विविधांगी भूमिका साकारणाऱ्या निखिलने आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना केलं ‘मोहीत’!

आजवरच्या कारकिर्दीत मोहितनं नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. आता तो या मालिकेत ग्रे शेडेड भूमिका साकारत आहे. या निमित्तानं 'नवराष्ट्र'शी गप्पा मारताना निखीलनं आजवर साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांबाबत सांगितलं.

    काही कलाकार नेहमीच लहान-सहान भूमिकांमध्येही आपलं अस्तित्व सिद्ध करत असतात. त्यांची लहानशी व्यक्तिरेखाही त्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची ठरत असते. निखील राऊत हा देखील एक असाच एक हरहुन्नरी अभिनेता आहे, जो स्पॅाट बॅायपासून अभिनेता बनण्यापर्यंतच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या रूपांमध्ये रसिकांना ‘मोहीत’ करत आला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत निखील साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं नावही मोहित आहे. आजवरच्या कारकिर्दीत मोहितनं नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. आता तो या मालिकेत ग्रे शेडेड भूमिका साकारत आहे. या निमित्तानं ‘नवराष्ट्र’शी गप्पा मारताना निखीलनं आजवर साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांबाबत सांगितलं.

    छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत बऱ्याच व्यक्तिरेखा निखीलनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर सजीव केल्या आहेत. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’मध्ये निखीलनं साकारलेली किसना ही छोटीशी व्यक्तिरेखा त्याच्या करियरला कलाटणी देणारी ठरली. व्यक्तिरेखांची निवड करण्याबाबत निखील म्हणाला की, भूमिकेची लांबी न पाहता डेप्त आणि ट्रीगर असलेली भूमिका करण्याला मी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुणेरी मिसळमधील विनोदी व्यक्तिरेखा, ‘तू तिथं मी’मधील खलनायक आशिष साकारणं आणि आता मोहीत साकारणं यात प्रचंड तफावत आहे. मी स्वत:ला कधीच ठराविक भूमिकांमध्ये बंदिस्त केलं नाही. मोहीत हा ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचा ट्रीगर आहे. तो कारस्थानं करतोय, पण या भूमिकेचीही पावती मला मिळतेय. ‘स्वीटूला नको छळू’, ‘तिला नको त्रास देऊ’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं हे कॅरेक्टर लोकांना आवडत असल्याचं लक्षण आहे. या कॅरेक्टरची मजा येतेय. ही व्यक्तिरेखा विनोदी अंगानं जाणारी असल्यानं प्रेक्षकही या कॅरेक्टरचा आनंद घेत आहेत.

     

    आजवरच्या करियरमध्ये प्रथमच ग्रे शेडेड भूमिका स्वीकारण्याबाबत निखील म्हणला की, २०२०हे वर्ष आपल्या सर्वांना बरंच काही शिकवून गेलं. त्या शिकवणीतून मी ही मालिका स्वीकारली आहे. लॅाकडाऊननंतर जे काम समोर येईल ते करण्याचा निर्णय घेतला होता. अगदी ग्रे शेडेड व्यक्तिरेखाही करायला तयार होतो. अनायसे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ची आॅफर आली. त्यातील निखील नावाच्या व्यक्तिरेखेत काहीतरी वेगळेपण आणण्यास वाव असल्याचं मला जाणवल्यानं मालिका स्वीकारली. पाच वर्षांपूर्वी झी मराठीवर ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत काम केलं होतं. व्हेरिएशन द्यायचं मी ठरवलेलंच आहे. मोहीतमध्ये मला ते वेगळेपण जाणवलं. या निमित्तानं पुन्हा झीसोबत काम करता आलं. महाराष्ट्राचा सुपरस्टारपासून मी झीसोबत काम करतोय. वाहिनीच्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास टाकून माझंच नाव फायनल केलं. मोहीतच्या माध्यमातून मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवू शकल्याचं समाधान आहे.

     
    ही एक वृत्ती आहे
    मूळात मोहीत ही एक वृत्ती आहे. जी हुजूरी करणं, बॅासची हाजी हाजी करणं, स्वत:चा स्वार्थ साधून घेण्यासाठी कुठल्याही थराला जाणं या वृत्तीची माणसं आपण आजूबाजूला नेहमीच पहात असतो. मोहीत त्यापैकीच एक आहे. अशा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असतात. त्यामुळं मोहीत साकारण्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागला नाही, पण या भूमिकेसाठी ‘काहे दिया परदेस’मधील विकी मला मदत करणारा ठरला. मोहीत प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. याला खूप पैसे कमवायचे असल्यानं टोकाला जायची तयारी आहे. त्यामुळं स्वीटूसोबत लग्नाचा घाट घालण्यापर्यंत तो मजल मारतो. बऱ्याच करामती करतो. कट-कारस्थानं रचतो, पण त्यात काही यशस्वी होत नाही.

    अन्वितासोबतची आॅफस्क्रीन केमिस्ट्री
    मी साधारण १९ वर्षांपासून काम करतोय. त्या तुलनेत अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर हे दोघेही नवखे असले तरी खूप छान काम करत आहेत. मजा-मस्ती करत सेटवर काम करतात. अन्विता आणि माझं आॅफस्क्रीन खूप छान ट्युनींग आहे. आम्ही कायम गंमती जंमती करत असतो. त्यामुळं आॅनस्क्रीन तिला कितीही त्रास देत असलो तरी आॅफस्क्रीन तिला खूप चॅाकलेटही देत असतो. दोघांसोबत प्रथमच काम करतोय. दोघेही खूप मेहनती असल्यानं काम करायला मजा येतेय. आदिती सारंगधर मला सिनीयर आहे. तिनं बरंच काम केलं आहे. तिच्या सिनीयरीचा फायदा होत आहेच, पण आमचीही एक केमिस्ट्री आहे. त्यामुळं गिव्ह अँड टेक करताना खूप सोपं जातं.

    याच्याकडून काहीही घेऊ नका
    मोहीतकडून काहीही घेऊ नका. कारण अशा वृत्तीची माणसं फार धोकादायक असतात. मोहीतकडून केवळ मजा घ्या. कारण खलनायकी भूमिका साकारताना नायकानं कशी त्याची फजिती केली हे लोकांना पहायला आवडतं. त्या फजितीची मजा घ्या. घडणाऱ्या विनोदांची आणि माझ्या कामाची मजा घ्या. निखीलकडून तुम्ही खूप काही घेऊ शकता. पेशन्स ठेवणं हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे आहे. तो आज खूप महत्त्वाचा आहे. आज आम्ही घरापासून दूर राहून मनोरंजनाचं काम करत आहोत. स्पॅाट बॅायपासून आतापर्यंतचं कामातील सातत्य हा गुण सर्वांना घेण्यासारखा आहे. नवीन मुलांना मी सांगू इच्छितो की, या क्षेत्रात प्रचंड स्ट्रगल आहे, मेहनत आहे. त्यामुळं तशी तयारी ठेवून या.