भूमिकेत रमणारा चोखंदळ श्रीपाद

आपल्या भूमिका, या क्षेत्रात पदार्पण करताना श्रीपादला आलेले अनुभव त्याने नवराष्ट्रबरोबर शेअर केले आहेत.

  काही कलाकार नेहमीच लहान-सहान भूमिकांमध्येही आपलं अस्तित्व सिद्ध करत असतात. मुख्य नसली तरी त्यांची ती भूमिका त्या मालिकेसाठी महत्त्वाची ठरत असते. शिवाय छोटी भूमिका असूनही तो कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. श्रीपाद पानसेही असाच एक अभिनेता. अनेक अडथळे पार करून आज छोट्या पडद्यावर आपलं नाव कमवतोय. ‘स्वामिनी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकांमधील श्रीपादच्या कामाचे प्रचंड कौतुक झालं. पण यामागे आहे श्रीपादची प्रचंड मेहनत. 

  १२ वी पर्यंतच शिक्षण तळेगावमध्ये घेतल्यानंतर श्रीपादने फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतला आणि अभिनय क्षेत्रात येणाचा मार्ग त्याला सापडाला. सुरूवात फेस्टिव्हलमध्ये गिटार वाजवाण्यापासून सुरूवात झाली. त्यानंतर झालेलं पुरूषोत्तमचं वर्कशॉप आणि नंतर एकांकिका, नाटकांमधून सहभाग घेत आज श्रीपाद छोटा पडदा गाजवतोय. पण श्रीपादचा इथपर्यंतचा प्रवास काही त्याच्यासाठी सोप्पा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या श्रीपादलाही सर्वसामान्यांप्रमाणेच आधी नोकरी कर आणि मग या क्षेत्रात पाऊल ठेव असाच सल्ला आईकडून मिळाला. त्यानंतर जवळपास ७ वर्ष त्याने विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली. पण मनात असणारी अभिनयाची आवड त्याला गप्प बसू देत नव्हती. नोकरी करत असतानाही तो अनेक ठिकाणी ऑडिशन्स देत होता. अखेर एके दिवशी श्रीपादने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

  शिबिराने घडवलं…

  नोकरी सोडल्यानंतर लगेचच दौंडमध्ये मी एक नाट्यपरिषदेचं शिबिर केलं. या शिबिराचा मला खूप फायदा झाला. असं म्हणतात अभिनय शिकवून येत नाही. पण शिबिरात दिग्गज कलाकरांच्या मिळालेल्या मार्गदर्शनाचा मला प्रचंड फायदा झाला. या शिबिरानंतर प्रशांत दामले इन्सिट्यूटची जाहीरात बघितली आणि लगेचच प्रवेश घेऊन टाकला. तीन महिन्यांचा तो कोर्सपुर्ण झाला. त्यावर्षी बेस्ट स्टुडंटचं पारितोषिक मला मिळालं, याचा फायदा असा झाला की पुढे वर्षभर प्रशांत दामले यांचे वर्कशॉप अटेंड करायची संधी मला मिळाली. यामुळे मला अनेक नाटकांचे प्रवेश सादर करायला मिळाले. यावेळी प्रशांत दामले स्वत: आम्हाला मार्गदर्शन करायचे. त्यांच्या अनुभवाची झोळी माझ्याकडे भरून घेतली आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात केली आणि मुंबई गाठली.

   …आणि पहिलं काम मिळालं

  मुंबईत आल्यावर ५ व्या महिन्यात मला माझं पहिलं काम मिळालं. स्वराज्य रक्षक संभाजी या मलिकेत मी मिर्झाराजे जयसिंग यांच्या मुलाचंच रामसिंगचं काम केलं होतं. महाराजांची आग्य्राहून सुटकेदरम्यान तो महाराजांबरोबर असतो. या मालिकेत जवळपास महिनाभर माझी भूमिका होती. यामुळेच मी पहिल्यांदा कॅमेरा फेसिंग शिकलो. त्यानंतर नकळत सारे घडले या मालिकेसाठी एक छोटी भूमिका केली. पण त्यावेळीच ठरवलं पुन्हा अशा एक- दोन दिवसांच्या भूमिका करणार नाही आणि बरोबर सहा महिन्यांनी याच मालिकेसाठी सात- आठ महिने एक मोठी भूमिका करण्याची संधी मिळाली.

  २ दिवसात ‘संभाजी’ पात्र उभं केलं

  याचदरम्यान ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटासाठी निर्मात्यांनी हंबीररावच्या भूमिकेची तयारी करायला सांगितली. त्यानंतर अनेक महिने गेल्यानंतर अचानक १२ जानेवारीला कॉल आला की आपण १४ जानेवारीला नाटक करतोय पण तुला हंबीरराव नाही तर संभाजी हे पात्र करायचं आहे. या आधी संभाजींच चरित्र वाटलं होतं, ते पात्र साकारायची इच्छाही होती. त्यामुळे दोन दिवसात संभाजी हे पात्र उभं केलं. यामुळे वेगळा आत्मविश्वास आला की, कोणत्याही परिस्थितीत आपण काम करू शकतो. या नाटकाचे साधारण ४० प्रयोग मी केले.   

   

  ‘स्वामिनी’ टर्निंग पॉईंट ठरली…

  स्वामिनी मालिकेसाठी जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा विश्वासराव किंवा रघूनाथराव या पैकी एक भूमिका करावी लागेल असं सांगितलं. मला रघूनाथराव ही भूमिका करायला आवडेल विश्वासरावांची भूमिका असेल तर मी ती भूमिका करू शकेन असं वाटत नाही हे स्पष्ट सांगितलं आणि देवाच्या कृपाने माझ्या मनातली इच्छा पुर्ण झाली आणि रघूनाथराव साकारायची संधी मिळाली. या कामामुळे प्रेक्षकांचा आणि या क्षेत्रातील कलाकारांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एक चांगली भूमिका, एक चांगली मालिका माझ्या नावावर लागली. खरतर वेगळ्या अपेक्षेने ही मालिका मी स्विकारली पण थोडी माझी निराशा झाली. कारण ही मालिका पुर्णत: स्त्री पात्रांवर आधारीत होती. पण या मालिकेने खूप चांगला अनुभव दिला.

  सुरूवातीला प्रेक्षक इतरवेळी आम्हाला ओळखायचेच नाहीत. कारण तो मेकअप, लूक आणि भूमिकेचा अर्विभाव यामुळे आम्हाला कोणी ओळखायचं नाही. आम्हाला स्वत:हून सांगायला लागायचं की या मालिकेत आम्ही काम करतो. पण याकाळात ‘रघूनाथराव जर कसे असतील तर ते तुमच्या सारखेच असतील, आम्ही दुसऱ्या कोणाला रघूनाथराव म्हणून बघूच शकत नाही’ अनेकांनी दिलेली ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि खास ठरली.

  बाजीप्रभू साकारताना…

  स्वामिनी मालिकेनंतर ऐतिहासिक भूमिका एवढ्यात साकारायची नाही असं मी ठरवलं होतं. एक कलाकार म्हणून वेगळ्या धाटणीच्या भूमिका करूयात असा विचार करत असतानाच स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेसाठी फोन आला. सुरूवातीला या भूमिकेसाठी नाहीच म्हणच होतो कारण स्वामिनीनंतर लूक चेंज होत होता. पण अखेर कारणं दिल्यानंतर मी तयार झालो. पुढे बाजीप्रभू देशपांडे हा प्रवास सुरू झाला. या मालिकेमुळे नीना कुलकर्णी, अमोल कोल्हे या ग्रेट कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यानंतर मुख्य सीन म्हणजे पावनखिंडीचा. कोरोना आणि पर्यायाने आलेल्या लॉकडाऊनमुळे गुजरातमध्ये पावनखिंड उभी करण्यात आली. शूट रद्द होणार असं वाटत असताना पुन्हा सुरू झालं. त्यामुळे युद्धाचा सराव दोन दिवस आधी झाला. केवळ माझा लढाईचा भाग शूट करण्यात आला पण या भागाच एडिटींग खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलं आणि प्रेक्षकांपर्यंत पवनखिंडीचा थरार पोहचला.

  आजी होती म्हणून…  

  मी ज्या क्षणी जॉब सोडायचा विचार केला, त्या क्षणापासून मी आजी माझ्यापाठिशी खंबीरपणे उभी राहिली. आज मी जो काही आहे त्यामध्ये आजीचा खूप मोठ्ठा वाटा आहे. माझे लाड करण्यापासून ते माझं आर्थिक पाठबळ म्हणून ती कायम खंबीरपणे उभी होती. तीने केवळ नातू म्हणून लाड नाही तर माझी जबाबदारी स्विकारली होती. आज आजी नसती तर श्रीपाद पानसे एवढा पुढे येऊ शकला नसता.