दत्तगुरूंच्या आशीर्वादानं ‘सारेगमप’चं नवं पर्व गाजवण्यासाठी प्रथमेश लघाटे सज्ज!

सर्वांचा लाडका मोदक म्हणजे प्रथमेश लघाटेनं 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना लवकरच 'सारेगमप - लिटील चॅम्प्स' रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत दिले.

  जवळपास बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप – लिटील चॅम्प्स’मधील पंचरत्नानं केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमींवर मोहिनी घातली होती. पंचरत्न म्हणून नावारूपाला आलेल्या त्या चिमुरड्या गायकांच्या आठवणी आजही सर्वांच्या मनात ताज्या आहेत. आता एक तपानंतर पंचरत्न पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर धमाल करण्यासाठी येणार आहेत. या पंचरत्नांपैकी एक असलेला सर्वांचा लाडका मोदक म्हणजे प्रथमेश लघाटेनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना लवकरच ‘सारेगमप – लिटील चॅम्प्स’ रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत दिले.

  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या आरवली गावातील प्रथमेश लघाटेनं बारा वर्षांपूर्वी बहारदार गायकीच्या बळावर आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. घरातील दत्तगुरू संप्रदायाच्या परंपरेत घडलेल्या प्रथमेशनं आज देश-विदेशात नावलौकिक मिळवला आहे. मागील ९१ वर्षांपासून दर गुरुवारी त्याच्या घरी न चुकता भजन केलं जातं. भजनाच्या याच संस्कारातून गायक बनलेला प्रथमेश पुनश्च ‘सारेगमप…’मध्ये येण्याबाबत म्हणाला की, लवकरच ‘सारेगमप – लिटील चॅम्प्स’चं नवं पर्व सुरू होणार आहे. यात माझ्यासोबत आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत. यावेळी आम्ही स्पर्धक म्हणून नव्हे, तर ज्युरी या नात्यानं या शोचा भाग असणार आहोत. आॅडीशनची प्राथमिक फेरी पार पडली असून, लॅाकडाऊन शिथील झाल्यावर जेव्हा शूटिंगला परवानगी मिळेल, तेव्हा ‘सारेगमप – लिटील चॅम्प्स’च्या प्रसारणाची तारीखही घोषित केली जाईल. बारा वर्षांमध्ये पाचही जण एकमेकांपासून कधीच दूर गेलो नव्हतो. कायम एकमेकांच्या टचमध्ये होतो. आता पुन्हा मजा-मस्ती सुरू झाली आहे.

  ‘सारेगमप – लिटील चॅम्प्स’नं मोठा ब्रेक दिल्यानंतर पुन्हा तिथेच परतण्याबाबत प्रथमेश म्हणाला की, एखादी व्यक्ती शिक्षण घेण्यासाठी कुटुंबापासून दूर परदेशी जाते आणि मग शिक्षण घेऊन परतते तशी भावना मनात आहे. सारेगमप ही आमची फॅमिलीच आहे. मधल्या बारा वर्षांच्या काळात आमचं खऱ्या अर्थानं शिक्षण सुरू होतं आणि अजूनही सुरूच आहे. आता पुन्हा एकदा या कुटुंबाशी जोडले जाणार असल्याचा प्रचंड आनंद होतोय. ‘सारेगमप’चा प्लॅटफॅार्म केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नव्हता किंवा केवळ फेम मिळवण्यापुरता नव्हता. त्याने आमच्या सर्व बाजू अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप केल्या. मुख्यत्वे सांगितीक बाजू. दिग्गजांचा सहवास लाभला. मोठमोठ्या इव्हेंट्सला गेल्यावर वेळेचं पालन करायला शिकलो. अंगी वक्तशीरपणा आला. म्युझिकली बऱ्याच गोष्टी समजल्या. सुरुवातीला मी अभंग, भावगीत, नाट्यसंगीतच गायचो, पण इथं आल्यावर वेगवेगळे फॅार्म्स गायला मिळाले. लोकसंगीताचा बाज ट्राय केला. वेस्टर्नाइज गाणी गायली. लतादीदी मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, किशोरी आमोणकरांसारख्या दिग्गजांचे आशीर्वाद लाभले. पर्सनॅलिटी आणि म्युझिकल डेव्हलपमेंटचा फायदा झाला.

  ९१ वर्षांची दत्तपरंपरा

  मागील ९१ वर्षांपासून एखादी परंपरा अखंडीतपणे सुरू ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामागं खूप मोठी पुण्याई असावी लागते. माझे खापर पणजोबा, पणजोबा यांनी दत्तगुरूंच्या भजनाची परंपरा सुरू केली. गुरुवार भजन परंपरेची सुरुवात १९२९ मध्ये झाली. पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी पर्याय नसायचा. त्यावेळी वीज नव्हती. त्यामुळे दिवस मावळला की, दर गुरुवारी मंडळी पत्ते खेळायला एकत्र जमायची. त्यातून माझ्या पूर्वजांच्या मनात एक संकल्पना आली. पत्ते काय केव्हाही खेळता येऊ शकतात, पण दर गुरुवारी देवाचं नामस्मरण किंवा भजन केलं तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. यातून गुरुवार भजन परंपरा सुरू झाली. या गुरुवार भजन परंपरेतूनच मी घडत गेलो.

  वारसा गणेशमूर्ती घडवण्याचा…

  आमचं एकत्र कुटुंब आहे. त्यामुळं घरी खूप जण आहेत. आई गृहिणी आहे. गणपतीची मूर्त्या बनवण्याचा आमचा व्यवसाय आहे. दरवर्षी गणेशाच्या जवळपास १२०० मूर्त्या आमच्या कार्यशाळेत बनवल्या जातात. हेच काम वर्षभर सुरू असतं. आमच्याकडे वेगळे कारागीर नाहीत. आम्ही घरचेच सदस्य सर्व कामं करतो. दहावीपर्यंत मी गावी मागझन हायस्कूलमध्येच शिकलो. मॅाडर्न कॅालेज, शिवाजी नगर, पुणे येथून अकरावी-बारावी कॅामर्स केलं. त्यानंतर म्युझिकवर फोकस करण्यासाठी एफवायपासून आर्टसमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमधून बाहेरून शिक्षण घेतलं. बीए हिस्ट्री आणि मराठी लिट्रेचरमधून केलं. त्यानंतर भारतीय विद्यापीठ, पुणे येथून म्युझिकमधून एमए केलं.

  आम्ही चालवू हा पुढे वारसा…

  गायकीचा वारसा माझे काका गजानन लघाटे आणि चुलत भाऊ पराग लघाटे यांच्याकडून लाभला. त्यांच्याकडून बेसिक शिक्षण घेतलं. लहान असताना तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होताना त्यांच्या मार्गदर्शनामुळं यशस्वी झालो. शास्त्रीय संगीताची सुरुवात मी चिपळूणमधील सतीश कुंटे आणि वीणा कुंटे यांच्याकडे केली. त्यानंतर पुण्यात डॅा. विकास कशाळकर यांच्याकडे दोन वर्षे शिकलो. मध्यंतरीच्या काळात एक्स्टरनल कॅालेज करताना रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेल्या प्रसाद गुळवणींकडे दोन वर्षे गाणं शिकलो. दोन-अडीच वर्षे पं. जयतीर्थ मेवूंदी यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले. काही दिवस ठाण्यातील ए. के. अभ्यंकर यांच्याकडेही शिकलो. मागील दोन वर्षांपासून मी ठाण्यातील पं. सुरेश बापट यांच्याकडे शिकतोय.

  ज्युरींच्या भूमिकेत प्रथमच…

  आम्ही यापूर्वी ज्युरी म्हणून काम केलं नसलं तरी स्वत:ही काही प्रिपरेशन करत आहोत. आॅडीशनपासून आम्ही सहभागी असल्यानं सहभागी झालेल्या मुलांची गाणी ऐकली आहेत. आम्हाला जे उमगले ते पॅाईंटस नोट करून ठेवले आहेत. आजवर खूप गाणं गायलं आणि ऐकल्यानं उत्तम गायन कशाला म्हणतात याबाबत एक क्रायटेरीया मनात तयार झालेला आहे. त्याचा फायदा होईल. आम्ही खूप ज्युनियर असलो तरी मागील १२ वर्षांमधील अनुभव खूप छान आहे. वेगवेगळ्या प्रकारचं गाणं ऐकायला मिळालं. त्यातून काय ऐकायला हवं आणि काय नको हे बऱ्यापैकी समजायला लागलं आहे. याचाही उपयोग होईल. कोणाचा गळा चांगला, कोणाची तान छान, कोणावर मेहनत घेता येऊ शकते या गोष्टीही समजत असल्यानं आमच्यासाठीही एक वेगळा अनुभव ठरणार आहे. आताची मुलं टॅलेंटेड आहेतच, पण स्मार्टही आहेत. त्यामुळं मजा येणार आहे.