य भाषा आणि बोलण्याची शैली शिकण्यासोबतच लुकसाठी स्वतःमध्ये शारीरिक बदल देखील केले आहेत. यासाठी वजन वाढवलं असून, व्यक्तिरेखेला साजेशा करारी मिशा देखील वाढवल्या आहेत.