पुतळाबाईंच्या भूमिकेतील स्पिरिच्युअल गुरू सायली जाधव!

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत राणी पुतळाबाईंची भूमिका साकारणाऱ्या सायली जाधवच्या अंगीही काही सुप्त गुण दडलेले आहेत. 'नवराष्ट्र'सोबत गप्पा मारताना तिनं आपल्या अनोख्या रूपाबाबत सांगितलं.

  काही कलाकारांच्या अंगी अभिनयाखेरीज इतरही गुण असतात, पण ते फारसे जगासमोर येत नाहीत. एखादा कलाकार जेव्हा मनमोकळेपणाने गप्पा मारतो तेव्हा गप्पांच्या ओघांमध्ये त्यांचे इतर सुप्त गुणही समोर येतात. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत राणी पुतळाबाईंची भूमिका साकारणाऱ्या सायली जाधवच्या अंगीही काही सुप्त गुण दडलेले आहेत. ‘नवराष्ट्र’सोबत गप्पा मारताना तिनं आपल्या अनोख्या रूपाबाबत सांगितलं.

  सायलीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. २०१४ मध्ये कॅालेजमध्ये असताना ड्रामा टीममध्ये काम करत असताना तिला ‘आंबट गोड’ ही मालिका मिळाली. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘कुलस्वामिनी’, ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकांमध्ये ती विविध रूपांमध्ये दिसली. सायलीचे ‘फ्लिकर’ आणि ‘ब्लँकेट’ हे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. याखेरीज सायली एनर्जी हिलर आणि स्पिरीच्युअल गुरूही आहे. ती टॅरो कार्ड रिडींग, चक्र हिलींगही करते. अनोख्या वाटेवरील या प्रवासाबाबत सायली म्हणाली की, मागच्या लॅाकडाऊनमध्ये काही काम नव्हतं. अचानक मुख्य मालिका बंद झाल्यानं खूप मेंटल स्ट्रेस आला होता. त्यातून मला स्वत:लाही सावरायचं होतं आणि घरही चालवायचं होतं. त्यामुळं स्वत: हिलींग सुरू केलं. बऱ्याच गोष्टी शिकत गेले आणि त्यातून मला खूप आनंद मिळाला. हा आनंद इतरांनाही देण्यासाठी फ्री रिडींग आणि फ्री हिलींगही करते. मी जे युनिव्हर्सकडून घेतलंय ते देण्याचाही प्रयत्न करतेय. लॅाकडाऊनमध्ये मी या गोष्टी आत्मसात केल्या. अभिषेक शर्मा, रेशम कम्बोज, पायल मेहता या गुरुंकडून विविध गोष्टी आॅनलाईन शिकले. आता शूटिंग सुरू असतानाही मी क्लासेस अटेंड करतेय. सध्या अभिनय, रिडींग आणि हिलींग या तीन गोष्टी मी एकाच वेळी करतेय. सकाळी सात वाजल्यापासून माझे क्लासेस सुरू असतात. ‘बी द लाईट विथ सायली’ या ब्रँडखाली सकाळपासून क्लासेस घेते आणि प्रोफेशनली रिडींगही करते. इथे मी माझ्या स्पिरीच्युअल गोष्टी शेअर करते.

  पुतळाबाईंची भूमिका साकारण्याबाबत सायली म्हणाली की, यापूर्वी मी पौराणिक कॅरेक्टर्स केली आहेत, पण ऐतिहासीक भूमिका साकारण्याची पहिलीच वेळ आहे. ‘लक्ष्मी नारायण’ या मालिकेत मोहिनी साकारली आहे. ‘विठू माऊली’ आणि ‘गणपती बाप्पा’मध्येही काम केलं आहे. पुतळाबाईंची भूमिका साकारण्याची आॅफर आल्यावर सर्वप्रथम मला या व्यक्तिरेखेतील चॅलेंज जाणवलं. यापूर्वी कधीच ऐतिहासीक मालिका केलेली नसल्यानं फार अंदाज नव्हता. पौराणिक मालिका केल्यानं अशा मालिकांमध्ये कशा प्रकारची भाषाशैली असते त्याबाबत ठाऊक होतं. इतर कॅरेक्टर्स आपण उभी करतो, पण पुतळा राणीसाहेबांचं कॅरेक्टर आॅलरेडी होऊन गेलेलं आहे. त्यामुळं त्यांची छबी या कॅरेक्टरमध्ये उतरवण्याचं आव्हान होतं. यासाठी वाचन केलं. पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा सोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या इतक्या भारी होत्या की त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. त्यांचं मन खूप मोठं होतं. त्यामुळं मी केवळ त्यांची अॅक्टींग करू शकते. त्यांच्यासारखं होणं जमणार नाही. मी माझ्या परीनं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतेय. डॅा. अमोल कोल्हे, नीना कुलकर्णी यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा एक्सपिरीयन्स खूप हिलींग आहे.

  वात्सल्याची साक्षात मूर्ती
  पुतळाबाई अतिशय प्रेमळ, मायाळू आणि वात्सल्याची जणू मूर्तीच होत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्यासाठी केवळ पती नव्हते, तर दैवत होते हे सर्वांनाच माहित आहे. त्यांनी महाराजांकडे कधीच पन्तीच्या नजरेतून पाहिलं नाही. त्यांचं नातं देव आणि भक्ताप्रमाणं होतं. त्यांच्याकडं त्या देवाप्रमाणे श्रद्धेनं पहायच्या. त्यामुळं राज्यावर कितीही मोठं संकट आलं तरी राजे परत कधी येणार? राजे सुखरूप आहेत ना? हेच प्रश्न कायम पुतळाबाईंच्या मुखात असतात. फक्त राजे आणि राजेच… त्यांच्या पलीकडे पुतळाबाईंचं विश्व नव्हतं. त्या राणी असल्यानं इतर गोष्टी त्या पहायच्याच, पण सतत त्यांना राजांची काळजी असायची. इतर राण्यांना राज्य, पैसा, ऐश्वर्य यांची चिंता असायची, पण पुतळाबाईंना केवळ राजांची चिंता असायची. त्यामुळं पुतळाबाईंचं कॅरेक्टर मनाला भिडणारं असून, मी त्यांच्या प्रेमात आहे.

  जिजाऊ मांसाहेबांचे अनभिज्ञ पैलू
  यापूर्वी आपण मायाळू आणि वात्सल्याच्या मूर्ती असलेल्या जिजाऊ पाहिल्या आहेत. आता त्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा ही सिरीयल सुरू आहे, तेव्हा त्यांचे आजवर कधीही समोर न आलेले पैलू पहायला मिळत आहेत. एका स्त्रीमध्ये किती लढाऊ बाणा असू शकतो हे समजत आहे. आपल्या लेकराला दररोज मरणाच्या दारात पाठवण्याइतकी शूर स्त्री इतिहासात झालेली नाही. त्या खऱ्या अर्थानं वीर माता होत्या. त्यामुळंच शिवरायांसारखं महान रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. त्यांचं हृदय किती मजबूत होतं असेल याची केवळ कल्पनाच करता येऊ शकते. आपल्या मनातील घालमेल त्या कोणालाही दाखवू शकत नव्हत्या. कारण त्यांना राण्यांसोबतच प्रजा आणि स्वराज्यही सांभाळायचं आहे. राजेंना मार्गदर्शन करायचं आहे. थोडक्यात सांगायचं तर त्या स्वराज्याचा एक खांब होत्या. त्या खांबावर स्वराज्याचा डोलारा उभा होता. मानसिकदृष्ट्या त्या खूप स्ट्राँग होत्या.

  एकत्र रहाणं गरजेचं…
  प्रत्येक काळात त्याच गोष्टी पुन: पुन्हा घडत असतात. त्यामुळंच इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं आपण म्हणतो. केवळ त्याचं रूप वेगळं असतं, चेहरा बदलत असतो, पण बेस तोच असतो. हे निसर्गचक्र आहे. लढाई तीच असते, फक्त स्वरूप बदललेलं असतं. आताचा काळही तसाच आहे. त्या काळी जेव्हा मोघल किंवा गनिम स्वराज्यावर आक्रमण करायचे, तेव्हा ज्याप्रकारे जनता एकत्र उभी राहून त्यांचा सामना करायची तशीच परिस्थिती आजही आहे. आताही तीच गरज आहे. त्या काळी राजे आणि मावळे होते. आजच्या काळात केवळ त्यांचं रूप बदललं असून, ते फ्रंटलाईन वर्कर्स बनले आहेत. त्यामुळं सर्वांनी एकत्र राहून शत्रूचा सामना करण्याची वृत्ती बाळगणं गरजेचं आहे.