भाजीपाला विक्रेता ते महत्त्वाकांक्षी, उदयोन्‍मुख रॅपर, गणेशला मिळाला ‘शांतीत क्रांती’मुळं पहिला ब्रेक!

सोनी लिव्‍हवर स्ट्रिमिंग होत असलेली सिरीज 'शांतीत क्रांती' तीन जिवलग मित्रांच्‍या साहसी मोहिमेला सर्वात अर्थपूर्ण, पण विलक्षण पद्धतीनं दाखवते.

    काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या मराठी ओरिजिनल ‘शांतीत क्रांती’ या वेब सिरीजनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. लक्षवेधक पटकथा, सर्वोत्तम अभिनय आणि आकर्षित करणाऱ्या संगीतामुळं या वेब सिरीजला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजनं पुण्‍यातील तरूण रॅपर गणेशला ब्रेक देत प्रकाशझोतात आणलं आहे. भाजीपाला विक्रेता ते महत्त्वाकांक्षी, उदयोन्‍मुख रॅपर बनण्‍यापर्यंत या प्रतिभेला अखेर ‘शांतीत क्रांती’मुळं पहिला ब्रेक मिळाला आहे.

    सिरीजच्‍या थीमला कायम राखत २४ वर्षीय गणेशनं सिरीजसाठी दोन गाणी संगीतबद्ध करण्‍यासोबत त्‍यांना रॅपचं रूप दिलं आहे. सोनी लिव्‍हनं नुकतंच त्‍यानं गायलेल्‍या गाण्‍यांपैकी ‘दोस्‍तीत कुस्‍ती…’चा म्‍युझिक व्हिडिओ सादर केला आहे. सोनी लिव्‍हवर स्ट्रिमिंग होत असलेली सिरीज ‘शांतीत क्रांती’ तीन जिवलग मित्रांच्‍या साहसी मोहिमेला सर्वात अर्थपूर्ण, पण विलक्षण पद्धतीनं दाखवते.

    सिरीजच्‍या शीर्षक गाण्‍यामध्‍ये आधुनिक संगीताचं विलक्षण संयोजन आहे. या गाण्‍याचं दिग्‍दर्शन सौरभ भालेरावनं केलं असून, सुनिल सुकटणकर यांनी लेखन केलं आहे.