बच्चेकंपनी रंगली जादूच्या घरात!

जगण्यातली विसंगती, संवादांतील बारकावे याचे प्रभावी दर्शन या छोटेखानी संवाद संहितेत होते. मग तो दिवा कोणता? कारकून या नाट्यछटा विशेष गाजलेल्या. दिवाकरांच्या नाट्यछटेची आठवण येण्यामागे कारण ठरले ते पुण्यातील 'नकला नगरी' या कार्यक्रमाचे!

  – संजय डहाळे

  दिवाकरांच्या नाट्यछटा म्हणजे मराठी रंगभूमीवर एक स्वतंत्र दालनच. तो काळ संगीत रंगभूमीचा. पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांचा. त्या काळात शंकर काशिनाथ गर्गे यांनी ‘दिवाकर’ या नावे नाट्यछटेचं पर्व सुरू केलं. बाऊनिंच्या ‘ड्रॅमॅटिक मोनोलॉग’प्रमाणे या नाट्यछटा! ज्यात कॉमनमॅन त्यांनी डोळ्यांपुढे ठेवला. जगण्यातली विसंगती, संवादांतील बारकावे याचे प्रभावी दर्शन या छोटेखानी संवाद संहितेत होते. मग तो दिवा कोणता? कारकून या नाट्यछटा विशेष गाजलेल्या. दिवाकरांच्या नाट्यछटेची आठवण येण्यामागे कारण ठरले ते पुण्यातील ‘नकला नगरी’ या कार्यक्रमाचे!

  नकलाकार, बालनाट्य लेखक-दिग्दर्शक, नाट्य चळवळीचे अभ्यासू रंगकर्मी अशी बहुरंगी ओळख असलेले प्रकाश पारखी यांनी बाल मंडळींसाठी खास ‘नकला नगरी’ हा कार्यक्रम नुकताच फेसबुकवर प्रदर्शित केला आहे. जो आजच्या लॉकडाउनच्या बंधनात मुलांना हक्काची करमणूकच मिळालीय. सोबतच निवडक बच्चेकंपनीसाठी ही ‘नगरी’ प्रत्यक्ष घरात, गॅलरीत, गच्चीत, ओसरीवर सक्रीय आहेच.

  कंठ, ऊर आणि शीर अशी तीन उगमस्थाने स्वरांची सांगण्यात येतात. एक नेहमीचा बोलतानाचा आवाज हा आपल्या कंठातून येतो. तर नम्रपणे संयमाने खालचा सूर हा ऊरातून येतो. आणि ओरडून – वैतागून येणारा आवाज हा शीरातून डोकं भडकणं आपण ज्याला म्हणतो, तेच हे ! एकूणच स्वरांची – सुरांची जादू ही कुठल्याही नाट्याविष्काराची पहिली पायरीच. पण या सुरांपलीकडे कानावर पडणारे निसर्गातील, यंत्रातील, प्रवासातील शेकडो ध्वनी, आवाज, कंपने यांची अस्सल नक्कल केली तर … संहितेतली दिवाकरांची नाट्यछटा आणि सादरीकरणातील स्वरांची जादुगिरी याचं अनोखं मिश्रण अनुभवण्यास मिळेल. आणि नेमका हाच नाट्यमय आविष्कार ‘नकला नगरीत’ सादर करण्यात आलाय.

  एक छोटेखानी गोष्ट. नाव – जादूचं घर. आगगाडीतून राजू आपल्या आई-बाबांसह मामाच्या गावी निघाला आहे. प्रवास सुरू झालेला. एकामागोमाग एक रेल्वे स्टेशन येतात. फेरीवाले आपला माल विकण्यासाठी येताहेत. कंटाळलेल्या राजूला आई ‘जादूचं घर’ हे पुस्तक वाचायला देते. तो त्यात रंगून जातो. गाडी थांबते. आई-बाबा झोपलेले. तो खिडकीतून उडी मारून खाली उतरतो. पुस्तकात असलेल्या डोंगरावरलं ‘जादूचं घर’ त्याला प्रत्यक्ष दिसते. तो चालत तिथे पोहचतो. तिथे एकेक दालन आहे. वाद्यांचं, खाण्याचं, कलाकुसरीचं. राजू बागेत पोहोचतो. तिथे सुंदर परी आणि राक्षस असतो. आणि त्याला पुन्हा आगगाडीत सोडण्यात येतं. राजू झोपेतून जागा होतो. ते एक स्वप्न ठरतं. पण या गोष्टीतलं, आगगाडीचा आवाज, फेरीवाल्यांची ओरड, शिट्टी, रात्रीचा घोरणं, खिडकी उघडण्याची धडपड, रातकिड्यांची किरकिर, पालापाचोळ्यांवर पडलेली पावलं, घड्याळाचे ठोके, दरवाजाची करकर, पक्षांची किलबिल – असे एकापेक्षा एक आवाज हे ‘नाट्य’ जिवंत करतात. शेवटच्या क्षणापर्यंत रंजकता टिकवून राहते.

  हा प्रकार एकपात्री जरी असला तरी तो नकलांनी परिपूर्ण असाच आहे. नकला जरी वाटल्या तरी चेष्टा नाही. कथाकथनात्मक गोष्टीरूप त्याला आहे. आणि सर्वांत वैशिष्ट्य म्हणजे मुलांशी संवाद साधण्याचे अप्रतिम कौशल्य! आजकालच्या गोंधळलेल्या, तणावपूर्ण परिस्थितीमुळे अकाली प्रौढत्व आलेली शाळकरी मुलं बघितली की चिंता वाटते. त्यांच्या हक्काच्या स्वप्नांच्या घरात नेण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न नकलानगरीतल्या या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये आहे. चारी बाजूंनी कोंडमारा झालेल्या मुलांचे दोन घटका मनोरंजन निश्चितच होईल आणि त्यांचे गोष्टी सांगणारे प्रेमळ आजोबाही भेटतील. गेली चाळीस एक वर्षे पुण्यासह उभ्या महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळीला दिशा देणारे तसेच वयाची सत्तरी नुकतीच पूर्ण केलेले प्रकाश पारखी यांच्या प्रदीर्घ अशा अनुभवातून आकार घेतलेला हा कार्यक्रम छोट्यांसह मोठ्यांनाही गुंतवून ठेवतो. त्यांच्या स्वरयंत्रातल्या भन्नाट जादूचेही दर्शन पदोपदी होते. नकलांचे जादुई स्वर-सूर आले जुळूनी, हेच खरे!