प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गिरीजा

सुखाची हीच परिभाषा स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून उलगडण्यात येत आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभू या मालिकेत गौरी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. याच निमित्ताने गिरिजा प्रभूशी साधलेला हा खास संवाद.

  अनेक कलाकार असे असतात जे अनेक मालिका, चित्रपट, नाटकात काम करूनही प्रेक्षकांच्या फारसे लक्षात रहात नाहीत. त्या उलट असेही काही कलाकार असतात ते आपल्या पदार्पणातच प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू.

  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं प्रत्येकजण वेगळं उत्तर देईल.  प्रत्येकाची आपली अशी सुखाची व्याख्या असते. कुणासाठी पैसे म्हणजे सुख, कुणासाठी समाधान म्हणजे सुख तर कुणासाठी जगण्यातला आनंद म्हणजे सुख. 

  गौरीची आयुष्यभर ऋणी

  ‘सुख म्हणजे….’ या मालिकेत ‘गौरी’ची भूमिका मिळणं हा माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. ही भूमिका साकारताना कोल्हापुरी भाषा, तो लहेजा मी लक्षात घेतला. या आधी कधीट कोल्हापूरी भाषा बोलले नव्हते. कोल्हापूरी भाषेत एक वेगळा गोडवा आहे. आता या भाषेची इतकी सवय झाली आहे की घरी असतानाही बऱ्याचदा हीच भाषा तोंडात येते.  गौरीचा स्वभाव माझ्या स्वभावाशी बराच मिळताजुळता आहे. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचं सुख मानणं, हा या व्यक्तिरेखेतील विचार मला खूप आवडला. फक्त गौरी प्रचंड सहन करते. गौरी एवढी सहनशक्ती माझ्यात नाहीये.

  पहिलं प्रेम नृत्य

  पण या मालिकेमुळे अभिनयाबरोबरच अनेक स्टंट मला करायला मिळाले. जे या आधी मी करायचा विचारही केला नव्हता. मालिकेत अनिल जेव्हा गौरीला गच्चीतून ढकलतो. हा सीन करताना आम्ही सकाळपासून हा सीन शूट करत होतो. खरतर मनातून खूप भीती वाटत होती. एवढ्या उंचीवरून पडायचं होतं. पण कूप मजाही आली. त्यामुळे आजपर्यंत जे केलं नाही ते गौरीने माझ्याकडून करून घेतलं.

  माझ्या करिअरची सुरुवात नृत्याने झाली. आकुर्डी येथील पीडीइएएस इंग्लिश मीडियम स्कूलची मी विद्यार्थिनी. शिक्षकांनी वेळीच माझ्यातला नृत्यकलाकार ओळखला आणि त्या नंतर माझ्या आई-वडिलांना नृत्याचे यथोचित शिक्षण देण्याचा सल्ला दिला. भरतनाट्यम्, कथक, लोकनृत्य, लावणी असे सगळे नृत्यप्रकार मी शिकले आहे. लहानपणापासूनच नृत्य शिकत असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या सगळ्यांमधून चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सध्या मालिकेचे शूटिंग सतत सुरू असल्यामुळे नृत्यासाठी कमी वेळ मिळतो. पण वेळ मिळेल तेव्हा नृत्याचा सराव करते. मग तो शूटिंगचा सेट असू दे किंवा मेकअप रूम. लवकरच एखादा व्हिडिओ काढावा असा विचार आहे.

  आई सदैव जवळ

  “प्रत्येकाच्याच आयुष्यात आईला मोलाचं स्थान असतं. अगदी जन्मापासूनच आपण आईकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यामुळे आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय आईला देईन. माझ्या कुटुंबात अभिनय क्षेत्रातलं कुणीच नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला हे जग नवं होतं. पण तरीही आईच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी या क्षेत्रात येऊ शकले. तिने फक्त पाठिंबाच नाही तर मला आत्मविश्वासही दिला जो कायम माझ्यासोबत असेल. अगदी ऑडिशनपासून ते माझ्या शूटिंग वेळापत्रकाच्या सर्व वेळा तीने काटेकोरपणे पाळल्या आहेत. मालिकेत मी गौरी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. अतिशय साधी आणि प्रेमळ अशी ही व्यक्तिरेखा आहे. माझ्या आईचं नावही गौरी आहे. आणि गौरीमधले गुणही आईशी मिळते जुळते आहेत त्यामुळे गौरी ही व्यक्तिरेखा मला खुप जवळची वाटते. आणि मला गौरीच्या रुपात पाहून आईही सुखावते. आज महाराष्ट्राबाहेर शूट करत असतानाही गौरीमुळे सदैव आई जवळ असल्यासारखं वाटतं.

  मालिकेचं श्रेय सगळ्यांना

  ही मालिका सुरू झाल्यापासून बऱ्याचद्या एक नंबरवर आहे. या मालिकेचं श्रेय या मालिकेत आणि मालिकेसाठी काम करण्याऱ्या प्रत्येकाला जातं. कारण सगळेचजण यासाठी खूप मेहनत घेत आहेत. आमचे लेखक,दिग्दर्शक, तंत्रज्ञ या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आम्ही एक नंबरवर आहोत. मालिका येण्या आधीच प्रेक्षकांनी शिर्षकगीत खूप डोक्यावर घेतलं. श्रीरंग गोडबोलेंचे शब्द, पंकज पडघन यांचं संगीत आणि कार्तिकी गायकवाडच्या सुरांनी या गाण्याला साज चढवला आहे. या गाण्यावर अनेक चाहत्यांनी व्हिडिओही बनवले आहेत. लग्नाच्या प्रीवेडिंग फोटोशूटसाठीही या गाण्याला पसंती मिळतेय. आजही या गाण्यावर रिल्स बनवले जात आहेत.

  या परिस्थितीत शूट करणं कठीण

  आज अशा परिस्थितीत घराबाहेर राहून काम करणं खूप कठीण आहे. आता घरच्यांची आठवण येत आहे. आम्ही कलाकार इथे एकत्र आहोत. आमचंही एक वेगळं कुटुंब इथे तयार झालं आहे. आम्ही इथे काम करताना प्रत्येकजण पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय. शूट व्यतिरीक्त आम्ही व्हिडिओ काढणं, रिल्स बनवणं सुरू आहे. सगळी काळजी घेत, सरकारने घालून दिलेल्या नियामांच पालन करत बायोबबलमध्ये शूट करत आहोत. लवकरच ही परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे.