वेब शो स्टाईलमध्ये अंकुशची ‘ती परत आलीये’!

अंकुश मारोडे हा मराठमोळा तरुण दिग्दर्शक या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. या मालिकेचं औचित्य साधत अंकुशनं 'नवराष्ट्र'शी संवाद साधत मालिकेबाबत सांगितलं.

  नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या मालिका देण्यात आघाडीवर असलेल्या झी मराठी वाहिनीवर ‘ती परत आलीये’ ही नवी मालिका सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. हिंदीत बरंच काम केलेल्या अंकुश मारोडे हा मराठमोळा तरुण दिग्दर्शक या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. या मालिकेचं औचित्य साधत अंकुशनं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधत मालिकेबाबत सांगितलं.

  कॅाम्प्युटर इंजिनीअरींग केल्यानंतर जॅाब न करता दिग्दर्शनाकडे वळलेल्या अंकुशनं सुरुवातीला चित्रपटासाठी असिस्टंट दिग्दर्शन केलं. त्यानंतर अंकुश सिरीयल्सकडे वळला. या प्रवासात त्यानं अश्विनी धीर, मनीष गुप्ता यांसारख्या मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केलं. चॅनेल व्हीवर ‘साड्डा हक’, सब टीव्हीवर ‘खटमल इश्क’, ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं’, ‘लाल इश्क’ ही हॅारर सिरीयल केली. पुढील प्रवासाबाबत अंकुश म्हणाला की, ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’, ‘एक घर मंतरलेलं’ आणि ‘अलादीन’ या मालिका केल्या. सात वर्षे हिंदीतच काम केल्यानंतर ‘एक घर मंतरलेलं’ या हॅारर मालिकेद्वारे मराठीत पदार्पण केलं. यातील माझं काम पाहून मला ‘ती परत आलीये’साठी अॅप्रोच करण्यात आलं. ‘अलादीन’ हा शो बंद झाल्यानंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचं १५-२० दिवसांचं काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळं ट्रम्पकार्ड या निर्मितीसंस्थेसोबत ओळख झाली. त्यातील माझं काम आवडल्यानं त्यांनी मला ‘मी परत आलीय’ या मालिकेची आॅफर दिली. यापूर्वी मी रोमँटिक, थ्रिलर, हॅारर वगैरे बरेच जॅानर्स हाताळले आहेत, पण हॅारर हा माझा आवडता विषय आहे. मला यातील कॅमेरावर्क आवडतं. हॅारर, थ्रिलर, अॅक्शन हे माझं पॅशन आहे. स्टायलाईज सिनेमा बनवण्याकडं माझा कल असतो.

  ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या ट्रीटमेंटबाबत अंकुश म्हणाला की, हि मालिका टिपिकल डेली सोप्ससारखी नसावी असं माझं प्रांजळ मत होतं. यातील कॅरेक्टर्सनी स्टोरी सांगायला हवी असं मला वाटत होतं. या कॅरेक्टर्सचं कनेक्शन त्यांच्या भूतकाळाशी आहे. भूतकाळातील घटना वर्तमानकाळात त्यांचा कसा पाठपुरावा करतात ते या मालिकेत आहे. या रिसॅार्टमध्ये आलेलं कोणीही तिथून बाहेर जाऊ शकत नाही. यातील कॅरेक्टर्सही नाना प्रकारची आहेत. यात कोणी स्वार्थी आहे, कोणी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आलेला आहे. कोणाचं लग्न ठरत नाही. तिला लग्न करून मोठ्या घरात जायचं आहे. एक गरोदर तरुणी आहे, जिचा नवरा तिला खूप मारतोय. दोन दिवस एन्जॅाय करण्यासाठी ती आली आहे. एक टीचर आहे. एकानं वेगवेगळे व्यवसाय केलेत, पण कुठेही यश मिळालेलं नाही. अशी वल्ली कॅरेक्टर्स यात आहेत.

  जंगलात रिसॅार्टमध्ये शूटिंग
  ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मालिका विश्वात काम केलेल्या काही नीन कलाकारांना सधी दिली आहे. विजय कदम हे सर्वांच्याच ओळखीचे अभिनेते आहेत. मध्यवर्ती भूमिकेत त्यांचा चेहरा समोर ठेवून इतर कॅरेक्टर्स अत्यंत चांगल्या प्रकारे कथानकात गुंफल्या आहेत. यातील सर्वच व्यक्तिरेखांना समान महत्त्व आहे. यासाठी कॅरेक्टरला न्याय देऊ शकेल अशा कलाकारांची निवड केली. विजय कदम यांचा यात की रोल आहे. ते कधी मार्गदर्शक, तर कधी घातकही वाटतात. कदमांनी साकारलेल्या कॅरेक्टरचं नाव बाबूराव तांडेल असल्यानं त्यांची भाषा कोकणातील आहे, पण हे रिसॅार्ट शहराजवळील एखाद्या जंगलात आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही की, कोणतंही साधन नाही. याचं शूट आम्ही कर्जतमध्ये करतोय. इथेच मुक्काम करतोय.

  मालिकेतील ओळखीचे चेहरे
  या मालिकेतील तरुण मुलांमध्ये सायली नावाचं कॅरेक्टर कुंजिका काळवींट साकारत आहे. हिनं ‘स्वामिनी’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिका केल्या आहेत. नचिकेत देवस्थळीनं विक्रांत साकारत आहे. यानं ‘सुखन’, ‘महानिर्वाण’ या नाटकांसोबतच ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये काम केलं आहे. श्रेयस राजेनं ‘मोलकरीण बाई’ आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत काम केलं आहे. समीर खांडेकरनं ‘माधुरी मिडलक्लास’मध्ये अभिनय केला आहे. तो या मालिकेत हनम्या साकारतोय. टीकारामची भूमिका प्रथमेश विवलकर करतोय. तोसुद्धा ‘माधुरी मिडलक्लास’मध्ये होता. तन्वी कुलकर्णीनं ‘स्वराज्य जननी जिजामाता’मध्ये काम केलं आहे. ‘मोलकरीण बाई’मध्ये दिसलेली वैष्णवी करमरकर यात अनुजा हे कॅरेक्टर प्ले करतेय. मँडीच्या भूमिकेतील तेजस महाजन ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मधून आला आहे. त्याची ही पहिलीच मालिका आहे. या सर्वांची निवड आॅडीशनद्वारे केली आहे.

  वेब सिरीजसारखा पॅटर्न
  हा शो डेली सोपचं पॅटर्न फॅालो करत नाही. पहिले १० एपिसोडस या मालिकेचा पॅटर्न एखाद्या वेब सिरीजसारखा आहे. आम्हाला कुठेही नाटकीपणा आणायचा नाही. रिअॅलिस्टीक पॅटर्नमध्ये मालिका सादर करायची आहे. यासाठी कोणत्याही कॅरेक्टरला खास लुक फॅालो केलेला नाही. या टीममधील प्रत्येकजण आपल्या कॅरेक्टरमध्ये शिरलेला आहे. प्रत्येक कलाकार मी आणि वाहिनी सांगतेय त्याप्रमाणं अतिशय सुरेख काम करत आहे. त्यामुळं त्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. तरुण मुलं विजय कदमांच्या तोडीस तोड अभिनय करत आहेत. काहीतरी नवीन इन्व्हेन्ट करण्याचा प्रयत्न आहे. यातील प्रत्येक कलाकार हिरा आहे. महिनाभरापासून आम्ही पहाटे चारपर्यंत वगैरे शूट करतोय. केवळ एकच दिवस दिवसा शूट केलं. यासाठी संपूर्ण टीमनं खूप मेहनत घेतली आहे. यातील मर्डर सिक्वेन्स अंगावर शहारे आणणारा आहे. सारं काही रिअल होत आहे.

  तरुणाईनं भान राखायला हवं
  ‘देवमाणूस’ लिहिणारा स्वप्नील गांगुर्डे या मालिकेचं लेखन करत असून, मनीष कदम डायलॅाग्ज लिहीत आहे. याचं पार्श्वसंगीत रसिकांना आवडेल. वेगळ्या पद्धतीचे सीन्स आणि युथला आवडेल अशी ही मालिका आहे. हॅारर-थ्रिलरची आवड असणाऱ्या प्रेक्षकांना ‘ती परत आलीय’ नक्कीच आवडेल. याची लाइटींग, टेकिंग, फ्रेमिंग सर्व वेगळं आहे. नॅार्मल डेलिसोपपेक्षा डिफरन्ट आहे. टीव्हीवरील मालिका न पाहणाऱ्या प्रेक्षकांना आकर्षित करणारा हा शो आहे. खरं तर हे वेब सिरीजचं काँटेंट आहे, पण झी मराठीनं हे मालिकेच्या रूपात आणलं आहे. सध्या तरी हि लिमिटेड एपिसोडची मालिका आहे. तरुणाईनं आपल्या चुका स्वीकारायला हव्यात असं ही मालिका सांगते. मित्र किंवा नातेवाईकांसोबत आपण काय करतोय याचं भान तरुणाईनं राखणं गरजेचं आहे. पिकनीकला गेल्यावर कोणाच्याही जीवावर न बेतता एन्जॅाय करण्यावर भर द्यायला हवा.