विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर हेमंतकुमारांचा ‘काळी माती’!

श-विदेशांतील ३५० पुरस्कारांवर आपलं नाव कोरत गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॅार्डच्या उंबरठ्यावर उभ्या राहिलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं हेमंतकुमार यांनी 'नवराष्ट्र'सोबत खास बातचित केली.

  ८०च्या दशकापासून संगीत क्षेत्रात कामगिरी केल्यानंतर दिग्दर्शनाकडे वळताना ‘व्हॅाटसअप लव्ह’ हा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांचा ‘काळी माती’ हा विक्रमी पुरस्कार पटकावलेला चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. देश-विदेशांतील ३५० पुरस्कारांवर आपलं नाव कोरत गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॅार्डच्या उंबरठ्यावर उभ्या राहिलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं हेमंतकुमार यांनी ‘नवराष्ट्र’सोबत खास बातचित केली.

  आपला आजवरचा प्रवास थोडक्यात सांगताना हेमंतकुमार म्हणाले की, यापूर्वी मी राकेश बापट आणि अनुजा साठेसोबत ‘व्हॅाटसअप लव्ह’ हा बायलँग्वल चित्रपट बनवला आहे. यातील मराठी चित्रपट रिलीज झाला, पण ‘आॅनलाईन प्यार’ हा हिंदी रिलीज करणं कोरोनामुळं शक्य झालं नाही. औरंगाबादमध्ये ड्रामा डिपार्टमेंटपासून माझ्या करियरची सुरुवात झाली. मकरंद अनासपुरे, चंद्रकांत कुलकर्णी वगैरे या मंडळींसोबत होतो, पण मी संगीत क्षेत्रात जास्त काम केलं. खूप वर्षांपासून इव्हेंन्ट आॅर्गनायझर म्हणून काम करतोय. वर्ल्डमध्ये माझी व्ह्यूवरशीप एक नंबर आहे. माझे २० लाख सबस्क्राईबर्स असून, यु टयुबवर ६७ कोटी व्ह्यूवरशीप आहे. ८०च्या दशकात मी गाणंही गायचो. अलिकडच्या काळात पूर्णत: शो आॅर्गनाईज करण्यावर भर दिला. आज माझे इंटरनेटवर जवळपास ७५० व्हिडीओज पहायला मिळतील. खूप वर्षांपासून चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची इच्छा होती. ‘व्हॅाटसअप लव्ह’च्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास दुसऱ्याच प्रयत्नात ३५० पुरस्कार पटकावणाऱ्या ‘काळी माती’पर्यंत येऊन पोहोचला आहे. ही कोणत्याही मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘काळी माती’ हा चित्रपट एका प्रगतशील शेतकऱ्याची कहाणी सांगणारा आहे. जनरली शेतकऱ्याच्या जीवनावरील सिनेमा म्हणजे अतिशय दीन, दुबळा, असहाय, याचना करणारा, भीक मागणारा, कोणी मदत न केल्यानं आत्महत्या करू पाहणारा असं चित्र आपण पहातो. माझा शेतकरी तसा नाही. खूप मेहनती, जिद्दी, महत्त्वाकांक्षी आहे. अत्यंत हालअपेष्टा सोसून शेतीतून करामत करून दाखवतो. ‘काळी माती’ या चित्रपटाची कहाणी खरी आहे. शेतीसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या प्रगतशील आणि आदर्श शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा यात आहे, जी असंख्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. बोडके यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या बऱ्याच मुलाखती पाहिल्यावर असं लक्षात आलं की, हा विषय केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरता मर्यादित नसून, विश्वव्यापी आहे. शेतकरी खरंच राजा आहे. तो कष्ट करून अन्नधान्य पिकवतो म्हणून आपण खातो. ही गोष्ट आपल्याला बऱ्याचदा समजत नाही. त्यामुळं आपण पुष्कळ अन्न वाया घालवतो, पण त्या मागं शेतकऱ्यांचे किती श्रम असतात हे प्रत्यक्ष शेतात गेल्यावरच समजू शकतं. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी रोग, तर कधी गारपीट या संकटांना सामोरं जात तो धान्य पिकवतो. आपल्याला खायला मिळावं म्हणून तो शेतात राबतो. या अन्नदात्याच्या व्यथा आणि त्याची यशोगाथा सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशानं ‘काळी माती’ बनवला आहे.

  बोडकेंना आवडली संकल्पना
  मी जेव्हा बोडकेंकडे सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांची प्रतिक्रीया खूप छान होती. आजवर त्यांचे बरेच इंटरव्ह्यू झाले होते, पण ते पाहणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. बोडकेंच्या यशाची गाथा संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं सिनेमा हे एकमेव माध्यम आहे हे त्यांना पटवून दिलं. त्यामुळं त्यांना ही संकल्पना खूप आवडली. ते माझ्या आॅफिसमध्ये आले. तासभर ते जे काही बोलले ते आम्ही रेकॅार्ड केलं. त्यानंतर बोडकेंनी २० ते २५ पानं लिहूनही पाठवली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र केले आणि लोकांना मनोरंजनही व्हावं यासाठी गाणीही कथेत पेरली. कल्याण उगळे, विश्वजीत जोशी आणि मंदार चोळकर यांनी गाणी लिहीली आहेत. संगीत अविनाश-विश्वजीतनं दिलं आहे. बोडकेंच्या जीवनातील प्रसंग ड्रॅमॅटीक कसे करता येतील त्यावर भर दिला आणि वस्तुस्थिती जगासमोर मांडली आहे. यात आम्ही काही खोटं दाखवलं नाही. हा चित्रपट २८ मे रोजी रिलीज करायचा होता, पण थिएटर्स ओपन नसल्यानं थांबलो. आता दिवाळीनंतरच त्यावर विचार करणार आहोत.

  कृषीमंत्र्यांच्या पत्रामुळं काम सोपं
  आम्ही हा चित्रपट लॅाकडाऊनच्या काळात बनवला. आॅक्टोबरमध्ये शूट केला. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये जेव्हा मी लोकेशन्स पहायला गेलो, तेव्हा खूप बिकट परिस्थिती होती. इथून पुण्यात जाण्यासाठीही परवानगी लागायची. मी केवळ निघालो आणि पाहून आलो. आॅक्टोबरमध्ये आम्ही शूट करायला गेलो, तेव्हा पोलिसांनीही अडवलं, पण कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचं पत्र आम्ही घेतलं होतं. आम्ही शूटिंगला चाललो असून सर्वतोपरी सहकार्य करण्यात यावं अशा आशयाचं ते पत्र होतं. त्यामुळं अडवण्याचा प्रकार कुठे घडला नाही. खेड, राजगुरूनगरमध्ये आम्ही जेव्हा शूट केलं, तेव्हाही कोरोनाचं वातावरण होतंच. लोकं आम्हाला घरी घेत नव्हते. घरातील शूट असायचं, तेव्हा सर्व लोकं बाहेर जायचे. शूट सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यावर आम्ही ते संपूर्ण घर सॅनिटाईज करायचो. आम्ही खूप काळजी घेऊन आणि कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करत हा चित्रपट बनवला.

  ३५० पुरस्कारांचा मानकरी
  आॅक्टोबरमध्ये शूट पूर्ण झाल्यावर डिसेंबरला पोस्ट प्रोडक्शन पूर्ण करून सेन्सॅारही मिळवलं. त्यानंतर गंमत म्हणून मी पाच-सात फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘काळी माती’ पाठवला. विशेष म्हणजे जिथे सिनेमा पाठवला तिथे पारितोषिक मिळालं. हा चित्रपट चांगला जोर धरतोय असं जाणवल्यानं जानेवारीमध्ये शंभरेक फेस्टिव्हल्सना पाठवला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात होणाऱ्या देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांना चित्रपट पाठवला. या चित्रपटानं आजपर्यंत ३५० पुरस्कार मिळवले आहेत. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॅार्डमध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला ९२ पुरस्कार मिळाल्याचा विक्रम आहे. तो रेकॅार्ड आम्ही कधीच मोडला आहे. आता ‘काळी माती’ या चित्रपटानं असा विक्रम केलाय की जरी एखाद्या दिग्दर्शकानं ठरवून जरी तो मोडायचा प्रयत्न केला तरी दमछाक होईल. कारण आणखी २५ तरी पुरस्कार या चित्रपटाला मिळतील अशी आशा आहे. गिनीज बुक आणि एशिया बुकसाठी एंट्री पाठवली आहे. एशिया बुकनं मला डॅाक्टरेट ही पदवीही देऊ केली आहे.

  नोकरी सोडून केली शेती
  ज्ञानेश्वर बोडके हे मूळचे पुणे जिल्ह्यातील माणगावमधील आहेत. लहानपणापासून ते स्कॅालर होते. दहावीमध्ये त्यांना ८० टक्के गुण मिळाले होते, पण घरची परिस्थिती गरीब असल्यानं दहावीनंतर लगेच त्यांना शेतात काम करावं लागलं. घरासाठी मदत करावी लागली. वडीलांवर खूप भार होत असल्यानं त्यांनी वयाच्या १५-१६व्या वर्षापासून कष्ट करायला सुरुवात केली. बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. फुलशेतीपासून लाखो रुपयांचा नफा होतो ही बातमी एका वर्तमानपत्रात वाचल्यानंतर त्या शेतकऱ्याला भेटले. त्याच्याकडून सर्व गोष्टी समजून घेतल्या. त्यावेळी ते एका आर्किटेक्टकडे असिस्टंटचं काम करत होते. त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतल्यावर कुटुंबीय रागावले. इतर लोकं शेती सोडून नोकरी करतात आणि तू नोकरी सोडून शेती कुठे करतोस असा त्यांचा सवाल होता. नोकरी सोडून शेती केलीस तर कोणी लग्नासाठी मुलगीही देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार त्यांनी आधी लग्न केल्यानंतर नोकरीला रामराम ठोकत शेती सुरू केली.

  यासाठी केली ओम-एतशाची निवड
  या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले ओमप्रकाश शिंदे आणि एतशा संझगिरी हे दोन्ही कलाकार टीव्हीवर यशस्वी झालेले आहेत. एतशा सध्या ‘पुण्यश्लोक अहिल्या’मध्ये अहिल्याबाईंची भूमिका साकारत आहे. ओमप्रकाशनं ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेसोबत ‘यु टर्न’ ही वेब सिरीजही केली आहे. ‘काळी माती’ हा ओमप्रकाश आणि एतशा या दोघांचाही पहिलाच चित्रपट आहे. ओमप्रकाशचं काम मी मालिकांमध्ये पाहिलं होतं. त्याचा ग्रामीण टोन मला आवडला होता. ओमप्रकाशला एकदा आॅफिसला बोलावून सर्व समजावून सांगितलं. त्यानंतर त्यानं बोडकेंच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत बारकाईनं अभ्यास केला. आता बोडकेंची मुलं म्हणतात की, आमचे बाबा असेच बोलायचे आणि असेच वागायचे. नायिकेसाठी मी बऱ्याच जणींचं आॅडीशन घेतलं, पण एतशाच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स मला आवडलं. या दोघांसोबत दीक्षा भोरचीही भूमिका असून, पूनम पाटील आणि भगवान पाचोरे आई-वडी