नायकाच्या रूपात कपिलचा ‘भोंगा’

पाटील' या चित्रपटात खलनायक साकारल्यानंतर  'भोंगा'मध्ये कपिल नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'नवराष्ट्र'शी खास बातचित करताना कपिलनं आपला संपूर्ण प्रवास उलगडला.

  सिनेसृष्टीचा अजब कारभार कधी कोणाला कोणती संधी देईल हे सांगता येत नाही. इथं कष्ट करणाऱ्याला मेहनतीचं फळ मिळतं हेच खरं आहे. नांदेडमधील कपिल कांबळे या उदयोन्मुख कलाकारानं राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिवाजी लोटण पाटील यांच्यासोबत कॅमेऱ्यामागं राहून सिनेतंत्राचे धडे गिरवले. ‘पाटील’ या चित्रपटात खलनायक साकारल्यानंतर  ‘भोंगा’मध्ये कपिल नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘नवराष्ट्र’शी खास बातचित करताना कपिलनं आपला संपूर्ण प्रवास उलगडला.

  कपिल कांबळे हा चेहरा ‘हलाल’, ‘यंटम’, ‘पाटील’ हे चित्रपट पाहिलेल्या रसिकांसाठी नवखा नाही. कपिलनं या चित्रपटांमध्ये खलनायक साकारला होता. कपिलनं नांदेड विद्यापीठातून एमए थिएटर केलं आहे. २०१४पासून तो नांदेडमध्ये रंगभूमीवर काम करतोय. त्यापूर्वी कॅालेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हल वगैरेंसारख्या स्पर्धांद्वारे नाटकांमध्ये काम करणं सुरूच होतं. एमटीए पूर्ण झाल्यावर विदर्भातील एका ग्रुपसोबत त्यानं दोन व्यावसायिक नाटकं केली. ‘थलवा’ या नाटकाचे महाराष्ट्राबाहेर दिल्ली, मेघालय, आसाम, केरळ या राज्यांमध्येही प्रयोग केले आहेत. तिथे हे नाटक हिंदीमध्ये भाषांतरीत करून सादर केलं. अनिरुद्ध बनकर यांनी या नाटकाची निर्मिती केली होती, तर दिग्दर्शन संगीता टिपले यांनी केलं होतं. याशिवाय ‘कार्यकर्ता’ हे एक व्यावसायिक नाटक केलं. ‘भोंगा’मध्ये साकारलेल्या कॅरेक्टरबाबत कपिल म्हणाला की, यात मी सादिक नावाच्या मुस्लिम तरुणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा याच कॅरेक्टरभोवती गुंफण्यात आली आहे. ‘भोंगा’चे दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनीच मला ‘पाटील’ या चित्रपटात ब्रेक मिळवून दिला होता. त्यातील काम पाहून सरांनी ‘भोंगा’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. यापूर्वी मी बऱ्याच चित्रपटांसाठी पाटीलसरांना असिस्ट केलं आहे.

  आई-वडील आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये कार्यरत असतानाही अभिनयाकडे वळण्याबाबत कपिल म्हणाला की, गुडसूर हे माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात आहे. माझा जन्म पुण्यात झाला. वडील कामगार रुग्णालयात कामाला असल्यानं आम्ही त्यावेळी पुण्यात रहायचो. त्यानंतर आईला नांदेडमध्ये नर्सची आॅफर आली. आईसाठी आम्ही नांदेडमध्ये शिफ्ट झालो. माझं बालपण आणि शिक्षण तिथेच झालं. कॅालेजच्या गॅदरींगपासून माझ्या अभिनयाची खरी सुरुवात झाली. तिथं मी कायम पुढे असायचो. सतत नाटकं करायचो. युथ फेस्टिव्हलला सर्व टीम घेऊन जायचो. प्रिंसिपल वाकोडकरसरांसोबत इतरही शिक्षकांनी खूप सहकार्य केलं. त्यांनी ललित कला केंद्रात प्रवेश घ्यायला सांगितलं, पण त्यावेळी तब्बेतीचा प्रॅाब्लेम झाल्यानं तिथं जाऊ शकलो नाही. त्याच वेळी नांदेडमध्येही नाट्य विभाग सुरू करण्यात आल्यानं तिथं शिक्षण घेतलं. पाटीलसरांना असिस्ट करू लागल्यापासून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या.

  खलनायक नहीं नायक हू मैं
  ‘पाटील’ चित्रपटामध्ये खलनायक साकारल्यानंतर ‘भोंगा’ साकारणं तसं आव्हानात्मकच होतं. मुस्लिम कॅरेक्टर असल्यानं जॅानर पूर्ण वेगळा होता. हा मुस्लिम असला तरी मराठी बोलणारा आणि किर्तनही ऐकणारा आहे. याचं एक हॅाटेल आहे. या कॅरेक्टरची देहबोली, बोलीभाषा आणि एकूणच स्वभाव सादर करणं हा माझ्यासाठी एक टास्क होता. मुस्लिम असल्यानं त्याची मराठी कशी असेल याचा अभ्यास केला. खेडेगावाशी माझा अधिक संपर्क असल्यानं या लोकांची मला थोडी माहिती होती. पाटीलसरांनी जेव्हा मलाच हा रोल करायचा असल्याचं कन्फर्म सांगितलं, तेव्हा मी एका हॅाटेलवाल्याचा अभ्यास केला. नेहमी हॅाटेलवर जाऊन बारकाईनं निरीक्षण करायचो. बोलता-बोलता चहा कसा करतात, कशा प्रकारे गिऱ्हाईकांना ट्रीट करतात, त्यांची शैली कशी आहे या गोष्टींचं निरीक्षण केलं.

  मराठवाड्यातील बोलीभाषा
  बोलीभाषा मराठवाड्यातील असल्यानं त्यावर फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. खरं तर या चित्रपटात काम केलेले बहुतेक कलाकार पाटीलसरांचे असिस्टंटच आहेत. आजवर कमी तिथे आम्ही अशा पद्धतीनं कामं केली आहेत. आमचा ड्रामा झालेला असल्यानं सर्व गोष्टी ठाऊक आहेत. सरांचा आमच्यावर विश्वास असल्यानं त्यांनी ‘भोंगा’मध्ये सर्वांना संधी दिली. आम्ही बरेचसे कलाकार मराठवाड्यातील असल्यानं स्क्रीप्टवर चर्चा आणि सरांशी सल्लामसलत करून आम्ही अभिनय केला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या मांदुरणे या सरांच्याच गावी ‘भोंगा’ शूट केला आहे. यात माझ्या जोडीला दिप्ती धोत्रे, श्रीपाद जोशी, अमोल कागणे, पवन वैद्य, रमेश भोळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. स्क्रीनप्ले पाटीलसरांनीच लिहीला असून, संवाद निशांत धापसे यांनी लिहिले आहेत. रामाणी दास यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. झी टॅाकीजवर या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. अमोल कागणे फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती पाटीलसरांनी अरुण महाजन यांच्या साथीनं केली आहे.

  माणूसकीचं दर्शन घडवणारे दिग्दर्शक
  राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक खूप मोठा असतो. त्यांचा आपला एक अॅारा असतो, पण पाटीलसरांसोबत काम करताना मला तसं कधीच जाणवलं नाही. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरूनही पाटीलसरांना मुळीच गर्व नाही. प्रत्येक प्रोजेक्ट ते एखाद्या कोऱ्या कागदाप्रमाणे करतात. कामाच्या वेळेत कधीच तडजोड करत नाहीत, पण इतर वेळी आम्हा सर्वांना खूप समजून घेतला. त्यांचं वागणं एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणं नव्हे, तर मित्राप्रमाणे असतं. त्यामुळं इतकी वर्षे त्यांच्या सहवासात काम करताना एका दिग्दर्शकासोबत वावरतोय असं कधीच वाटलं नाही. त्यांचं व्हिज्युअलायझेशन खूप सुरेख आहे. कोणत्याही विषयाच्या मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सर्व गोष्टी लॅाजिकली आणि विचारपूर्वक सादर करतात. संपूर्ण फिल्म त्यांच्या डोक्यात असते. त्यामुळं सेटवर फार उशीर लागत नाही. हा सिनेमा आम्ही १४ दिवसांमध्ये शूट केला आहे. त्यांचं व्हिजन प्रॅापर आहे.

  भोंग्यांचा त्रास होतोच
  ‘भोंगा’मध्ये सादर केलेल्या विषयाची आज खरी समाजाला गरज आहे. आरसा दाखवण्याची आवश्यकता आहे. समाजात वावरताना आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष्य करतो. आज आपल्याकडे किती ध्वनी प्रदूषण आहे याचा कोणी विचार करत नाही. सिग्नलला थांबल्यावरही हॅार्न वाजवला जातो, मिरवणूकांमध्ये डीजेची धामधूम असते, राजकीय सभांमध्येही मोठ्या आवाजात भोंगे वाजतात, याचप्रमाणं मशिद-मंदिरांवरील भोंग्यांचाही त्रास होतो. याचा इफेक्ट कालांतरानं जाणवू लागतो. ध्वनीप्रदूषणाचा हा विषय ग्लोबल आहे. श्रद्धापूर्वक देवाकडं प्रार्थना करण्यासाठी भोंगे कशाला हवेत? हा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा वीजच नव्हती, तेव्हा कुठे भोंगे होते. देवाला नमन करण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज आहे का, याचा प्रत्येकानं विचार करायला हवा. या चित्रपटाकडे लोकांनी धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता माणूस म्हणून आपल्या हातून काय चुका घडत आहेत याचा विचार करायला हवा.