‘श्यामची आई’च्या संस्कारांचं अमृतमंथन

जुना 'श्यामची आई' चित्रपटही पाहिला. त्या काळी वाचलेल्या पुस्तकाचा पगडा आजही मनावर असल्यानं हा विषय निवडला. असं निर्मात्या अमृता अरुण राव यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले.

  ‘मानिनी’, ‘वादळवारं सुटलं’, ‘हंबरडा’, ‘आरोही – गोष्ट तिघांची’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अमृता अरुण राव यांनी दिग्दर्शक सुजय डहाकेच्या साथीनं ‘श्यामची आई’ हा चित्रपट बनवण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. या बहुचर्चित चित्रपटाचं औचित्य साधत अमृता यांनी ‘नवराष्ट्र’शी विशेष बातचित केली.

  २४ वर्षे दूरदर्शनवर बातम्या वाचनाचं काम करणाऱ्या अमृता यांचा चेहरा घरोघरी ओळखीचा आहे. विविध केमिकल फॅक्ट्रीजमध्ये डायरेक्टर असणाऱ्या अमृता सामाजिक जाणिवेचं भान राखत चित्रपट निर्मितीही करतात. ‘श्यामची आई’ बनवण्याबाबत अमृता म्हणाल्या की, सुजय डहाकेनं जेव्हा माझ्यासमोर ‘श्यामची आई’ हा चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मी लगेच होकार दिला. कारण आता प्रत्येक ठिकाणी क्राईम, सेक्स आणि व्हायलन्स याखेरीज काहीही दिसत नाही. यातून नवीन पिढीवर काय संस्कार होणार? आजची लहान मुलं ही उद्याची तरुण पिढी आहे. लहानपणापासून मुलं हेच पहाताहेत. आई-वडील मुलांसमोर आयपॅड ठेवतात किंवा कॅाम्प्युटर सुरू करून देतात आणि मुलं तेच पहात असतात. आजच्या पिढीला स्वत:च्या करियरची काळजी आहे. स्वत:चं करियर करताना ७० टक्के पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं आताच्या पिढीवर संस्कार करण्यासाठी ‘श्यामची आई’सारखा चित्रपट येण्याची गरज आहे. हा चित्रपट माईलस्टोन आहे. लहानपणी पुस्तक वाचलंय, धडा वाचलाय, चित्रपट पाहिलाय त्याचा पगडा अजूनही मनावर आहे. त्यामुळं या विषयावर चित्रपट बनवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असं वाटलं. मी एम. एससी., एलएलबी झालेले आहे. माझं शिक्षण कानडी भाषेतून झालं आहे. सातवीत असताना मी मुंबईला आले. त्यामुळं सुरुवातीला माझं मराठीत फारसं वाचन नव्हतं. मुंबईच्या स्टँडर्डला येण्याच्या प्रोसेसमध्ये मी होते. कारण कर्नाटकातील एका खेडेगावात आमच्या आजोळी मी रहात होते. त्यामुळं मी श्यामची आई हे पुस्तक वाचलं नव्हतं. माझं एज्युकेशन बॅग्राऊंड सायन्स असल्यानं साहित्याशी फारसा संबंध आला नव्हता. दूरदर्शनसाठी माझं सिलेक्शन झालं आणि मी मराठीचा अभ्यास करू लागल्यावर हे पुस्तक वाचलं होतं. जुना ‘श्यामची आई’ चित्रपटही पाहिला. त्या काळी वाचलेल्या पुस्तकाचा पगडा आजही मनावर असल्यानं हा विषय निवडला.

  श्याम सर्वात खट्याळ मुलगा
  श्यामची आई पुस्तक मला खूप आवडलं होतं. आई ही आईच असते, मग ती कोणाचीही असो. प्रत्येकाला आपल्या आईच्या रूपात श्यामची आई दिसत असते. आयुष्यातील पहिला शिक्षक आईच असते. आईचेच संस्कार आपल्यावर झालेले असल्यानं प्रत्येकाची आई ही श्यामची आई असल्याचं मला वाटतं. पूर्वीच्या चित्रपटात आईनं केवळ श्यामवरच संस्कार केल्याचं पहायला मिळतं. त्यांना तीन मुलं होती. त्यामुळं त्यांनी तिन्ही मुलांवर समान संस्कार केले असतील, पण श्याम हा सर्वात खट्याळ मुलगा होता. खूप मस्तीखोर होता. त्यावर संस्कार करणं डिफिकल्ट होतं. त्याला कदाचित आईला वेगळ्या प्रकारे समजावून सांगावं लागलं असेल. त्याच्यावर आईनं कसे संस्कार केले हे सांगितल्यानं या पुस्तकाला ‘श्यामची आई’ हे टायटल दिलं असल्याचं समजलं. जुन्या ‘श्यामची आई’ या चित्रपटात श्यामच्या इतर भावंडांचा उल्लेख नाही.

  कोकणातील आर्टिस्टना संधी
  सुजय संवेदनशील विषय चांगल्या प्रकारे हाताळतो. त्यानं ‘शाळा’ खूप छान बनवला होता. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करतो. स्वत:ला झोकून देतो. या चित्रपटाचा विषय कोकणातील असल्यानं तो रत्नागिरीला गेला होता. या चित्रपटातील कलाकारांची निवड अद्याप व्हायची आहे, पण शक्यतो आर्टिस्ट कोकणातीलच घ्यायचा विचार आहे. प्रत्येक कॅरेक्टरचा लुक वास्तववादी असावा असा सुजयचा अट्टाहास असतो. टक्कल असेल तर विग न लावता गोटा करण्यावर त्याचा भर असतो. चित्रपटाच्या विषयाचा बारकाईनं अभ्यास करतो. खूप कॅान्फिडन्ट आहे. आॅडीशन्सद्वारे नवीन कलाकार घेण्याचा विचार आहे. कोणताही चेहरा नसलेले कलाकार घ्यायचे आहेत. कोकणातील कलाकारांना प्राधान्य दिलं जाईल. कारण त्यांच्या बोलण्यात तिथला हेल असेल. जुन्या काळातील चित्रपट असल्यानं बोलीभाषा, राहणीमान, कॅास्च्युमपासून गाड्या, बैलगाड्या, इतर लहान सहान गोष्टींवर बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे.

  रिअॅलिटी दाखवणारे चित्रपट
  ‘मानिनी’, ‘वादळवारं सुटलं’, ‘हंबरडा’, ‘आरोही – गोष्ट तिघांची’ या सर्व चित्रपटांमध्ये मी वास्तव मांडलं आहे. ‘आरोही’मध्ये रिअॅलिटी शोमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. अशा शोजमधून नावारूपाला आलेली खूप कमी मुलं पार्श्वगायक बनतात. बरीचशी मुलं आॅर्केस्ट्रातच गातात. अभिजीत सावंतसारखा मुलगा आज काय करतोय? त्याला पार्श्वगायक म्हणून फार संधी मिळाली नाही. या मुलांचं लाईफ वर्षभरच असतं. पुढचा विजेता मिळेपर्यंतच त्यांना जाहिरातींमध्ये वगैरे कामं मिळतात. या चित्रपटासाठी बालमोहन, किंग्ज जॅार्ज या शाळांनी माझा सत्कार केला. हा चित्रपट प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी पहायला हवा असं शाळेचं म्हणणं होतं. आतापर्यंत मी जे चित्रपट केले ते सोशल सब्जेक्टवर केले आहेत. कॅामेडी करण्यात मला फारसा इंटरेस्ट नव्हता.

  विविध कंपन्यांवर डायरेक्टर
  अमृता इंडस्ट्रीज, रायगड केमिकल्स प्रा. लि., इको फ्रेंड इंडस्ट्रीज, बीटा केम इंडस्ट्रीज, तिरुपती कॅार्पोरेशन आदी कंपन्यांवर मी डायरेक्टर आहे. भारतभर चालणाऱ्या माइनिंगमध्ये मेटल सेप्रेशनसाठी आम्ही केमिकल सप्लाय करतो. माझे पती अरुण राव केमिकल इंजीनियर आहेत. त्यांना बिझनेसमन आॅफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे. पूर्वी पाईन ट्रीपासून पाईन आॅईल बनवलं जायचं, पण पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागल्यानं पाईन ट्रीज कापण्यावर बंदी आल्यानं अरुण यांनी त्यासारखंच एक केमिकल तयार केलं. त्यामुळं आपली खूप ड्युटी वाचली. माझी दोन्ही मुलं केमिकल इंजीनियर आहेत. दोघंही महाराष्ट्रातून मेरिटमध्ये आलेली आहेत. पुण्यात २०० एकर जमिनीवर बायो डीझेलचा प्रोजेक्ट सुरू करणार आहोत.

  सिनेसृष्टीतील दीड तप
  जानेवारीपासून ‘श्यामची आई’चं शूट सुरू करण्याचा विचार आहे. सध्या लोकेशन्सची रेकी सुरू आहे. आर्टिस्टवरही चर्चा चालूच आहे. हा पूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शूट केला जाणार आहे. कलर केला तर त्या काळातील मजा येणार नसल्याचं दोघांचंही मत आहे. अभिनय हे माझं क्षेत्र नसल्यानं कधी अभिनय केला नाही. आपल्याकडे खूप छान आर्टिस्ट असल्यानं आपण केवळ आपल्या वाट्याला आलेलं काम करायला हवं. अमृता फिल्म्सच्या माध्यमातून मागील १८ वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय आहे. २००२ मध्ये ‘मानिनी’ हा पहिला चित्रपट बनवला होता. चित्रपट करताना पैसे कमावणं हा उद्देश नसतो. क्रिएटीव्हीटीचा आनंद मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चित्रपट निर्मिती करतेय. काही पुरस्कार सोहळ्यांमध्ये परीक्षक म्हणूनही काम केलं असल्यानं उत्तम कलाकृतींची जाण आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटावर सध्या काम सुरू असून, ‘हा मी मराठी’ आणि ‘साप शिडी’ हे लॅाकडाऊनमुळं प्रदर्शित होऊ न शकलेले दोन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.