आसावरीनंतर नव्या रूपात निवेदिता!

'सासूबाई'चा निरोप घेण्याचं औचित्य साधत निवेदिता यांनी 'नवराष्ट्र'शी साधलेला एक्सक्लुझीव्ह संवाद...

  नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये मुक्त मुशाफिरी करत रसिकांवर आपल्या विविधांगी व्यक्तिरेखांची मोहिनी घालणाऱ्या निवेदिता सराफ यांनी साकारलेली आसावरी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘अगंबाई सूनबाई’ ही मालिका आणि त्यातील आसावरी जरी प्रेक्षकांचा निरोप घेत असली तरी, निवेदिता सराफ मात्र यापुढेही नवनीवन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिकांना भेटतच राहणार आहेत. ‘सासूबाई’चा निरोप घेण्याचं औचित्य साधत निवेदिता यांनी ‘नवराष्ट्र’शी साधलेला एक्सक्लुझीव्ह संवाद…

  nivedita saraf

  बालपणापासून आजवरच्या अभिनयाच्या कारकिर्दीत निवेदिता यांनी असंख्य चाहते आणि त्यांच्या प्रेमाची शिदोरी जमवली आहे. एका मोठ्या ब्रेकनंतर परतल्यावर ‘अगंबाई सुनबाई’पर्यंतच्या प्रवासाबाबत त्या म्हणाल्या की, मराठीत ‘माझा छकुला’, हिंदीत ‘किंग अंकल’ आणि विजय तेंडुलकरांच्या ‘श्रीमंत’ या नाटकानंतर मी १४ वर्षांचा ब्रेक घेतला. १४ वर्षांनी प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर निर्मित ‘तुझ्या माझ्यात’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर परतले. सचिन खेडेकर, मीरा वेलणकर, आनंद इंगळे, अश्विनी आपटे आदी कलाकार सोबत होते. पुनरागमन करताना मी मुद्दाम नाटक निवडलं. कारण नाटकाला एक प्रोसेस असते. त्यानंतर मी अक्षरश: टेलिव्हीजनवरच रमले. ‘सर्वगुणसंपन्न’ ही बलाजी टेलिफिल्मसची मालिका केल्यावर मी बऱ्याच हिंदी मालिका केल्या. ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकेत हरीयाणवी भूमिका साकारली. स्टार प्रवाहवरील संजय जाधव निर्मिती ‘दुहेरी’ मालिकेद्वारे मराठीत आले. ‘दुहेरी’ करत असतानाच साडे चार वर्षांच्या काळात ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ ही दोन नाटकं केली. या काळात ‘देऊळ बंद’ या चित्रपटात वेगळी भूमिका साकारली. या प्रवासातील ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका रसिकांना खूपच आवडली. खरं तर अशा प्रकारची सिरीयल रात्री साडे आठ वाजता प्राइम टाईमला आणणं हे निलेश मयेकरांचं धारीष्टच होतं, पण लोकांना नेहमीच काहीतरी प्रवाहापेक्षा वेगळं आवडतं हे पुन्हा एकदा या मालिकेनं सिद्ध केलं आहे. रसिकांनी तूफान प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘अगंबाई सूनबाई’ या मालिकेत काम करताना तीच व्यक्तिरेखा वेगळ्या स्वरूपात साकारली. या निमित्तानं डॅा. गिरीश ओकसोबत पहिल्यांदाच काम केलं. गिरीशसोबत काम करण्याचा अनुभव छान आहे. खूप पेशन्स असलेला प्रोफेशल अॅक्टर आणि दिलदार सहकलाकार असं मी गिरीशबाबत म्हणेन. रवीकाकांची मला आज खूप आठवण येतेय. तेजश्री प्रधानशी माझी खूप घट्ट मैत्री झाली. आशुतोष पत्कीशी एक वेगळंच नातं तयार झालं. मॅडीचं काम करणारी भक्ती रत्नपारखी आणि आताच्या मालिकेतील अद्वैत दादरकर व उमा पेंढारकर यांचीही सुरेख साथ लाभली. या मालिकेत आमची खूप छान गट्टी जमली. महाराष्ट्राबाहेर शूटिंगच्या निमित्तानं आम्ही एकत्र राहिलो त्याचा फायदा झाला. या मालिकेतील आसावरीला लोकांनी खूप प्रेम दिलं. लोकांची पत्रं, फोन, मेसेजेस सुरूच आहेत. रस्त्यात भेट झाली तरी प्रेक्षक स्तुती करतात. माझे सिनेमे सुरूच असतात, पण मालिका घराघरात पोहोचत असल्यानं मजा आली.

  आसावरी मिळणं हे भाग्य
  आसावरीची भूमिका माझ्या वाट्याला येणं हे मी माझं भाग्यच समजते. अशा प्रकारचा रोल करण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. आज यंग जनरेशन ओटीटीकडं वळली आहे. ते टीव्हीवरील प्रोग्राम्सही मोबाईलवर पाहतात. त्यामुळं अॅक्चुअली टीव्हीसमोर बघून मालिका पाहणाऱ्या वर्गाचं वय वाढल्यानं जास्त वयाच्या नायिका असलेल्या मालिका वर्क होत असल्याचं म्हणेन. ही माझ्यावर झालेली गुरूकृपा आणि आईचे आशीर्वाद असल्याचं मी मानते. या वयात अशा प्रकारचा रोल करायला मिळाला यासाठी झी मराठीची आभारी आहे. मालिका खूप सुरेख लिहीली असल्यानं ती लोकांपर्यंत पोहोचली. छान जमून आलं होतं. या वयात अभिनय माहित असतो, थोडंसं टेक्निक समजलेलं असतं, इमोशन्स चांगल्या प्रकारे जगता येतात, पण अशा वेळी आपल्या देशात आमच्या वाट्याला दुय्यम भूमिका येतात. अशा वातावरणात लीड रोल साकारायला मिळणं हे भाग्यच आहे.

  क्रांतीकारी विचार मांडणारी मालिका
  ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका अतिशय उत्कृष्टपणे लिहीली गेली होती. जसं नाटक हे नटाचं, सिनेमा हा दिग्दर्शकाचं माध्यम आहे, तसा टेलिव्हीजन हा रायटर्सचा मीडिया असल्याचं मला वाटतं. चांगलं होणं किंवा टीका होणं हे सर्व क्रेडीट लेखकाचं आहे. या मालिकेतील विषय अतिशय हळुवार पद्धतीनं हँडल केला गेला होता. सुरुवातीला या मालिकेचं दिग्दर्शन अजय मयेकरनं केलं. अशा प्रकारचा रोल मी यापूर्वी कधी केला नव्हता. मला इनोसन्ट आणि कौटुंबिक लुकमध्ये सादर करण्यात अजयचा खूप मोठा वाटा आहे. नंतर आमच्या टीमला जॅाईन झालेला जयंत पवार, नितीन या सर्व दिग्दर्शकांनीही खूप मेहनत घेतली, पण सुरुवातीची आसावरी बिल्ड करायला लेखक आणि अजय यांचं सहकार्य झाल्याचा नक्कीच उल्लेख करावासा वाटतो.

  …तिनं आईचं लग्न लावलं
  मुलीसारखी सून नाही, तर मैत्रीणी या मालिकेत होत्या. आसावरीला जेव्हा मालिकेत विचारलं जातं की तुला काय आवडतं तेव्हा तिला ते सांगता येत नाही. इतका तिनं कधी विचार केलेला नसतो. स्वत:बद्दलचा विचार करायला सुनेनं शिकवल्यानं त्यांचं नातं हे मैत्रीणीप्रमाणं होतं. ही या मालिकेची ब्युटी होती. यावर मला लोकांच्या भरभरून प्रतिक्रीया आल्या. या मालिकेत सुनबाईनं सासूचं लग्न लावल्याचं दाखवण्यात आलं होतं. ते पाहिल्यावर एका मुलीनं पुढाकार घेऊन तिच्या आईचं दुसरं लग्न लावून दिल्याचं तिनं कळवलं. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. अशा प्रकारे जरी लोकांच्या विचारसरणीत बदल झाला तरी लढाई जिंकल्यासारखं वाटतं. ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेतील व्यक्तिरेखांवर आधारित असलेली ‘अगंबाई सूनबाई’ आल्यानंतर एकाच व्यक्तिरेखेची दोन रूपं करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. याच कारणामुळं मी ‘अगंबाई सूनबाई’ स्वीकारली.

  ग्रामीण बाजाच्या भूमिकेत दिसणार
  या मालिकेनंतर अद्याप कोणताही नवीन प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. मागील साडे चार वर्षांपासून एका मागोमाग एक कामं करतेय. त्यामुळं नक्कीच एखादा चांगला प्रोजेक्ट येईल. आता मी मैथिली जावकरचा एक सिनेमा करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापूरला जाणार आहे. या चित्रपटात माझं वेगळं रूप पहायला मिळेल. यात ग्रामीण बाजाची भूमिका साकारणार असल्यानं ते कॅरेक्टर करताना मजा येणार आहे. काहीतरी वेगळं करण्याचं समाधान मिळेल. मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यामुळ नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करण्याखेरीज आणखी बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकण्याचा विचार आहे. त्यावर कामही सुरू केलं आहे.

  हे तीन नियम पाळाच
  लॅाकडाऊननंतर आता सर्व काही ओपन होण्याची खूप गरज आहे. माणसं कोरोना आणि उपासमारीसोबतच नैराश्येनंही मरणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक लोकांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळं सर्व लवकरात लवकर ओपन होण्याची गरज होती. या गंडांतराच्या काळात राज्य सरकार आणि मनपाचे आभार मानू इच्छिते. मला कोरोना झाला होता तेव्हा रोज बीएमसीमधून कॅाल यायचा. इतकी लोकसंख्या असलेल्या देशात, दाटीवाटीनं वस्ती असलेल्या मुंबईत आपण बऱ्यापैकी कंट्रोल मिळवलेला आहे. परदेशामध्ये कोरोना कंट्रोल करण्याच्या पलीकडे गेला होता. त्या तुलनेत आपल्या सरकारनं खूप चांगलं काम केलं आहे. सरकारवर टीका करणं खूप सोपं आहे, पण तो काटेरी मुकूट धारण करणं कठीण काम आहे. कोरोना टाळण्यासाठी साधे नियम पाळण्याची गरज आहे. स्वच्छता, मास्क आणि फिझीकल डिस्टन्स पाळणं इतकं तर प्रत्येकजण करूच शकतो.