सायरसच्या फॅमिलीचा ‘पॅाटलक’ फंडा

सोनी लिव्हवर १० सप्टेंबरला प्रसारीत होणाऱ्या 'पॅाटलक'च्या निमित्तानं सायरसनं 'नवराष्ट्र'शी केलेली खास बातचित.

  वयाच्या अठराव्या वर्षीच एमटीव्हीसारख्या युथफुल वाहिनीसोबत जोडला गेलेला सायरस साहुकार आता ‘पॅाटलक’ या वेब शोमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. सोनी लिव्हवर १० सप्टेंबरला प्रसारीत होणाऱ्या ‘पॅाटलक’च्या निमित्तानं सायरसनं ‘नवराष्ट्र’शी केलेली खास बातचित.

  राजश्री ओझा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘पॅाटलक’ हा काहीसा आगळा वेगळा वेब शो प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यात सायरससोबत जतीन सिया, किटू गिडवाणी, शिका तल्सानिया, इरा दुबे, हरमन सिंघा, सलोनी खन्ना आणि सिद्धांत कर्णिक यांच्या भूमिका आहेत. याबाबत सायरस म्हणाला की, मागील एक-दीड वर्षांमध्ये लोकांना काहीतरी वेगळं हवं आहे. त्यांना ड्रॅमॅटिक असं काही आता नको आहे. बॅाम्बस्फोट, हत्या, हाणामारी, दरोडा याला लोक काहीसे कंटाळले आहेत. ‘पॅाटलक’ हा शो या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. कारण ही एका कुटुंबाची स्टोरी आहे. इथे दैनंदिन जीवनातील चढउतारही पहायला मिळतील आणि तूतू मैंमैं सुद्धा… प्रत्येकाची आपली स्वत:ची कॅान्फ्लिक्टस असतात, ड्रामे असतात ते यात आहेत. आपण कितीही वेगळे असलो तरी आपल्या सर्वांच्या कहाण्या फॅमिलीशीच रिलेटेड असतात. आपण जे काही बनतो ते आपल्या घरातूनच आपल्याला मिळालेलं असतं. त्यामुळं आपली फॅमिली आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जोडलेली असते. त्यामुळं ही स्टोरी फॅमिलीसोबतच्या शांततेबाबत आहे. ‘पॅाटलक’ ही एका फॅमिलीची स्टोरी आहे. या फॅमिलीत कोणीही वेगळं झालेले नाहीत, पण प्रत्येकजण आपापल्या जीवनात अडकलेले आहेत. त्यामुळं या फॅमिलीचे वडील सांगतात की, प्रत्येकानं आपली एक डीश घेऊन या आणि आपण एकत्र बसून खाऊ, बोलू, गप्पा मारू. खरं तर हे भारताचं प्रतिनिधीत्व करणारं असल्याचं मला वाटतं. देशाच्या कानाकोपऱ्यात एक डीश दडलेली आहे. त्यामुळं हा जीवनाकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचं मला वाटतं. हि एक डॅमिडी कॅान्सेप्ट आहे, ज्यात कॅामेडी आणि ड्रामा दोन्ही आहे. या शोसोबतच ‘माईंड द मल्होत्रा २’चं शूटिंग सुरू होणार आहे. त्यामुळं वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्या शोचीही उत्सुकता आहे.

  शास्त्री कुटुंबाची कहाणी
  ‘पॅाटलक’ शास्त्री कुटुंबाची कथा आहे. या कुटुंबातील थोरला मुलगा मी साकारत आहे. आपल्याला नेमकं काय करायचंय आणि काय हवंय हे बेसिकली याला माहित आहे. भारतात मोठ्या कन्व्हेन्शनल सेटअपमध्ये आपणहून काहीही करायला गेलं तर आपण काहीतरी चुकीचं करू असं आई-वडीलांना वाटत असतं. यानं स्वत: आपली कंपनी सुरू केली आहे, पण कंपनी एक्सपँड होत असताना त्यानं ते केली नाही. त्यानं असा विचार केला की, माझ्या वडीलांकडे आम्हा मुलांना देण्यासाठी खूप कमी वेळ होता. आपण थोडं कमी काम करून कुटुंबियांसोबत थोडा जास्त वेळ घालवूया असं तो विचार करत असतो. यानं आपल्या जीवनात काही असे निर्णय घेतले आहेत जे कुटुंबियांना मूर्खपणाचे वाटत असतात. तरीही तो आपलं जीवन जगतोय. याला तीन मुलं आहेत. आपली स्वप्नं साकार करायची आहेत. त्याला स्वत:चं घरही खरेदी करायचं आहे. त्यासाठी तो पैसे जमा करतोय. त्यामुळं ‘पॅाटलक’ ही या सर्वांची कहाणी आहे असं मला वाटतं.

  अनोख्या संकल्पनेवरील फॅमिली गेटटुगेदर
  ‘पॅाटलक’ची संकल्पना खूप वेगळी आहे. जेव्हा आपण कधी आपल्या मित्र मंडळींना घरी बोलवतो, तेव्हा त्या होस्टलाच जेवण बनवावं लागतं. ‘पॅाटलक’ची संकल्पना अशी आहे की, पाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपली एक डीश बनवणार आहे. उदाहरण द्यायचं तर एखाद्यानं डाळ बनवली तर, दुसऱ्यानं पनीर-मटर किंवा कोणतीही भाजी बनवली. आणखी कोणीतरी भात घेऊन आलं. एखाद्यानं चपात्या किंवा रोटी आणल्या. यात तुम्हाला त्या दिवशी काय खायला मिळतंय हे तुमचं लक आहे. त्यामुळं ‘पॅाटलक’ हे टायटल आहे. जीवनही असंच काहीसं आहे. प्रत्येक व्यक्ती आपला एक रंग घेऊन येतो. आपला एक अनुभव घेऊन येतो. त्या टेबलावर आपण एकमेकांमध्ये मिसळून जातो. एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होण्याची संधी मिळते.

  हे माझ्याबाबतीतही घडतं…
  यात मी विक्रांत शास्त्री हे कॅरेक्टर साकारलं आहे. हे वास्तवात मी जसा आहे त्यापेक्षा खूप वेगळं आहे. याला तीन मुलं आहेत, मला नाहीत. एका ठराविक वयानंतर मुलंदेखील आई-बाबांसोबत पॅरेंटसचा रोल साकारू लागतात. आपण आपल्या आई-वडीलांना जेवण किंवा औषधांबाबत सांगत असतोच. हा थोरला मुलगा असल्यानं जेव्हा आई-वडीलांमध्ये काही प्रॅाब्लेम्स होतात, तेव्हा हा दोघांच्या मध्ये पडतो आणि सर्व सांभाळून घेतो. हे माझ्याबाबतीतही घडतं. माझ्या घरीही असं काही झालं की थोडा घाबरतो. लगेच घरी पोहोचतो. दोघांमध्ये हस्तक्षेप करतो. असं काहीसं साम्य दोघांमध्ये आहेत. डिफरन्सेस खूप आहेत. याच्या स्वत:च्या चॅाईसेसमुळं इतर भावांच्या तुलनेत यानं कमी कमाई केली आहे. या मुळं आई-वडीलांना काहीतरी वेगळ्या गोष्टी वाटतात, पण याला तसं काही वाटत नाही. हे एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. ह्युमर आणि सिच्युएशनल कॅामेडी या शोचा प्लस पॅाइंट आहे. मारुन मुटकून केलेली कॅामेडी यात नाही. एका वेगळ्याच प्रकारचा ह्युमर आहे.

  पुन्हा केलं एकत्र काम
  राजश्री ओझा यांच्यासोबत मी दहा वर्षांपूर्वी ‘आएशा’ चित्रपट केला होता. इरा दुबे त्यावेळी माझ्यासोबत होती. आता १० वर्षांनंतर पुन्हा इरासोबत काम केलं आहे. यात एक वेगळीच गंमत आहे. बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलो. काम केलं आहे. त्यामुळं खूप कम्फर्ट लेव्हल आहे. या शोसाठी आम्ही खूप मेहनत घेतली असून, २१ दिवसांमध्ये याचं शूट पूर्ण केलंय. बायो बबलमध्ये शूटनंतरही एकमेकांसोबत राहण्याची संधी मिळाली होती. त्यामुळं आमचं एक बाँडींग झालं होतं. दिल्लीमध्ये या शोचं शूट करण्यात आलं आहे. आजचे कलाकार एकमेकांना प्रेमपूर्वक भेटतात, काम करतात, गप्पा मारतात, एकमेकांना जज करत नाहीत. नवीन लोकांना भेटायला आणि त्यांच्यासोबत काम करायला मला मजा येते.

  अठराव्या वर्षी एमटीव्ही
  एमटीव्हीची दुनिया आणि ती वेळ कमालीचा वेगळा होता. त्यावेळी आपल्या देशातही खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. मी जेव्हा जॅाईन झालो, तेव्हा १८ वर्षांचा होता. त्यामुळं एमटीव्हीच्या माध्यमातूनच मी मोठा झालोय. १० वर्षे एकत्र काम करण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. तो काळ माझ्यासाठी खूप वेगळा होता. कारण तिथूनच माझं खरं ट्रेनिंग झालं होतं. त्या वेळी आम्ही दिवसाला आठ-दहा शो करायचो. आता थोडं आरामात काम करतोय. जग थोडं बदललं आहे. आजवर बऱ्याच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण डार्कर कॅामेडी साकारायला आवडेल. मागच्या वर्षी रजत कपूर यांच्या ‘कडक’मध्ये काम करताना मजा आली होती. भविष्यात आव्हानात्मक भूमिका साकारायला नक्कीच आवडेल.