sai tamhnkar

'समांतर २' च्या निमित्तानं सईनं 'नवराष्ट्र'च्या वाचकांशी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला आहे.

  समांतर रेषेतील नशीब असणाऱ्या दोन व्यक्तींवर आधारीत असलेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजचा दुसरा भाग सध्या खूप गाजतोय. ‘समांतर २’मध्ये सई ताम्हणकरनं साकारलेल्या दोन व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मोहिनी घालत आहेत. यात सईनं साकारलेल्या मीरासोबतच सुंदराही प्रेक्षकांच्या मनामध्ये भरली आहे. या वेब शोच्या निमित्तानं सईनं ‘नवराष्ट्र’च्या वाचकांशी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला आहे.

  मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही मनमोहक, बोल्ड आणि धाडसी साकारणारी सई ताम्हणकर ‘समांतर २’मध्ये पुन्हा एकदा दोन भिन्न व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘समांतर’सारख्या गाजलेल्या शोच्या दुसऱ्या भागात संधी मिळण्याबाबत सई म्हणाली की, ‘समांतर’चा पहिला भाग आला तेव्हा याच्या पुढील भागात आपण असू हे ध्यानीमनीही नव्हतं. स्वप्नील आणि मीसुद्धा याबद्दल कधीच बोललो नाही. त्यामुळं जेव्हा समीरचा फोन आला, तेव्हा मला सुखद धक्का बसला. कारण एक सक्सेसफुल शो आणि त्यात दुहेरी भूमिका ही माझ्यासाठी पर्वणी होती. त्यामुळं मी लगेच होकार दिला. ‘समांतर २’ लोकांना फारच आवडत असल्याचा खूप आनंद आहे. मी फार वर्षांपासून अशा प्रकारच्या भूमिकेच्या प्रतिक्षेत होते. अशा प्रकारची वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची इच्छा होती. कारण मेन स्ट्रीम करताना असे रोल फार क्वचित येतात. त्यामुळं या रोलसाठी माझा विचार होतोय यातच मी खूश होते. मला स्वत:ला चॅलेंजेस स्वीकारायला आवडतात. त्यामुळं ‘समांतर २’ या वेब शोच्या निमित्तानं सर्व आवडीच्या गोष्टी जमून आल्या.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

  पुन्हा एकदा स्वप्नील व समीरसोबत आणि प्रथमच नितीश भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याबाबत सई म्हणाली की, स्वप्नीलबरोबर काम करायला मला फारच आवडतं. आम्ही चांगले मित्रही आहोत. त्यामुळं त्याच्यासोबत काम करण्याची वेगळीच एक्साइटमेंट असते. नितीशसरांसोबत पहिल्यांदाच काम केलंय. ते खूप ग्रेसफूल आहेत. हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेवरची त्यांची पकड वाखाणण्याजोगी आहे. ते वेटर्नरी सर्जन असल्याचं खूप लोकांना माहित नाही. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी मला नव्यानं समजल्या. या निमित्तानं गाजलेल्या पर्सनॅलिटीला भेटता आलं आणि त्यांच्यासोबत काम करता आलं. समीर हा अत्यंत हुषार, क्लॅरिटी असलेला आणि समरस होऊन काम करणारा दिग्दर्शक आहे. आपलं प्रोडक्ट मस्तच झालं पाहिजे असं जेव्हा सेटवर जमलेल्या सर्वांचं ध्येय बनतं, तेव्हा सगळ्यांची एनर्जी एकवटते आणि ती कामाच्या माध्यमातून रिफ्लेक्ट होते. समीरसोबत काम करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तो कॅरेक्टर्सचे बारकावे, त्याचे मॅनेरिझम्स तो अॅक्टरला देतो. त्यामुळं अॅक्टर्सना फार कमी कष्ट करावे लागतात. एखाद्या कॅरेक्टरला काय आजार असू शकतात किंवा काय त्याची मन:स्थिती असू शकते याचा डिटेल्समध्ये अभ्यास करून ते अॅक्टर्सना अव्हेलेबल करून देतो. त्यामुळं काम सोपं होतं. आता तो हिंदी चित्रपटही करतोय. असाच त्यानं सर्व भाषांमध्ये मराठीचा झेंडा फडकवावा.

  मी, मीरा आणि सुंदरा…
  ज्या रसिकांनी ‘समांतर २’ पाहिला नाही त्यांना अगोदर मी हा शो पाहण्याची कळकळीची विनंती करेन. हा शो एमएक्स प्लेअरवर असल्यानं पैसे भरावे लागत नाहीत. यामध्ये मी मीरा आणि सुंदरा नावाच्या दोन भिन्न काळातील  व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सुंदरा ही खूप फटकळ आहे. पोटात असलेलं लगेच तिच्या ओठांवरही येतं. तिचा भाषेचा लहेजा कोल्हापूरी आहे. तिला प्रचंड क्लॅरीटी आहे. आपल्याला मुंबईला जाऊन हिरोईन व्हायचंय हे तिला माहित आहे. त्यासाठी काहीही करणारी ही मुलगी आहे. मीरा तिच्या अगदी उलट आहे. तिच्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ताच समोरच्याला लागत नाही. तिच्या चेहऱ्यावर वेगळे भाव असतात आणि मनात काहीतरी वेगळं सुरू असतं. त्यामुळं तिच्या भोवतीचं गूढ प्रत्येक वेळी वाढतच जातं. ती जे वागते त्याला तिचा आजवरचा प्रवास कारणीभूत आहे. तिच्या वागण्यामागील कारणं हळूहळू कथानकात उलगडत जातात. ती अशी का झाली, ती अशा वागते हे समजतं. त्यामुळं या दोन साऊथ आणि नॅार्थ पोलवरील भिन्न पर्सनॅलिटी माझ्यातून जन्माला आल्याचं समाधान आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

  पश्चिम महाराष्ट्रातील बोलीभाषेचा अभिमान
  सुंदरा साकारताना बोलीभाषेचा लहेजा संवादांमध्ये उतरवण्यासाठी थोडे विशेष प्रयत्न करावे लागले. मी सांगलीची असल्यामुळं बालपणापासून माझ्या कानावर खूप कोल्हापूरी बोलीभाषा पडल्यानं फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील बोलीभाषा स्क्रीनवर बोलायला मिळावी याची मी आतुरनेनं वाट पहात होते. ‘समांतर २’च्या निमित्तानं ती बोलता आल्याचा अभिमान आहे. सुंदरा अशी बोलेल ही समीर विद्वांसचीच कल्पना होती. त्यामुळं मला फारच मौज आली. भविष्यात पुन्हा जेव्हा कधी पश्चिम महाराष्ट्रातील बोलीभाषेतील व्यक्तिरेखा समोर येईल, तेव्हा नक्कीच काम करायला आवडेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

  शिरवळकरांसोबत पूर्वजन्मीचं कनेक्शन
  टेन्शन, प्रेशर किंवा स्ट्रेस येऊ नये म्हणून मी आधी समांतर वाचलं नाही, पण ‘समांतर २’चं चित्रीकरण संपल्यावर लगेच सुहास शिरवळकरांचं पुस्तक वाचून काढलं. मला असं वाटतं की, मी, स्वप्नील आणि सुहास शिरवळकर यांचं मागच्या जन्मीचं काही कनेक्शन असावं. कारण ‘दुनियादारी’ ही त्यांचीच कादंबरी होती आणि हे पुस्तकही त्यांच्याच लेखणीतून अवतरलेलं आहे. आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्या साहित्यावर आधारलेल्या कलाकृतीवर काम केलं, तेव्हा तेव्हा आम्हाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं भविष्यात शिरवळकरांची आणखी एखादी कादंबरी पडद्यावर एक्सप्लोर करायला नक्कीच आवडेल.

  हा सर्वात मोठा प्लस पॅाइंट
  वेब सिरीज करताना थोडा फार नाटकाचा फिल येतो असं मला वाटतं. कारण तुम्हाला समोरून लगेचच प्रतिसाद येतो. पाहिल्यावर प्रेक्षक लगेच प्रतिसाद देतात. त्यासाठी थांबायची गरज लागत नाही. या माध्यमातील ही एक खूप एक्सायटिंग गोष्ट असल्याचं मला जाणवलं. एखादी टेस्ट केली की रिझल्ट येण्यासाठी दोन दिवस थांबावं लागतं, पण इथं तसं नाही. पहिल्यावर प्रेक्षक लगेच तुम्हाला शेरे देऊन मोकळे होतात. त्यामुळं मला असं वाटतं की, झटपट रिझल्ट मिळतो, किती कलेक्शन झालं याचं टेन्शन नाही. बऱ्याच भाषांमध्ये डब करण्याची सुविधा असल्यानं मराठी काँटेंट केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता इतर भाषांच्या माध्यमातून देशभर पोहोचतो हा वेब सिरीजचा एक सर्वात मोठा प्लस पॅाइंट आहे.

  पुढली भेट ‘मिमी’मध्ये
  जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता त्यापेक्षा खूप जास्त प्रेम माझं तुमच्यावर आहे. तुमचं मनोरंजन करण्याचा उचलला वसा मी आयुष्यभर जपेन. असंच प्रेम करत रहा. आता आपली पुढली भेट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांच्या ‘मिमी’ या आगामी हिंदी  चित्रपटात होईल. हा निर्माते दिनेश विजान यांच्या मॅडॅाक फिल्म्सचा चित्रपट आहे. संगीताचे जादूगार ए. आर. रेहमान यांचं संगीत ‘मिमी’ला लाभलं आहे. यात माझ्या जोडीला क्रिती सॅनोन, पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक असे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटात लवकरच नव्या रूपात भेट होईल.