महावीर शोधणार मानवाचा ‘बर्थ’, वाचा या भन्नाट चित्रपटाबद्दल!

डॅा. विक्रम यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'द बर्थ १०,००० बीसी' या चित्रपटात महावीर केवळ साऊंडच्या माध्यमातून मानवाच्या जन्माची कहाणी सांगणार आहे. ही एक्सक्लुझीव्ह माहिती महावीरनं 'नवराष्ट्र'शी बोलताना दिली आहे.

  खरं तर सिनेमा हे कल्पनेच्याही पलीकडं नेणारं माध्यम असल्याचं आजवर बऱ्याच फिल्ममेकर्सनी सिद्ध केलं आहे. काही हॅालिवूडपटांनी नेहमीच कल्पनेच्या पलीकडलं चित्र दाखवत रसिकांना आकर्षित केलं आहे. इतिहासात डोकावतानाही अशा प्रकारचे प्रयत्न केले गेले आहेत, पण आता थेट मानवाच्या उत्पत्तीचा शोध घेणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड रेकॅार्डीस्ट महावीर साबन्नवारनं याचा साऊंड करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. डॅा. विक्रम यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘द बर्थ १०,००० बीसी’ या चित्रपटात महावीर केवळ साऊंडच्या माध्यमातून मानवाच्या जन्माची कहाणी सांगणार आहे. ही एक्सक्लुझीव्ह माहिती महावीरनं ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.

  सैफ-करीना अभिनीत श्रीराम राघवन यांच्या ‘एजंट विनोद’द्वारे सिनेसृष्टीत दाखल झालेल्या महावीर यांना भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘ख्वाडा’ चित्रपटाच्या साऊंड रेकॅार्डींगसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर मराठी, कन्नड, सिंहली, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये महावीरनं आपल्या अनोख्या ध्वनी संकलनाचा ठसा उमटवला आहे. बेळगाव जिल्ह्यात अथनी तालुक्यात असलेल्या शेडबाळ गावातील महावीरचे वडील पाटबंधारे खात्यात असल्यानं त्याचं शिक्षण सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं आहे. बालपण कोकणात गेल्यानं तेच आपलं गाव असल्यासारखं महावीरला वाटतं. त्याचं बेळगाव आणि सांगलीमध्ये घर आहे. महावीरनं साऊंड डिझाईन केलेले बरेच चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. यात अजय देवगणचा ‘मैदान’ही आहे, पण या सर्वांपेक्षा अद्भूत आहे ‘द बर्थ १०,००० बीसी’…

  श्री विनायका मारूती क्रिएशन्स आणि लक्ष्य प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘द बर्थ’ची निर्मिती प्रदीप जैन यांनी केली आहे. प्रताप राणा हा केवळ एकच कलाकार या चित्रपटात आहे. भारतीय इतिहासात प्रथमच अशा प्रकारची स्टोरी पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून, त्यात ‘वी डिफाईंड द जर्नी आॅफ मॅनकाईंड’ असं म्हणत काही रहस्यही उलगडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आम्ही जीवनाचा शोध घेणार असं सांगणाऱ्या या चित्रपटाबाबत महावीर म्हणाला की, २०१४मध्ये मी ‘हरीऊ’ नावाचा कन्नड चित्रपट केला होता. त्याचा डीओपी आनंद सुंदरेशा यानं मला ‘द बर्थ’ चित्रपटाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या टीममध्ये माझी एंट्री झाली. ही आदिमानव काळातील स्टोरी आहे. ‘द बर्थ’ मानवाच्या उत्पत्तीवर आधारीत आहे. एक इन्व्हेन्शन स्टोरी आहे. या चित्रपटाला कोणतीही भाषा नाही. एकही संवाद नाही. केवळ आहे शोध, शोध आणि शोध… त्यामुळं हा प्रोजेक्ट करणं फार इंटरेस्टींग होतं. याची प्रक्रिया खूप वेगळी होती. सर्व शूट पूर्ण झालं असून, एडिटही झालं आहे. लवकरच साऊंड डिझाइनचं काम सुरू होईल.

  डॅा. विक्रमचं अफलातून दिग्दर्शन
  हा चित्रपट आम्ही जंगलात, नदी जिथे समुद्राला मिळते अशा ठिकाणी खूप आत जाऊन शूट केला आहे. मागच्या वर्षी पावसाळ्यात, आॅगस्ट-सप्टेंबर आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही शूट केलं. संपूर्ण चित्रपटात एकच कॅरेक्टर आहे. त्याच्याभोवती संपूर्ण स्टोरी फिरते. आदिमानवानं कशा प्रकारे प्राथमिक शोध लावले, शेती कशी सुरू झाली, भात कसं तयार झालं, कंदमुळं आणि शिकार करून खायचं सोडून मानव शेती कशी करू लागला, आगीचा वापर कसा करू लागला, त्यानं बोटी कशा तयार केल्या, समुद्रात मासेमारी करायला कसा जाऊ लागला याचा प्रवास या चित्रपटात आहे. लेखक-दिग्दर्शक डॅा. विक्रम यांनी फार चांगल्या प्रकारे सर्व मांडणी केल्यामुळं काम करताना खूप वेगळा अनुभव आला. त्यांनी पहिल्याच सिनेमात वेगळा विषय हाताळला आहे. याचे त्यांनी आठ ते दहा भाग लिहीले आहेत. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर प्रत्येकावर वेगळा चित्रपट बनवण्याची योजना आहे. सिनेमॅटोग्राफी आनंद सुंदरेशानं केली असून, महेश थोगाटा एडीटर आहे.

  नैसर्गिक आवाजाची अनोखी जादू
  या चित्रपटाला डबिंग नाही. सादर केलेल्या गोष्टी नॅचरल वाटण्यासाठी सिंक साऊंड केलं. समुद्राचा, धबधब्याचा, वाऱ्याचा, ओरडण्याच्या आवाजातील नैसर्गिकपणा प्रेक्षकांना सिनेमा पाहताना जाणवेल. उत्तर कन्नडा जिल्ह्यातील गुफांमध्ये शूट केलं. कर्नाटकमध्ये यानाच्या जंगलात पावसाळ्यात बऱ्यापैकी शूट केलं. शूटच्या ठिकाणी वर्तमान काळातील काहीच खूणा असता कामा नये ही या चित्रपटाची गरज होती. त्यासाठी इंटिरीयर जंगलात जावं लागायचं. यानाच्या जंगलात जाण्यासाठी पहाटे साडे चार वाजता उठून निघायचो. तिथून दोन तास पायी प्रवास केल्यावर शूटिंगच्या जागी पोहोचायचो. संध्याकाळी काळोख झाल्यावर परत निघायचो. खूप वेगळा अनुभव होता. जणू ती एक छान अॅडव्हेन्चर ट्रीपच होती. शूटही सुरू होतं आणि एन्जॅायही करत होतो. हसन जिल्ह्यातील जंगलात काही भाग शूट केला. पावसाचं पाणी आणून तो कसा आपण तयार केलेल्या विहीरीत सोडतो, ते पाणी तो कसं शेतीसाठी वापरतो हे शूट करायचं होतं. हे सगळं इंटरेस्टींग होतं.

  राष्ट्रीय पुरस्कारामुळं आदर वाढला
  पहिल्याच मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं करियरचा पुढील प्रवास काहीसा सुखकर झाला. लोकांचा दृष्टिकोन बदलला. सेटवर दबदबा वाढला. सांगितलेल्या गोष्टी लोकं ऐकू लागले, गांभीर्यानं घेऊ लागले. शूट करताना शब्दाला किंमत मिळू लागली. आॅफर्स खूप येतात, पण निवडकच स्वीकारतो. मी मुंबईचा आणि त्यात नॅशनल अॅवॅार्ड विनर असल्यानं साऊथमध्ये खूप वेगळी ट्रीटमेंट मिळते. लोकल नसल्यानं आदरयुक्त भावना असते. साऊथवाले टेक्निकली खूप स्ट्राँग आहेत. वेळेवर सेटवर हजर असतात. त्यामुळं काम करताना मजा येते. त्यांची विचारधारा वेगळी आहे. मराठीपेक्षा वेगळं कल्चर आहे. मला कन्नड येत असल्यानं अडचण येत नाही. आम्ही घरीही कन्नड बोलतो. त्यामुळं तिथल्या लोकांनाही आपुलकीचा फिल येतो. मल्टीपल लँग्वेजमध्ये काम केल्यानं विविध भाषांतील सिनेमांमध्ये काम करण्याचे पर्याय उपलब्ध असतात.