तुकोबांच्या देहूतील महेशचा ‘कंदील’ सांगणार श्रीमंतीचा मंत्र!

या चित्रपटासाठी झोपडपट्टीत राहून, तिथल्या गल्लो न गल्ल्या फिरून, खूप रिसर्च करून महेशनं श्रीमंतीचा मंत्र सांगणारा 'कंदील' चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं 'नवराष्ट्र'शी संवाद साधताना महेशनं 'कंदील'सोबतच पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी केलेला संघर्षही कथन केला.

  वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा लाभलेला आणखी तंत्रज्ञ सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या देहू गावात जन्मलेला महेश कंद हा तरुण दिग्दर्शक आपला नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहे. ‘कंदील’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट पिफमध्ये निवड झाल्यानं लाइमलाईटमध्ये आला आहे. या चित्रपटासाठी झोपडपट्टीत राहून, तिथल्या गल्लो न गल्ल्या फिरून, खूप रिसर्च करून महेशनं श्रीमंतीचा मंत्र सांगणारा ‘कंदील’ चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना महेशनं ‘कंदील’सोबतच पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी केलेला संघर्षही कथन केला.

  महेश कंदबाबत सांगायचं तर २००७ मध्ये त्यानं ‘पाठशाला’ फेम दिग्दर्शक मिलिंद उके यांच्यासोबत ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी चित्रपटाला असिस्ट केलं होतं. उकेंसोबत काम केल्यानंतर असिस्ट वगैरे करण्याऐवजी त्यानं थेट स्टडी करण्यावर भर दिला. दोन-तीन फिल्मसाठी असिस्ट केलं, पण त्या रिलीज झाल्या नाहीत. याबाबत महेश म्हणाला की, शॅार्टफिल्म, डॅाक्युमेंट्री, म्युझिक व्हिडीओ शूट केले. दिग्दर्शनासाठी जे आवश्यक असतं ते सर्व शिकलो. त्यानंतर एफटीआयला प्रोडक्शनसाठी काम केलं. दिग्दर्शनाचं तंत्र समजून घेतलं. फ्रेम लक्षात यायला हवी यासाठी फर्ग्युसन कॅालेजमध्ये पार्ट टाईम फोटोग्राफी कोर्स केला. ‘कंदील’ वास्तवात शूट करण्यापूर्वी मोबाईलमध्ये डमी फिल्म शूट केली आणि एडिट करून पाहिल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर प्रत्यक्षात चित्रपट शूट केला.

  ‘कंदील’चे पिफमध्ये चार प्रीमियर होणार आहेत. या चित्रपटासाठी झोपडपट्टीत जाऊन रिसर्च करण्याबाबत महेश म्हणाला की, या चित्रपटासाठी मी तिथे तीन वर्षे झोपडपट्टीत जाऊन अभ्यास केला. या कामी विनोद खुरंगळेची साथ लाभली. पिंपरी-चिंचवडमध्ये सहा-सात मोठ्या वस्त्या आहेत. जणू काही छोटी धारावीच आहे. तिथल्या वस्तीचा, राहणीमानाचा, व्यक्तिरेखांचा आणि एकूणच वातावरणाचा बारकाईनं अभ्यास केला. घराघरात जाऊन व्यक्तींना भेटलो. त्यांचा अभ्यास करून ‘कंदील’मधील व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. हा चित्रपट पडद्यावर कसा दिसायला हवा त्याकडं मी जास्त लक्ष दिलं. वास्तवात जसं चित्र मी पाहिलं तसं पडद्यावर उमटायला हवं हा माझा अट्टाहास होता. झोपडपट्टीतील वातावरणाची समज आल्यानंतर पटकथेतील प्रत्येक व्यक्तिरेखा मी स्लममध्ये जाऊन शोधली. यासाठी बऱ्याच लोकांचे फोटो, व्हिडीओ काढले. लेखकानं लिहिलेलं कॅरेक्टर आणि मी वास्तवात पाहिलेली व्यक्ती यावरून काही व्यक्तिरेखांची स्केचेस तयार करून आर्टिस्टला दाखवली. त्यानंतर हा चित्रपट पडद्यावर कसा यायला हवा यासाठी स्टडी सुरू केला.

  सिनेमाची उलटी प्रोसेस
  या सिनेमाची प्रोसेस थोडी उलट्या दिशेनं सुरू झाली आहे. यातील सर्व कलाकार माझे मित्रच आहेत. मित्रांना घेऊन सिनेमा करायचा असल्यानं लेखक अमरजीत आमले यांनी त्यांना नजरेसमोर ठेवून कथानक लिहीलं. मला स्लममधील मुलं पडद्यावर हवी होती म्हणून मी वस्तीत जाऊन शोध घेतला. व्यक्तिरेखांवर फार ग्लोरिफीकेशन करायचं नव्हतं, पण माध्यमासाठी आवश्यक असणारा साज द्यायचा होता. त्यासाठी रिअॅलिस्टीक अॅक्टिंगचे गुरू मानल्या जाणाऱ्या स्टॅनिस लोवास्कींचा अभ्यास केला. कास्टिंग अगोदरच झालं होतं. त्यामुळं दिवसभर स्लममध्ये फिरायचो, शूट करायचो आणि रात्री अॅक्टर्सकडून ट्रेनिंग करून घ्यायचो. असं दोन वर्षे काम केलं. वास्तववादी विषयासाठी वास्तववादी अभिनयाची गरज असते. हा सिनेमा म्हणजे रिअॅलिस्टीक कॅामेडी सटायर आहे. याला स्पिरीच्युअल सटायरही म्हणता येईल.

  पाच तरुणांच्या स्वप्नांचा प्रवास
  वस्तीतील पाच तरुणांच्या स्वप्नांचा प्रवास ‘कंदील’मध्ये आहे. स्वत:चं हॅाटेल सुरू करणं, हिरो बनणं, जीम उभारणं, चांगल्या मुलीसोबत लग्न करणं आणि या चौघांची स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणं ही यांची स्वप्नं आहेत. थोडक्यात काय तर यांना श्रीमंत व्हायचंय, पण एकाचाही प्रयत्न यशस्वी होत नाही. यांच्या आयुष्यात एक विचित्र बाबा येतो आणि त्यांना श्रीमंतीचा मंत्र देऊन जातो. यात मी हिरो बनू पाहणाऱ्या महेशची भूमिका साकारली आहे. पूर्वी अभिनय केल्यानं अनुभव आहे. यात विनोद खुरंगळे, मंदार फाकटकर, दिव्यराज ओव्हाळ, लक्ष्मण साळुंके, दिलीप अष्टेकर, मोहिनी अवसरे, कोमल बोरडे, संजीवनी पाटील आदी कलाकार आहेत. सिनेमॅटोग्राफी प्रसाद मोरे यांची असून, संगीत मंगेश धाकडेचं आहे. साउंड मिक्सिंग अनुप देवनं केलं आहे, तर राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबणवारनं साऊंड डिझाईन केलं आहे. भरत कुऱ्हाडे, मानव श्रोत्रिया आणि रमेश शेट्टी यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.

  वारकरी परंपरेचा पिढीजात वारसा
  संत तुकाराम महाराजांच्या देहू गावातील असल्यानं वारकरी परंपरेचा वारसा सोबत आहेच. खरं तर मी क्रिकेटर होणार होतो. त्यासाठी रोज पुण्याला जायचो, पण लहानपणापासून वडीलांनी मला अभिनयासाठी तयार केलं होतं. शाळेत असताना मलाही अभिनेताच व्हायचं होतं, पण मी छान क्रिकेटही खेळू लागलो होतो. माझे वडील लक्ष्मण कंद इतिहास संशोधक आहेत. वडीलांनीच अभिजीत कंद आणि माझ्यासोबत मिळून ‘कंदील’ची निर्मिती केली आहे. मागील तीस वर्षांपासून ते देहू गावचा सातशे वर्षांचा इतिहास लिहीत आहेत. पुढल्या वर्षी त्यांचं पुस्तक प्रकाशित होईल. आमच्या घराण्याला वारकरी परंपरेसोबत राजकीय पार्श्वभूमीही आहे. माझ्यासकट सर्वजण माळकरी आहोत. आध्यात्मिक अभ्यास कायम सुरू असतो. किर्तन-प्रवचन ऐकणं, गाथा वाचन, जप केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. हे सर्व केल्यानंतर मग सिनेमा.