विनोदी देवकीच्या रूपात मीनाक्षी शोधतेय सुख

मालिकेच्या निमित्तानं प्रथमच विनोदी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मीनाक्षीनं 'नवराष्ट्र'शी संवाद साधताना सुखाच्या शोधात निघालेल्या आपल्या कॅरेक्टरबाबत सांगितलं.

  काही दिवसांपूर्वीच चित्रकार राज मोरे दिग्दर्शित ‘खिसा’ नावाच्या लघुपटानं राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या लघुपटामध्ये अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिनंही छोटीशी भूमिका साकारली आहे. आजवर गंभीर भूमिकांना न्याय देणारी मीनाक्षी स्टार प्रवाह वाहिनीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेद्वारे रसिकांना हसवण्याचं काम करत आहे. या मालिकेच्या निमित्तानं प्रथमच विनोदी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मीनाक्षीनं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना सुखाच्या शोधात निघालेल्या आपल्या कॅरेक्टरबाबत सांगितलं.

  ‘खिसा’प्रमाणेच ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकामुळं मीनाक्षी राठोड हे नाव रसिकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचलं आहे. अभिनयाची सुरुवात आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये एंट्री होण्याबाबत मीनाक्षी म्हणाली की, मी आणि कैलाश दोघेही अॅकॅडमी पासआऊट असून, वामन केंद्रेसरांचे विद्यार्थी आहोत. आम्ही कॅालेजमध्ये असल्यापासून नाटकांमधून कामं केली आहेत. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातही मी कैलाशनं साकारलेल्या मिलिंद कांबळेची पत्नी सावित्रीच्या भूमिकेत आहे. ‘मयत’ व ‘खिसा’ या शॅार्टफिल्म्स आणि ‘नाळ’ चित्रपटात काम केलं आहे. गंभीर व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आपल्याला आणखी लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचं जाणवलं. त्यासाठी टेलिव्हीजनकडे वळले. ‘बाळूमामा’मध्ये वैजयंता नावाची व्यक्तिरेखा साकारली. कन्नड भाषीक हेल असलेलं हे कॅरेक्टर लोकांना खूप आवडलं. तिथूनच माझा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेसाठी मार्ग मोकळा झाला. यांनी माझं ‘बाळूमामा’मधील काम पाहिल्यानं या मालिकेची आॅफर दिली.

  प्रथमच विनोदी भूमिका साकारण्याबाबत मिनाक्षी म्हणाली की, यात मी विनोदी कॅरेक्टर साकारलं आहे. या व्यक्तिरेखेद्वारे आजच्या कोरोनाच्या काळात किमान हसवण्याचं तरी काम करत असल्याचं समाधान आहे. यापूर्वी मी विनोदी भूमिका केली नसल्यानं हे कॅरेक्टर एन्जॅाय करतेय. चांगल्या प्रतिक्रीया येत आहेत. या कॅरेक्टरमुळे मी आणखी जास्त चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतेय असं वाटतं. देवकी नावाची ही व्यक्तिरेखा पूर्णपणे मॅड हेड आहे. वेंधळी, बावळट स्त्रिया असतात तसं हे कॅरेक्टर आहे. फॅमिलीत जे राजकारण सुरू असतं त्यात खलनायिका असलेल्या कॅरेक्टरला देवकी नवऱ्याच्या स्वार्थासाठी साथ देत असते. हे कॅरेक्टर नादरमुनींसारखं कळ लावं किंवा मंथरेसारखं कान भरणारं असलं तरी कॅामेडी आहे. हिला डोकं नाही. मध्येच काहीतरी बोलून जाते. जे बोलायला नको तेच नेमकं बोलते. त्यामुळं बऱ्याचदा गडबड होते. त्यामुळं तिचा नवरा तिला कायम मॅड हेड असंच म्हणतो. मालिकेत घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून, प्रसंगांद्वारे होणारी कॅामेडी खूप मजेशीर वाटते. थोडक्यात काय तर ही एका वेंधळ्या स्त्रीची व्यक्तिरेखा आहे. यात वर्षा उसगावकर, माधवी निमकर असे बरेच कलाकार आहेत.

  कोल्हापूरकरांची भाषा बोलण्याचं सुख
  या मालिकेची कथा कोल्हापूरमधील शिर्केपाटील घराण्यातील आहे. या कुटुंबात तीन सुना आहेत. यातील दुसऱ्या सुनेची भूमिका मी साकारत आहे. थोरल्या सुनेच्या भूमिकेत माधव निमकर आहे. मालिकेची कथा धाकट्या सुनेभोवती गुंफण्यात आली आहे. या मालिकेच्या निमित्तानं प्रथमच कोल्हापूरमधील कॅरेक्टर करण्याची संधी मिळाली आहे. आता कोल्हापूरमधील बोलीभाषेचा लहेजा देवकीच्या कॅरेक्टरमध्ये उतरवण्यात कितपत यशस्वी झालेय ते तिथली स्थानिक लोकंच सांगू शकतील. कोल्हापूरकरी भाषेचा लहेजा शिकवण्यासाठी आमच्या सेटवर एक शिक्षक होते. ते आम्हाला कोल्हापूरच्या बोलीभाषेचे धडे द्यायचे. आम्हीही तसा प्रयत्न करतोय. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेनं कोल्हापूरकरांची भाषा बोलण्याचं सुख दिलं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

  सेम सेम बट डिफरंट
  ‘बाळूमामा’मधील कॅरेक्टरपेक्षा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील व्यक्तिरेखा वेगळ्याप्रकारे साकारण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं. कारण वैजयंताचं कॅरेक्टरही ग्रे शेडेड होतं आणि देवकीचंही तसंच आहे, पण ही व्यक्तिरेखा टोटली कॅामेडी आहे. ही स्वत:चं फार डोकं लावत नाही, पण जाऊबाई जे म्हणेल त्याला होकार देत असते. त्यातून बऱ्याचदा विनोदनिर्मिती होते. ती जी कारस्थानं करेत त्यात ही हिरीरीनं सहभागी होते. फक्त माझ्या नवऱ्याला कंपनीत हिस्सा मिळायला हवा इतकाच हिचा साधा स्वार्थ आहे. आपल्याकडं कंपनीचे हक्क आले पाहिजेत असं तिला वाटतं. यात माझी जाऊसोबत केमिस्ट्री आहे. त्यामुळं मी सतत तिला जाऊबाई, जाऊबाई, जाऊबाई असंच बोलत असते. तो उत्साह सर्वांना आवडतो. माझा नवरा कायम मॅड हेड म्हणत असतो ते फेमस झालं आहे.

  माझ्यासाठी वेगळं करण्याची संधी
  आजवर गंभीर भूमिका साकारल्यानंतर विनोदी व्यक्तिरेखा साकारायची असं काही ठरवलेलं नव्हतं. कारण मी शॅार्टफिल्म्स केल्या, सिनेमांमध्ये ज्या काही लहान सहान भूमिका साकारल्या त्या सिरीयसच, दबलेली, इमोशनल स्त्री अशा प्रकारच्याच होत्या. त्यामुळं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ची जेव्हा आॅफर मिळाली, तेव्हा मला वाटलं काहीतरी वेगळं करण्याची ही संधी आहे. आपल्याला अशा प्रकारचं कॅरेक्टर साकारणं जमेल की नाही याबाबत मी देखील सुरुवातीला संभ्रमात होते, पण दिग्दर्शक, सहकलाकार आणि टीमनं खूप सपोर्ट केला. त्यामुळं देवकीचं काहीसं वेगळं कॅरेक्टर साकारणं सोपं झालं. कारण विनोदी पंचेस काढण्याची सवय नव्हती. या कॅरेक्टरमुळं मला आता त्याची सवय झाली आहे असं वाटतं. मालिका विश्वात दररोज काही ना काही वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात.

  ही आहे सुखाची व्याख्या
  सुखाची व्याख्या खूपच साध्या शब्दांत सांगायची तर समाधान… आपण कुठेही पोहोचलो किंवा कितीही यश मिळवलं तरी आपली हाव कधीही संपत नाही. मग ती आर्थिक असो, वा शिखरावर पोहोचण्याची… कुठेतरी आपल्याला समाधानाची एक लाईन शोधावी लागते. ही समाधानाची रेखा म्हणजे सुख असल्याचं मी म्हणेन. मालिकेच्या वेगळेपणाबाबत बोलायचं तर सिरीयलच्या चष्म्यातून पाहिल्यावर असं जाणवतं की लोकांना घरातील पॅालिटीक्स आवडतंय. तीन भावांमधील राजकारण प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. आता आमची जी जाऊ झाली आहे ती अगोदर मोलकरीण असते. धाकट्या दीराशी लग्न झाल्यानं आता ती आमच्या बरोबरीला आली आहे. त्यामुळं आम्हा दोघी जावांचा जळफळाट होत आहे. खरं तर एका घरात असं काही असता कामा नये असं मला वाटतं, पण मालिकेत असं लाऊड कंटेटच वर्क होतं.