अभिषेकच्या ‘दृष्टी’कोनातून साहिल!

स्वामिनी या मालिकेमुळे अभिषेकला प्रेक्षकांच भरपूर प्रेम मिळालं. असचं प्रेम तो सध्या साकारत असलेल्या वैदेही या मालिकेतील साहिलवर करावं अशी आशा नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.

  काही कलाकार नेहमीच लहान-सहान भूमिकांमध्येही आपलं अस्तित्व सिद्ध करत असतात. त्यांची लहानशी व्यक्तिरेखाही त्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची ठरत असते. अभिषेक रहाळकर हा देखील एक असाच एक हरहुन्नरी अभिनेता आहे. जो नेहमीच आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. अभिषेक खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला तो ‘स्वामिनी’ या मालिकेमुळे. पेशव्यांवर आधारीत या मालिकेत अभिषेकने साकारलेल्या सदाशिव भाऊ या व्यक्तीरेखा आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या व्यक्तीरेखेमुळे अभिषेकला प्रेक्षकांच भरपूर प्रेम मिळालं. असचं प्रेम तो सध्या साकारत असलेल्या वैदेही या मालिकेतील साहिलवर करावं अशी आशा नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.

  सोनी मराठीवर नुकतीच सुरू झालेली वैदेही ही मालिका प्रोमोपासूनच प्रेक्षकांना आवडली. मालिकेचा वेगळा विषय प्रेक्षकांना भावला. या मालिकेत अभिषेक साहिल ही व्यक्तिरेखा साकारतोय. साहिल  हा अंध आहे, पण प्रचंड स्वाभिमानी आहे. भूमिका छोटी असो वा मोठी ती अभ्यासपूर्ण करण्याकडे उत्तम कलाकाराचा कल असतो. त्याचप्रमाणे अभिषेकनेही  ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दिली आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा हा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतोय.   

  हॅपी गो लकी साहिल

  आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, साहिल हा अंध पण तो प्रचंड पॉझिटीव्ह आहे. आयुष्यात कोणत्याही गोष्टी बघताना सकारात्मकदृष्टीने कसं बघावं हे साहिलकडून शिकण्यासारखं आहे. तो आयुष्य खूप आनंदात जगत असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो. फक्त एक गोष्ट साहिलमध्ये आहे ती म्हणजे तो प्रचंड स्वाभिमानी आहे. त्याला कोणी सहानुभूती दाखवलेली अजिबात आवडत नाही. त्याचं म्हणणं असतं की मी स्वातंत्र आहे मला तुम्ही सामान्य माणसाप्रमाणेच ट्रीट करा. असा साहिल साकारणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजींग होतं. केवळ अंध व्यक्तीची भूमिका साकारायची आहे असा विचार न करता. ती भूमिका लोकांनाही तेवढीच खरी वाटली पाहिजे ही मोठी जबाबदारी माझ्यावर होती. पण ही भूमिका माझ्या वाट्याला आल्याचं आनंद प्रचंड होता.

  नॅब संस्थेची मदत

  साहिल साकारायचा आहे हे कळताच मला काहीतरी वेगळं करायला मिळतय हे पहिलं मनात आलं आणि लगेचच हे चॅलेंज स्विकारलं. ऑडिशननंतर, लूक टेस्ट झाली. पण त्यानंतर पोटात मोठा गोळा आला. कारण साहिल हा प्रेक्षकांना खरा वाटला पाहिजे. त्याचप्रमाणे अंध व्यक्तींचं चूकीचं प्रेझेंटेशन प्रेक्षकांसमोर व्हायला नको. त्यामुळे मी नाशिकमध्ये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड ला भेट दिली. तिथल्या पदाधिकाऱ्यांनी खूप मदत मला केली. त्याच संस्थेतील सोनी मॅडम यांनी मला यातले बारकावे शिकवले. त्या स्वत: अंध आहेत. त्यांच्याकडून मी हातातली काठी कशी वापरतात, मोबाईल कसा वापरतात, घड्याळ कसं वापरतात हे शिकलो. नोटा, पैसे कसे बघतात, नवीन आलेल्या नोटांमुळे कसा त्रास होतो हे समजून घेतलं. त्यानंतर मी या सगळ्याची प्रॅक्टीस केली. ठाणे- बोरीवली असा साहिलबनून प्रवासही केला. त्यामुळे ही भूमिका योग्यपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवणं हाच प्रयत्न आहे.

  त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं

  नॅब संस्थेत गेल्यावर मला हे जाणवलं की त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण आपल्या आयुष्यात खूप कारणं देत असतो. मला असचं होतय, मला तमुकच हवयं, मी हेच नाही करू शकत अशी सतत कारणं आपण शोधत असतो. आपल्या दिसणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी विचारतो करतो की आपण जर अंध झालो तर आपली वाट लागेल आपण ही कल्पनाच करू शकत नाही.  पण ते प्रत्येक गोष्टी स्वावलंबी होऊन करातात. जॉब करतात, पैसे कमवतात. त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त जाणवली ती म्हणजे आपल्या डोळ्यांमुळे आपण अनेक गोष्टी मिस करतो. उदाहरणार्थ एखादं फुल आपण बघतो असतो तर ते आपण हे एक फुल आहे या दृष्टीने त्याच्याकडे बघतो. पण त्या फुलाला छान सुगंध असतो, त्याचं खूप स्ट्रक्चर असतं, त्याचा स्पर्शाचा अनुभवच आपण घेत नाही. या सगळ्या गोष्टींचा खरा आनंद मी त्यांच्याकडून शिकलो. यामुळे माझ्यातही खूप बदल झाला आहे. यापुढे मी सगळ्या गोष्टींचा सगळ्याबाजूने आनंद घेतो.

  मालिकेत पहिल्यांदाच प्रयोग

  मालिकेत पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिकेत अंध ही व्यक्तीरेखा आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अंधपणावर ती मालिका आधारीत नाहीये. तर त्याच्यातले अनेक पैलू या मालिकेत उलगडून दाखवले आहेत. केवळ मालिकेत एक अंध व्यक्ती एवढीच त्याची ओळख नाहीये तर हे मध्यवर्ती पात्र आहे. वैदेही आणि साहिलची एक गोष्ट आहे. मालिकेचा विषयच खूप छान आहे. रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टी मालिकेत आहेत. मालिकेतले अनेक प्रसंग प्रेक्षक स्वत:शी रिलेट करू शकतात. मालिकेतले सगळेच कलाकार खूप छान आहेत. त्यामुळे खूप छान भट्टी जमली आहे. काम करायलाही खूप मज्जा येते. माझी भूमिकाही टिपीकल नाहीये. मी कोणालातरी रिप्रेझेंट करतोय याचा आनंद आहे.

  ‘स्वामिनी’ मालिका आजही स्पेशल

  स्वामिनी मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. पहिल्यांदाच मालिकेत मोठी व्यक्तीरेखा होती. त्या व्यक्तीरेखेला मालिकेत महत्त्व होतं. सदाशिवभाऊ साकारताना खूप छान वाटलं. खूप शिकायला मिळालं. आज मालिका संपून इतके महिने झाले तरी आजही प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया येतात. भाऊसाहेब म्हणूनच सगळे आजही ओळखतात. त्या भूमिकेला प्रेक्षकांच प्रचंड प्रेम मिळालं. त्यामुळे अशीच आशा आहे की साहिल या पात्रावरही प्रेक्षकांनी असच भरभरून प्रेम करावं. या भूमिकेत आणि सदाशिवभाऊंच्या भूमिकेत प्रचंड फरक आहे. एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलोय. त्यामुळे प्रेक्षकांच असच प्रेम प्रत्येक भूमिकेला मिळावं.

  चांगल्या स्टोरीच्या प्रतिक्षेत

  मालिकांप्रमाणेच आता चित्रपटातही काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे चांगल्या स्क्रीप्टच्या प्रतिक्षेत आहे. मध्यंतरी मी पार्क नावाचं एक नाटक करत होतो पण लॉकडाऊनमुळे नाटकाचे प्रयोग थांबले. आता नाट्यगृह उघडताच पुन्हा नव्याने नाटक सुरू करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे सध्या ओटीटी हा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वेबसिरीजमध्येही काम करण्याची इच्छा आहे.