मराठीला ग्लोबल बनवण्याचा ‘प्लॅनेट मराठी’चा वसा!

'नवराष्ट्र'शी विशेष संवाद साधत 'प्लॅनेट मराठी'चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी आजवरचा प्रवास व आगामी योजनांबाबत माहिती दिली.

  ओटीटी हे आजच्या काळातील माध्यम असल्याचं आता सिद्ध झालं आहे. जगभरातील आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॅार्मच्या खांद्याला खांदा लावून मराठीला ग्लोबल बनवण्यासाठी आणि जागतिक पातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ या केवळ मराठीला वाहिलेल्या ओटीटीची निर्मिती करण्यात आली आहे. इथं प्रदर्शित झालेल्या ‘जून’ या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं कौतुक झाल्यानंतर ‘नवराष्ट्र’शी विशेष संवाद साधत ‘प्लॅनेट मराठी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी आजवरचा प्रवास व आगामी योजनांबाबत माहिती दिली.

  अक्षय बर्दापूरकर यांच्याबाबत थोडक्यात माहिती द्यायची झाली तर त्यांची सुरुवात ‘रेगे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटापासून झाली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती केल्यानंतर ‘एबी आणि सीडी’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांची निर्मिती अक्षय यांनी केली आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या संकल्पनेबाबत अक्षय म्हणाले की, मराठी मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॅार्म नव्हता. २०२०मध्ये आम्ही जेव्हा ‘एबी आणि सीडी’ रिलीज केला, त्यावेळी तो पूर्णत: रिलीज होऊ शकला नाही. कारण रिलीज झाला त्याच दिवशी लॅाकडाऊन लागला. आमचा चित्रपट अॅमेझॅाननं विकत घेतल्यानं थोडीफार भरपाई झाली. त्यात आम्हाला डिजिटल पोटेंशियल खूप दिसलं. त्या वेळी लॅाकडाऊन नेमकं काय आहे? किती दिवस चालेल? हे स्पष्ट नव्हतं. लॅाकडाऊन जसा वाढत गेला तसा आमचा आत्मविश्वास वाढत गेला. पुढील किमान १० वर्षे तरी ओटीटी गाजवणार यावर शिक्कामोर्तब झालं. टेलिव्हीजनचा एक वेगळा आॅडीयन्स आहे यात शंका नाही, पण टीव्हीदेखील आता अॅपवर आला आहे. त्यामुळं अॅपवर टीव्ही पाहण्याऐवजी नवीन जनरेशनला खास या प्लॅटफॅार्मसाठी बनवलेले काँटेंट खुणावत होतं. यात फक्त मराठी मिस होत होतं. ठोस प्लॅटफॅार्म नसल्यानं मराठी वेब सिरीजही विखुरल्या गेल्या होत्या. त्यांना एकाच प्लॅटफॅार्मवर आणण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ची संकल्पना समोर आली.
  केवळ वेब सिरीजच नव्हे तर गाणी, चित्रपट, टॅाक शो असा स्वतंत्र मराठी काँटेंट देणारा प्लॅटफॅार्म करावंसं वाटलं. माझ्यासारख्या निर्मात्याला जर अॅमेझॅान नुकसानापासून वाचवू शकलं तर आपण स्वतंत्र प्लॅटफॅार्म बनवून इतरांना वाचवू शकत नाही का? हा विचार मनात आला. त्यावेळी उत्तर मिळालं, होय, ‘जून’ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहे. हेच व्हिजन ठेवून आता पुढल्या काही वर्षांमध्ये वाटचाल केली जाणार आहे. उद्या कितीही भयावह परिस्थिती आली तरी मराठी एन्टरटेन्मेंट लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड जाणार नाही. मराठीच्या कक्षा रुंदावण्याचं काम नेहमीच प्लॅनेट मराठीनं केलं आहे. मराठीला ग्लोबल सिनेमा बनवण्याचा वसा प्लॅनेट मराठीनं घेतला आहे. ‘चंद्रमुखी’सारखा एक उत्तम विषय घेऊन त्याला प्रसाद ओक आणि अजय-अतुलची जोड देणं असो, वा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट असो प्लॅनेट मराठीनं पदार्पणातच वेगळे चित्रपट देण्याचा धडाका सुरू केला आहे. सोनाली कुलकर्णीचा ‘छत्रपती ताराराणी’ हा देखील याच वाटेवरचा चित्रपट असेल. यासोबतच इतरांचेही चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज करणारं ‘प्लॅनेट मराठी’ हे सध्याचं एकमेव माध्यम आहे. ‘जॅाबलेस’, ‘सोपं नसतं काही’, ‘बाप बिप बाप’, ‘परीस’, ‘अनुराधा’ या वेगवेगळ्या विषयांवरील वेब सिरीज आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

  अशी सुरू झाली प्रोसेस
  मागच्या वर्षी मे महिन्यात आता काय करायचं? पुढे सिनेमांचं काय होणार? अशी सर्वत्रच चर्चा सुरू होती. एकदा असाच पुष्कर श्रोत्रीसोबत बोलत असताना मराठी ओटीटी नसण्याबाबत विषय छेडला गेला. ते करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान, स्टॅटेस्टीक्स, फिगर्स आणि फॅक्टस जाणून घेण्यासाठी आदित्य ओक, सौम्या वेळेकर (को-फाऊंडर) यांच्यासोबत पुष्करचे आणि माझे बरेच झूम कॅाल्स झाले. मागच्या वर्षी जून अखेरपर्यंत आपण करूया या विचारावर ठाम झालो होतो. ही युनिक आयडीया घेऊन आम्ही चांगल्या इन्व्हेस्टर्सपर्यंत पोहोचलो. फर्स्ट मुव्हर्स अॅडव्हान्टेज आम्हाला मिळाला. प्लॅनेट मराठीची घोषणा केल्यानंतर इंडस्ट्रीचाही सपोर्ट मिळाला आणि फायनान्सलाही हातभार लाभला. एखादा चित्रपट बनवण्यासाठी जो खर्च येतो त्याच्या निम्म्या किंवा त्याहीपेक्षा अर्ध्या किंमतीत एखादी वेब सिरीज करून देणं हे आम्हाला सपोर्ट मिळाल्याची पावती होती. त्यांचा आमच्यावर विश्वास असल्यानंच ते आमच्या सोबत आले. अमित भंडारी (काँटेंट हेड आणि सिनीयर वाईस प्रेसिडेंट) आणि जयंती वाघधरे (असिस्टंट वाईस प्रेसिडेंट सोशल मीडिया) हे जाणकार आमच्यासोबत आल्यानं काम आणखी सोपं झालं आहे.

  planet marathi
  मराठीत नव्या पर्वाची सुरुवात
  प्लॅनेट मराठीचा फायदा संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला होणार आहे. जर आम्ही महिन्याला दोन अशाप्रकारे वर्षाला २४ वेब सिरीज घेऊन आलो, तर मोठ्या प्रमाणात कास्टिंग होईल, नवोदितांना संधी मिळेल, प्रस्थापितांनासोबतच तंत्रज्ञ आणि कामगारांच्याही हाताला काम मिळेल. हे केवळ वेब सिरीजबाबत झालं. याखेरीज काही सिनेमे करू, काही चॅट शो करू, काही गाणी करू. अशा प्रकारे इंडस्ट्रीसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण करत आहोत. हे वेगवेगळ्या विषयांवरील मनोरंजन आपण अत्यंत अल्प दरात लोकांना देणार आहोत. दिवसाला केवळ एक रुपया, महिन्याला ३० रुपये आणि वर्षाला ३६५ रुपयांमध्ये रसिकांना मनसोक्त मराठमोळं मनोरंजन मिळणार आहे. दिवसाला एक रुपया खर्च करणं महाराष्ट्रातील कोणत्याही मराठी माणसाला अवघड जाईल असं मला वाटत नाही.

  रिसर्च करून उतरलो आहोत
  मराठी इंडस्ट्रीला अद्यापही हवं तसं यश मिळालेलं नाही. एखाद-दुसरा सिनेमा वगळता बाकी इतरांची कमाई जेमतेम होते. या तुलनेत हिंदीत सिनेमा बनवायला गेल्यावर फायनान्स करायला बरेच लोक पुढाकार घेतील. याचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे, पण आम्हाला रिसर्च करताना एक गोष्ट समजली की, भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट स्टेट आणि सेकंड लार्जेस्ट स्पिकींग लँग्वेज मराठी आहे. जगात ही तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्याही खूप आहे. पहिल्या नंबरवर बंगाली इंडस्ट्री आहे, पण त्यांना बांग्लादेशचा फायदा होतो. दुसऱ्या क्रमांकावर असलेला मराठी आॅडीयन्स बॅालिवूडला प्रतिसाद देत असेल, तर तो मराठीत त्याच तोडीचा काँटेंट आल्यावर प्रतिसाद देणार नाही का? ‘समांतर’ याचं उत्तम उदाहरण आहे. सर्वांनी न पाहता केवळ एक-दोन कोटी लोकांनी जरी पाहिला तरी आर्थिक गणितं सुटू शकतात याची खात्री होती. इन डिटेल आणि इन डेप्थ अभ्यास केल्यानं हे जगातलं पहिलं मराठी ओटीटी असल्याचं आम्ही समजावून सांगू शकलो. आज तुलना करण्यासाठी आमच्या बरोबर कोणीच नाही. पहिला असल्याचा हा फायदाच म्हणावा लागेल.

  ही आमची जबाबदारी
  महाराष्ट्र खूप मोठा असून, मनोरंजनाच्या सर्व सुविधांनी सज्ज आहे. इथं वाय-फाय आहे, शूटिंग एरीया आहे, शिकलेल्या प्रेक्षकांची संख्या खूप असल्यानं अॅप पहाणं मराठी प्रेक्षकांसाठी फार सोपं आहे. त्यामुळं हा बिझनेस डेफिनेटली प्रॅाफिटेबल असेल. चांगला काँटेंट बनवणं ही आता आमची जबाबदारी आहे. तुम्ही कितीही सुंदर अॅप बनवला किंवा फुकट काँटेंट दिला आणि त्याला दर्जा नसेल तर लोकं तुमच्या प्लॅटफॅार्मवर येणार नाहीत. आले तरी तेवढं ट्रॅक्शन मिळणार नाही. या सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टींग कंपनीला कन्व्हेन्स केल्या आणि मराठी इंडस्ट्रीतूनही सपोर्ट मिळाल्यानं प्लॅनेट मराठीनं ही गरुडझेप घेतली आहे. आमच्या गौरवगीतामध्ये सचिन पिळगावकरांपासून विक्रम गोखलेंपर्यंत टॅापचे ४० आर्टिस्ट आहेत. हेच प्लॅनेट मराठीचं वैभव आहे. इथं आपुलकीची भावना आहे.

  हेल्दी कॅाम्पिटीशन
  मराठी ओटीटीच्या स्पर्धेतही कॅाम्पिटीशन असायलाच हवी. त्याशिवाय तुम्ही तुमचं काम चांगलं करू शकत नाही. एकमेव असताना आपण जे करतोय तेच चांगलं आहे असं वाटत असतं. आज एखादा चित्रपट प्लॅनेट मराठीकडे विक्रीसाठी आला आणि तोच इतर कोणत्याही प्लॅटफॅार्मकडे गेला, तर किंमतीची चढाओढ सुरू होते. ही हेल्दी कॅाम्पिटीशन असते. ज्यातून आपल्याला आपल्या दरामध्ये चांगलं काँटेंट असलेलं प्रोडक्ट घेता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे जो बनवतो त्याला पर्याय मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना म्हणजे प्रेक्षकांना आॅप्शन मिळतो. जे कोणी मराठी ओटीटी बनवू इच्छितात ते आपापला रिसर्च करून येतील, पण केवळ अॅप बनवणं किंवा केवळ कंपनी सुरू करणं कदाचित कोणीही करू शकतं, पण उत्तम देता येणं गरजेचं आहे. आमच्यासोबत जशी संपूर्ण इंडस्ट्री उभी आहे, तसं त्यांनीही इंडस्ट्रीला सोबत घेऊन काम केलं तर त्यांना यश मिळू शकतं. सध्या बऱ्याच विषयांवर काम सुरू आहे. यात अवॅार्ड फंक्शन करणार आहोत. प्लॅनेट मराठीचं एक दिवसाचं कॅानक्लेव्ह करणार आहोत. असे विविध उपक्रम राबवणार आहोत. भविष्यात संजय जाधवचा ‘तमाशा लाईव्ह’ आणि सोनाली कुलकर्णीचा ‘छत्रपती ताराराणी’ हे महत्त्वाचे चित्रपट येतील.