ग्रे शेड भूमिका साकारताना… तेजस बर्वेने शेअर केला अनुभव!

नायकाच्या भूमिकेत दिसणारा हा गोड चेहरा आता ग्रे शेड भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या भूमिकेविषयी नवराष्ट्रशी बोलताना ही भूमिका चॅलेंजींग असल्याचं तेजसने सांगितलं.

    मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे तेजस बर्वे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. या मालिकेती सुमी आणि समरची जोडी हीट ठरली. या मालिकेनंतर तेजसने मागे वळून पाहिलचं नाही. त्यानंतर तो वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेजसची नुकतीच सोनी मराठीवरील ‘वैदेही’ या मालिकेत एन्ट्री झाली आहे. एरवी नायकाच्या भूमिकेत दिसणारा हा गोड चेहरा आता ग्रे शेड भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या भूमिकेविषयी नवराष्ट्रशी बोलताना ही भूमिका चॅलेंजींग असल्याचं तेजसने सांगितलं.

    मुळचा पुण्याचा असणाऱ्या तेजसने टिळक रोड इथल्या गोळवलकर विद्यालयात त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना तेजच्या अभिनयातील प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. कॉलेजच्या पहिल्या वर्षांत त्याने बऱ्याच एकांकिका केल्या. सुमन करंडक, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया अशा स्पर्धांमध्ये तेजसच्या अभिनयाच्या झलक सगळ्यांनीच बघितली. त्यानंतर तेजसने ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात डेब्यू केला. या मालिकेत त्याने सचिन देसाईची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तेसजसने क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीवर आधारित ‘चॅलेंज’ या ऐतिहासिक नाटकामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. त्याने फत्तेशिकस्त यांच्याबरोबर साहाय्यक दिग्दर्शकाचे काम देखील केलय. तेजस बर्वेला खरी लोकप्रियता झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून मिळाली. आता वैदेही या मालिकेत तेजस ‘पराग’ नावाची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर प्लॅनेट मराठीवर तेजसची ‘बाप बीप बाप’ ही वेबसिरीजही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सगळ्याबद्दल तेजसने नवराष्ट्रबरोबर मारलेल्या या खाल गप्पा.

    पहिल्यांदाच ग्रे शेड भूमिकेत..

    वैदेही या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच ग्रे शेड भूमिकेत दिसणार आहे. या आधी मी कधीच या जवळपास जाणारं कॅरेक्टरही केलं नव्हतं. माझ्या अगदीच विरूध्द असणारी ही भूमिका आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मला वेगळा अभ्यास करावा लागला. या मालिकेत पराग नावाचं पात्र करतोय. प्रत्येक व्हिलनचमागे काहीतरी कारण असतं. तो उगाच व्हिलन नसतो. परागच्या या भूमिकेमागे अशीच काही कारणं आहेत. परागलाही पैसे कमवणारी मुलगी हवी असते. या आधीही त्याने अनेक मुलींना फसवलं आहे. त्यांच्याकडून पैसे काढून घेतले आहेत. हाच त्याचा मुख्य उददेश आहे. असा तो विचित्र आहे. खरतर ही भूमिका माझ्याकडे आली तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण या आधी मी कधीच अशी भूमिका साकारली नव्हती. आजपर्यंत माझ्या भूमिका बघता मला अशी भूमिका ऑफर होईल असा विचारच मी कधी केला नव्हता. या आधी नायक, अज्ञाधारक मुलगा अशा प्रकराच्या भूमिका केल्या होत्या. पराग ही भूमिका तेजसची इमेज ब्रेक करणारी ठरणार आहे. त्याचप्रमाणे या भूमिकेमुळे मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे लगेचच या मालिकेला होकार दिला.

    वैदेही भोवती मालिका

    संपूर्ण मालिका ही वैदेहीवर केंद्रीत असणार आहे. वैदिही तिच्या घरात कमवणारी एकटी मुलगी आहे. ती खूप हुशार आहे. पण कोणतीही परिस्थिती उत्तम पद्धतीने हाताळण्याची हतोटी तिच्याकडे आहे. पुढे जाऊन तिच्या आयुष्यात परागची एन्ट्री झाल्यावर तो कशाप्रकारे तिला फसवतो.. ती येणाऱ्या संकटाला कशाप्रकारे तोंड देते. तिचा एक मित्र आहे साहिल जो अंध आहे. त्याचप्रमाणे मालिकेत गुरूजींनी असं सांगितलं असतं की तिची पत्रिका ही सीतेसारखी आहे. त्यामुळे तिचं बरचसं आयुष्य हे सीतेप्रमाणे जाणार आहे. त्यामुळे अनेकगोष्टी रामायणाशी कनेक्टेड असणार आहेत. साहिलं कॅरेक्टर हे थोडसं रामाशी कनेक्टड आहे. तर वैदेही ही सीतप्रमाणे आहे तर परागची यांच्या आयुष्यातील एन्ट्री ही रावणाप्रमाणे असणार आहे.

    मालिकेच्या निमित्ताने मैत्री झाली

    या मालिकेतील आम्ही सगळेच कलाकार पहिल्यांदा एकमेकांबरोबर काम करत आहोत. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने आम्ही भेटलो. आता हळूहळू आमच्यात मैत्री होतेय. कारण सुरूवातीला आम्ही एकमेकांना ओळखत नसल्यामुळे फारसे बोललो नाही. कारण प्रत्येकाला वाटत होतं. समोरचा व्यक्ती खूप आखडू आहे. तो काही आपल्याशी बोलणार नाही. पण आता हळूहळू समजलय ही कोणीच तस नाहीये. आम्ही सगळे सारखेच आहोत. सायली, अभिषेक आणि माझे जास्त सीन एकत्र असल्यामुळे आमचं एक वेगळं बॉण्डींग तयार झालय. त्यामुळे याचा फायदा आम्हाला ऑनस्क्रीन होतोय. या निमित्ताने सायली आणि अभिषेक हे छान मित्र मला मिळाले आहेत.

    बाप बीप बाप

    ‘प्लॅनेट मराठी’ चे मी खूप आभार मानेन की त्याने मराठी कटेंटसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा केला. एकावेळी पाच वेबसिरीज लाँच करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. ‘बाप बीप बाप’ मध्येही  अनेक मोठे कलाकार आहेत. या निमित्ताने शरद पोंक्षे, पर्ण पेठे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. या वेबसिरीजमुळे खूप गोष्टी नव्याने शिकलो. हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. या वेबसिरीजमुळे मला आणखी एक फायदा झाला तो म्हणजे शरद पोंक्षे यांच्याकडून व्हिलन समजून घेता आला. ज्याचा मला वैदेही या मालिकेत काम करताना उपयोग होतोय. कारण आजपर्यंत शरद दादांनी अनेक खलनायक साकारले. त्यांनी मला व्हिलन साकारताना काय करू नकोस हे खास करून सांगितलं. त्यामुळे माझ्या डोक्यातली टिपीकल व्हिलनची संकल्पना निघून गेली. ‘बाप बीप बाप’ ही वडिल आणि मुलाची गोष्ट आहे. त्यात मी श्लोक नावाची भूमिका करतोय. त्यात जनरेशन गॅप, श्लोकचं खराब झालेलं लव्ह लाईफ लॉकडाऊनमुळे ज्या वडिलांशी पटत नसतं. त्यांच्याबरोबर दोन महिने राहण्याची वेळ त्याच्यावर येते आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात जे घडतं ते तुम्हाला ‘बाप बीप बाप’ मधून बघायला मिळणार आहे.

    ‘समर’ कायमच स्पेशल

    आजपर्यंत मी साकारलेल्या भूमिकांमध्ये सगळ्यात मोठी भूमिका ही समरची होती. माझ्यामध्ये समर अक्षरश: मुरला आहे. कारण काहीकाळ सतत एक भूमिका केल्यामुळे त्या भूमिकेतल्या अनेक गोष्टी तुमच्यात येतात. हे माझ्याबाबतीत फार झालं. या भूमिकेनंतर समरच्या अनेक गोष्टी माझ्यात दिसायला लागल्या. या मालिकेचं शूटींग साताऱ्यात असल्यामुळे शूटींगनंतरही आम्ही सगळे कलाकार एकत्रच असायचो. त्यामुळे आमचं ऑफस्क्रीन बॉण्डींग जबरदस्त झालं होतं. त्यामुळे मालिका संपल्यानंतर आपापल्या घरी आल्यावर जवळपास महिनाभर आम्हाला याची सवय मोडायलाच गेला. पण या मालिकेच्या निमित्ताने खूप चांगल्या कलाकारांबरोबर काम करता आलं. समर आणि सुमीवरही चाहत्यांनी खूप प्रेम केलं. मालिका संपून आज एवढे महिने झाल्यानंतरही आमची जोडी पुन्हा कधी दिसणार असे प्रश्न सतत चाहते विचारत असतात. तेव्हा आपण केलेल्या कामाचं चीज झालं असच वाटतं.