अक्षया प्रेक्षकांच्या मनात भरली…

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक तर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली. अक्षयाने लतिकाविषयी ‘नवराष्ट्र’बरोबर मारलेल्या या खास गप्पा.

  रात्री ९ वाजता हमखास सगळ्या घरातून एकच शिर्षकगीत ऐकू येतं ते म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरली सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचं. या मालिकेच्या वेगळ्या विषयामुळे आणि कलाकारांच्या उत्तम, सहज अभिनयामुळे अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात सगळ्याच वरचं स्थान मिळवलं. या मालिकेत लतिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक तर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली. अक्षयाने लतिकाविषयी ‘नवराष्ट्र’बरोबर मारलेल्या या खास गप्पा.

  लतिका मनात भिनली

  लतिका माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्यात खूप बदल झाला. सगळ्यात मोठा बदल म्हणजे भाषेचा. आता ती भाषा इतकी मनात भिनली आहे की, घरी देखील अनेकवेळा तेच शब्द, तीच भाषा माझ्या तोंडात येते. सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लतिका ज्याप्रमाणे स्वयंपाक घरात वावारते. तो सर्राइतपणा आता माझ्यात देखील आला आहे. त्याचप्रमाणे ही कायम शांत डोक्याने विचार करते. ते आता माझ्यातही आलय. लतिका आयुष्यात आल्यापासून माझा प्रत्येक विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मी आधी खूप हायपर असायचे, पटकन एखद्या गोष्टीवर प्रतिक्रीया द्यायचे. पण आता मी बोलताना, रिअक्ट होताना विचार करते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

  …म्हणून मालिका स्विकारली

  या मालिकेआधी ही हिंदी मालिका करत होते. या मालिकेत मुख्य पात्र नसलं तरी ती भूमिका फार महत्त्वाचं होती. त्या भूमिकेने मला स्वत:ची ओळख दिली. त्यामुळे मी ठरवलं होतं यापुढे अशाच भूमिका स्विकारीन ज्या या भूमिकेच्या एक पायरी कायम वरतीच असतील. हा बेन्चमार्क मी स्वत:साठी आखून घेतला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्ष मी फार काम टेलिव्हिजनवर केलं नाही. या दरम्यान मी ब्लॉग सुरू केला होता. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळाला. यावेळी मी बॉडि पॉझिटिव्हिटीबद्दल बोलायचे. चांगली माहिती प्रेक्षकांबरोबर शेअर करायचे. त्याचबरोबर ऑडिशन्सच्या निमित्ताने मला अनेकवेळा वाईट अनुभव आले. जाड्या मुलींची काय मस्करी उडवली जायची. हिरोईनच्या नावाखाली बॉडिशेमिंग चालायचं. त्यामुळे अशा ठिकाणी मी काम करणं टाळलं. चांगले पैसे दिले तरी त्या मालिकांमध्ये मी काम केलं नाही. त्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचा विषय मला समजला तेव्हा ठरवलं. जिवतोडून ऑडिशन द्यायची आणि ही भूमिका मिळवायची. कारण या मालिकेचा विषय हा त्याचा यूएसपी आहे. या मालिकेतील केवळ लतिका किंवा अभिमन्यू नाही सगळ्याच भूमिका भारी झाल्या आहेत. त्या केवळ मालिकेच्या वेगळ्या विषयामुळे.

  स्वत:ला स्विकारा..

  जाड असणाऱ्या प्रत्येक मुलीने लक्षात घ्यायला हवं. कोणीच तुमची पात्रता ठरवू शकत नाही. तुमची पात्रता ही तुम्हीच ठरवत असता. हे तुम्ही जाणून घेतलं ना की जगातली कोणतीच गोष्ट अशी नाहीये जी तुम्ही मिळवू शकत नाही. माझ्यासारखी मुलगी या क्षेत्रात हे काम करू शकते. मी एकच सांगेन त्या मुलींना तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा. त्याला जिद्द आणि मेहनतीची जोड द्या, तुम्ही जगात वाट्टेल ते जिंकू शकता. तुम्हाला आधी स्वत:ला स्विकारा…मग सगळे तुमच्या पाठीशी उभे राहतील.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

  सेटवर भट्टी जमली

  आम्ही सगळेच सेटवर प्रचंड धम्माल करतो. ज्याप्रमाणे आम्ही घरी वागतो तसेच सेटवरही असतो. आमचा छान ग्रुप तयार झाला आहे. आता सध्या बायोबबलमध्ये शूट करत असल्यामुळे सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आम्ही सगळे एकत्रच असतो. मालिकेत असणारा दादा आता माझाही लाडका दादा झाला आहे. त्याचबरोबर हेमाची भूमिका साकारणारी प्रमिती माझ्यात खास मैत्री झाली आहे.

  ‘योगा’ योगाने

  मी प्रचंड फूडी आहे. आजही बाहेरचं काही छान खायला मिळालं तर मी ताव मारते. पण सध्या आम्ही बायोबबलमध्ये शूट करतोय. त्यामुळे सध्या बाहेरचं खाणं बंद आहे. जे सेटवर आम्हाला खायला दिलं जात आहे तोच आहार सुरू आहे. अर्थात काही दिवस मी सोशल मीडियावर योगा करताना माझ्या डाएटचे फोटो शेअर करते. त्यावर अनेक प्रश्नही मला प्रेक्षक विचारतात. हा बदल याचासाठी आहे की आम्ही १२ ते १४ तास सलग शूट करतोय. त्यामुळे एवढावेळ उभं राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी आम्ही मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या फिट असणं गरजेचं आहे. त्यामुळे मनात आलं की आपल्याला जर रोज एवढा वेळ काम करायचं आहे आणि फ्रेश रहायचं असेल तर योगा करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दररोज व्यायाम सुरू झाला. वेगळं काही डाएट फूड खात नाही जे सेटवर सरळ्यांसाठी जेवण येतं तेच मी पण जेवते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

   

  सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

  मी सोशल मीडियावर टाकलेल्या त्या पोस्टची चर्चा झाली. त्यावर अनेक कमेंटही मला मिळाल्या. प्रेक्षकांना या क्षेत्रातील फेम दिसतं. त्या पोस्टवर एक अशी कमेंट आली आहे की, ‘तुम्ही कलाकार १२ – १५ तास काम करता पण तुम्हाला लोकप्रियता पण तेवढीच मिळते. बँकेतही लोकं तेवढीच काम करतात पण त्यांना एवढी लोकप्रियता मिळत नाही’.  मी कायमच एवढचं म्हणते की कलाकारांना मिळणारी ही लोकप्रियता ही त्यांच्या कामाचा एक भाग आहे. पण यामागे कलाकराचं स्ट्रगल मोठ्या प्रमाणावर असतं. अशीच लोकप्रियता मिळत नसते. मी गेली ६ वर्ष या क्षेत्रात काम करतेय. पण आता कुठे मला लोकं ओळखायला लागली आहेत. त्याचबरोबर कलाकाराचं काम कठीण आहे असं म्हणते कारण, आम्हाला रिप्लेसमेंट नाहीये. आम्हाला आजारी पडून चालत नाही. एखाद्या दिवशी दुसऱ्या क्षेत्रात तुम्हाला रिप्लेसमेंट मिळेल. पण अभिनेत्याला, अभिनेत्रीला त्यांच काम करावच लागतं.