सायलीच्या शुभमंगलमध्ये ऑनलाईनचा ट्रेंड

'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेच्या निमित्तानं 'नवराष्ट्र'शी सायली संजीवनने साधलेला हा खास संवाद

  ‘काहे दिया परदेस’द्वारे घरोघरी पोहोचलेली सायली संजीव सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल आॅनलाईन’ या मालिकेद्वारे पुन्हा रसिकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. लॅाकडाऊन आणि चित्रपटगृहांना टाळं असल्यानं इतर कलाकारांप्रमाणे सायलीचेही ‘झिम्मा’ आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ हे दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सद्य परिस्थिती पाहता सायलीनं मात्र सध्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेवरच संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. या मालिकेच्या निमित्तानं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना सायलीनं ‘शुभमंगल ऑनलाईन’बाबत सांगितलं.

  सायलीनं आजवर जे काही काम केलंय ते खूप विचारपूर्वक केलं आहे. ‘पोलीस लाईन’, ‘दाह’, ‘आटपाडी नाईटस’, ‘एबी आणि सीडी’, ‘बस्ता’ या चित्रपटांसोबतच ‘यू टर्न’ या वेब सिरीजनंतर सायली सध्या ‘शुभमंगल आॅनलाईन’ या मालिकेमुळं चर्चेत आहे. या मालिकेबाबत सायली म्हणाली की, ‘शुभमंगल आॅनलाईन’ ही मालिका टायटलप्रमाणेच आजच्या काळात महत्त्वाची असलेली आॅनलाईन सेवा अधोरेखित करणारी आहे. त्यामुळं मालिकेत सुरुवातीच्या काळात आॅनलाईनचा खूप वापर झालेला पहायला मिळाला. आता वास्तवात जसं अनलॅाक होऊ लागलंय, तसं मालिकेतही अनलॅाक होत जात आहे. या दरम्यान खूप नव्या तांत्रिक गोष्टी शिकता आल्या. आपण जसं एकमेकांशी बोलतो तसं कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलत असल्याचं टेक्निकली दाखवणं हे खूप वेगळं असतं. त्या गोष्टी आम्हालाही शिकायला मिळाल्या. आपण जसा मोबाईल हातात धरतो तसा काही शॅाटसाठी आम्हाला कॅमेरा हातात धरावा लागायचा. यातून बऱ्याच नवनवीन गोष्टी ठाऊक झाल्या. आॅनलाईन लग्न झाल्यानं त्यातूनही खूप काही शिकले. या मालिकेत आॅनलाईनही शिकले आणि नेहमीचाही एक्सपिरीयन्स घेत आहे.

  या मालिकेत सायलीनं शर्वरी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेबाबत सायली म्हणाली की, शर्वरी हे कॅऱेक्टर डेफिनेटली वेगळं आहे. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसारखं आहे. खूप पॅाझिटीव्ह कॅरेक्टर असून, सर्व प्रकारचे इमोशन्स जगणारी ही मुलगी आहे. त्यामुळं परफॅार्म करताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. थोडं जरी अधिक झालं तरी ते चुकीचं वाटू शकतं. अभिनयाच्या दृष्टिकोनातून गोष्टी थोड्याशा वेगळ्या वाटू शकतात याची काळजी घ्यावी लागते. अतिशय थिन लाईन आहे. त्याला खूप छटा असल्यानं सांभाळून काम करावं लागतं. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारी, सर्वांना सांभाळून घेणारं असं हे खरं कॅरेक्टर आहे. हिच्या वागण्यात कुठेही खोटेपणा नाही. कुठेही आव आणण्याचा प्रकार नाही. सगळं रिअल असल्यानं साकारताना एक वेगळीच मजा येत आहे. आजूबाजूच्या सहकलाकारांचा खूप फायदा होत असल्यानं हे कॅरेक्टर उत्तमरीत्या साकारता येत आहे. सुयश टिळक, सुकन्यामावशी, मिलिंद फाटक, योगेश केळकर, माधुरी यांनी साकारलेल्या कॅरेक्टरवर रिअॅक्ट होणारं कॅरेक्टर असल्यानं यातील वेगळेपण उठावदारपणे दिसतं. कोणत्याही प्रकारचा वेगळा अभ्यास करून हे साकारलेलं नाही.

  सुबोध-मंजिरी भावेंची निर्मिती
  ‘शुभमंगल आॅनलाईन’ ही मालिका हरहुन्नरी अभिनेता, दिग्दर्शक अशी मराठी सिनेसृष्टीत ओळख असलेल्या सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांच्या प्रोडक्शन हाऊसची आहे. त्यामुळं मला जेव्हा ‘शुभमंगल आॅनलाईन’मध्ये काम करण्यासंदर्भात फोन आला, तेव्हा नकार देण्याचं काही कारणच नव्हतं. मालिकेचा विषय खूप छान आहे. मागच्या वर्षभरात अनेक जोडप्यांनी अनुभवलेले क्षण या मालिकेत पहायला मिळत आहेत. मालिकेत मांडण्यात येणारे मुद्देही खूप प्रॅक्टीकल असल्यानं काम करायला मजा येणार हे माहित होतं. काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याची संधी मिळणार याची जाणीव असल्यानं खूप आनंद झाला होता.

   

  सुयशसोबत मालिकेत प्रथमच
  ‘शुभमंगल आॅनलाईन’च्या निमित्तानं प्रथमच मालिकेत सुयशसोबत एकत्र काम करत आहे. यापूर्वी जाहिरात वगैरे केली आहे, पण मालिका पहिलीच आहे. खूप चांगला अनुभव आहे. आम्ही फार मस्ती करतो, धमाल करतो, पण खूप चांगलं कामही करतो. एरव्ही आम्ही एकमेकांच्या कामात फार एन्टरफेअर करत नाही, पण जिथे मी चुकत असते तिथं सुयश सांगतो आणि जिथे चांगलं काम होतं तिथं प्रोत्साहनही देतो. मला तर चांगलं काम करायचंच आहे, पण सुयशलाही वाटतं की माझ्याकडून आणखी चांगलं काम व्हावं. एक सहकलाकार म्हणून असलेली ही भावना जोडी म्हणून आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. सुयश जेव्हा एखादी गोष्ट सांगतो, तेव्हा ते उपदेशात्मक नसतं, तर अगदी सहजपणे सांगितलं जातं. त्यामुळं एक पाठबळ मिळतं. आता आम्ही एकमेकांमध्ये इतके मिसळून गेलोय की आमचं छान अंडरस्टँडींग झालं आहे. आमची मैत्री अगोदरपासूनच होती, पण या मालिकेमुळं आणखी घट्ट झाली आहे.

  वास्तववादी घटनांची सांगड
  सध्या मालिकेत खूप वेगवेगळं घडतंय. ते आम्हालाही आश्चर्यचकीत करणारं आहे. शंतनूचा गेलेला सेल्फरिस्पेक्ट परत मिळवण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. हे खूप वरवरचं नसून, वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं जात असल्यानं मालिकेत पुढे निरनिराळ्या गोष्टी घडणार आहेत, ज्या आमच्यासाठीही सरप्राईज असेल. आम्हालाही अजून पूर्ण माहित नाही, पण इंटरेस्टींग आहे. प्रत्येकवेळी शो मध्ये छान छान न दाखवता वास्तवात जसे अप्स अँड डाऊन्स असतात तसे या मालिकेतही पहायला मिळत आहेत. एकीकडं चांगलंही घडत असतं, तर दुसरीकडं काही ना काही घडामोडीही घडत असतात. त्यातूनही मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असतो. ‘शुभमंगल आॅनलाईन’चं वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याच यात दाखवल्या जात आहेत.

  टिपीकल ड्रामेबाजी नाही
  ‘शुभमंगल आॅनलाईन’मध्ये मुळीच ड्रामा नाही असं मी म्हणणार नाही, पण टिपीकल डेली सोपमध्ये असलेला ड्रामा पाहून लोकं कंटाळतात तसं यात काही नाही. याच कारणामुळं जे लोक ही मालिका एकदा पाहतात त्यांना पुन: पुन्हा पहावीशी वाटते. एकंदरीत काय तर ते या मालिकेच्या प्रेमात पडतात आणि पुढीही काय घडतंय हे पाहण्याची त्यांना गोडी लागते. याच कारणामुळं ज्यांनी ही मालिका अजूनही पाहिली नाही त्यांनी एकदा तरी पहायला हवी असं मी आवर्जून सांगेन. सुयशसोबतची माझी केमिस्ट्री रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. सध्या मी याच मालिकेवर लक्ष केंद्रित केलं आहे. लॅाकडाऊनच्या काळात बरीच कामं करणं योग्य नाही. आम्हीसुद्धा स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन काम करतोय. त्यामुळं एकाच सेटवर रहाणं पसंत करतेय. पुन्हा दुसरीकडे जाऊन स्वत:ला त्रास करून इथेसुद्धा त्रास देण्याऐवजी इथली कमिटमेंट पूर्ण करत आहे. हे झाल्यावर पुढचं काम हाती घेईन.