मालिकांमुळे विविध भुमिका करायची संधी मिळाली- रेश्मा शिंदे

मालिकांमध्ये रमणारी रेश्मा शिंदेने रंग माझा वेगळा या मालिकेबरोबरच तिचा आत्तापर्यंत प्रवास खास नवराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे.

  स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने सर्वांचंच लक्ष वेधलं. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. याच विषयावर आधारीत ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील रेश्माच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. या मालिकेच्या आधी रेश्माने अनेक मालिकांमध्ये काम केली. पण आत्तापर्यंत निगेटीव्ह भूमिकांमध्ये दिसणारी रेश्मा या मालिकेच्या निमित्ताने वेगळ्या रूपात सगळ्यांसमोर आली आहे. मालिकांमध्ये रमणारी रेश्मा शिंदेने रंग माझा वेगळा या मालिकेबरोबरच तिचा आत्तापर्यंत प्रवास खास नवराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे.

  ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमामुळे रेश्माला महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घरात पर्यायाने त्यांच्या मनात स्थान मिळवण्याची संधी मिळाली. त्यानंतर तीने कधी मागे वळून बघितलं नाही. ‘बंध रेशमा’चे. त्यानंतर ‘विवाह बंधन’, ‘लगोरी’, ‘नांदा सौख्यभरे’ ‘चाहूल १, चाहूल २’ अशा एकामागून एक मालिका तिने केल्या. कधी खलनायिका तर तर कधी नायिका साकारत रेश्मा प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री झाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

   

  मी शाळेत असताना नृत्य किंवा नाटक करण्याची मला संधी मिळाली नाही. मात्र, मी ज्यावेळी कॉलेजला गेले, त्यावेळी एका डान्स ग्रुपमध्ये सहभागी झाले. खरतर मी या क्षेत्रात काम करायचं अशी माझ्या आजीची खूप इच्छा होती. त्यामुळे आता आजीची इच्छा पुर्ण करतेय. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाची जाहिरात टीव्हीवर झळकली. मग आईने मला कार्यक्रमात भाग घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी तयारी केली आणि ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोच्या ऑडिशनसाठी गेले. एक-एक करत यामध्ये माझी निवड होत गेली. त्यानंतर यामुळे मला माझी पहिली मालिका मिळाली. ऑडिशन म्हणजे नेमकं काय? त्यासाठी काय करायला हवं यातलं काहीच मला माहिती नव्हती. दिग्दर्शक राजीव पाटील यांनी मला शिकवलं की कॅमरासमोर काय अपेक्षीत आहे. कॅमरासमोर कसं उभं रहायचं, कसं बोलायचं. त्यानंतर मालिका करत गेले आणि मला समजलं की मालिका माध्यम किती स्ट्राँग आहे ते. जसजश्या मालिका केल्या तसा तसा अभिनय शिकत गेले. स्वत:ला पॉलिश करत गेले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

  मारवाडी भूमिका साकारताना…

  मालिका हिंदी असली तरी माझं काम तेच होतं. फक्त माझी मातृभाषा मराठी आहे. त्यातच इतके वर्ष काम केलं होतं. हिंदी मालिका त्यातही मारवाडी भाषा होती. नुसतच थारेको, मारेको म्हणून चालणार नव्हतं. तर भाषेचा लहेजा, बॉडी लँग्वेज, त्यांची उठण्या बसण्या बसण्यासठी पद्धत ये सगळं या मालिकेच्या निमित्ताने मला शिकायला मिळालं. त्यामुळे शिकलेही खूप मज्जाही केली. या मालिकेत मी खलनायिकाच साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. एखाद्या कलाकाराचं काम बघून समोरच्याकडून मिळणारा रिस्पेक्ट हा कलाकारासाठी कायमच खास असतो.

  दिपा माझ्या विरूद्ध

  दिपा ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण आजपर्यंत मी खूप खलनायिका साकारल्या होत्या. त्यामुळे नायिका साकारणं आणि प्रेक्षकांनी ते मान्य करणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. एकतर रेश्मा आणि दिपामध्ये खूप फरक आहे. दिपाही फार समजूतदार आहे आणि शांत आहे. तर मी बरोबर वेगळी आहे. मी पटकन पॅनिक होते, एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रीया देते. त्यामुळे दिपाकडून मी कायम शिकायचा प्रयत्न करते की सकारात्मकपणे एखाद्या घटनेकडे कसं बघायचं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

  प्रेक्षकांचे आभार…

  महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्यामुळे सगळ्याच वाहिन्यांनी इतर राज्यात जाऊन शुटींगला सुरूवात केली आहे. मी प्रेक्षकांचे आभार मानेन की अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की मनोरंजन थांबलं तरी चालेल पण कलाकार सुरक्षित राहिले पाहिजेत. त्या सगळ्या प्रेक्षकांना सांगते की, आम्ही कलाकार आमची पुर्ण काळजी इथे घेत आहोत. आमच्या प्रत्येकाच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. ४५ वर्षावरील सगळ्यांनी कोरोनाची लसही घेतली आहे. लवकरच आम्हीही घेणार आहोत. कमी लोकांमध्ये आणि एकाच जागी राहून आम्ही मालिकांचे शुटींग पुर्ण करत आहोत. गोव्यात असलो तरी अजिबात मज्जा, मस्ती न करता केवळ कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आपण सगळेच घरात होतो. पण यावेळी सगळ्यांनीच या गोष्टीकडे सकारात्मकतेने बघून शो मस्ट गो ऑन असचं मह्णत पुन्हा कामाला सुरूवात केली आहे.

  ही तर भूमिकेची गरज

  ट्रोलर्सकडे अजिबात लक्ष देत नाही. ज्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो तो त्याने घ्यावा. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे मला कळतं. मालिकेच्या सुरूवातीला अनेकांनी दिपाच्या रंगावरून किंवा मेकअपवरून मला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या मालिकेचा उददेश एकच आहे की समाजात कुठेतरी अजूनही वर्णभेद आहे तो संपावा. यासाठी आमच्यापरीने आम्ही प्रयत्न करतोय. रंग, रूप सर्व क्षणिक आहे हेच आम्हाला आमच्या मालिकेतून दाखवायचं आहे. मी कलाकार म्हणून याकडे बघताना मला वेगळं करण्याची संधी मिळाली असं म्हणून बघते. आमच्या प्रोडक्शनने या भूमिकेसाठी योग्य ती मुलगी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना योग्य ती मुलगी मिळाली नाही, अखेर हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे कोणाचाही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. केवळ भूमिकेची गरज म्हणून काळा रंग लावून भूमिका साकारणं गरजेचं होतं.