समीरच्या पांडुरंगानं ठोकला पुरस्कारांचा षटकार

जगभर पुरस्कारांचा वर्षाव होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्तानं समीरनं 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला.

  पुण्यामध्ये आयकर अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या विठ्ठल भोसले यांनी सिनेदिग्दर्शनाकडे वळत बनवलेल्या ‘फिरस्त्या’ या मराठी चित्रपटानं पुरस्कारांचं अर्धशतक ठोकत तब्बल ५३ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या समीर परांजपेनं सहा पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. जगभर पुरस्कारांचा वर्षाव होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्तानं समीरनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला.

  कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेद्वारे घरोघरी पोहोचलेल्या समीर परांजपेचा ‘फिरस्त्या’ देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा डंका वाजवत आहे. या चित्रपटात काम करण्याबाबत समीर म्हणाला की, ‘फिरस्त्या’ ही ध्येय गाठण्याची जिद्द अंगी बाणलेल्या गावातील प्रत्येक मुलाची कथा आहे. ‘गोठ’ या मालिकेनंतर मी टेलिव्हीजन करत नव्हतो. सिनेमांसाठी ट्राय करत होतो. इतक्यात पुण्यात एका चित्रपटाची आॅडीशन सुरू असल्याचं समजलं. मुंबईत रहात असल्यानं पुण्याला फारसं जाणं होत नव्हतं. एका कामाच्या निमित्तानं पुण्यात गेलो, तेव्हा आॅडीशन दिली. तोपर्यंत मला चित्रपट काय आहे वगैरे काहीच कल्पना नव्हती. आजवर मी अर्बन कॅरेक्टर्स केल्यानं रुरल कॅरेक्टरला कितपत न्याय देऊ शकेन ही शंका आॅडीशन द्यायला गेल्यावर तिथल्या लोकांच्या डोळ्यात पहायला मिळाली होती. आॅडीशन दिल्यावर मात्र त्यांचा विचार बदलला. नंतर त्यांनी मला तो बोलूनही दाखवला. या कॅरेक्टरसाठी सोलापूर-बार्शी भागातील बोलीभाषा हवी असल्याचं मला समजलं. तोच माझ्यासाठी प्लस पॅाईट ठरला. ते ऐकल्यावर मी थोडासा रिलॅक्स झालो. कम्फर्ट झोनमध्ये आलो. आत्मविश्वास वाढला. कारण ही भाषा मी लहानपणापासून बोलत आलोय, ऐकत आलोय त्यामुळं आपल्यासाठी ती सरावलेली भाषा आहे. दुसरा एक आनंद होता की आपल्याला या भाषेत काम करायला मिळणार आहे. कारण आजपर्यंत मला नेहमीच अर्बन आणि स्टँडर्ड भाषेत काम केलं आहे. या चित्रपटात मला माझ्या भाषेत बोलायची संधी मिळणार होती. त्यामुळं सीन समोर आल्यावर तो अत्यंत आत्मविश्वासानं केला. स्क्रीनटेस्ट व्यवस्थितपणे दिली. काही अॅडीशन दिल्या. तिथल्या भाषेतील काही बारकावे वापरले. ते पाहून त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. काही दिवसांनंतर दिग्दर्शक विठ्ठल भोसलेंचा फोन आला. तुझी आॅडीशन आम्हाला आवडली. भाषाही आम्हाला अपेक्षित असल्याचं सांगितलं आणि फायनली मला ‘फिरस्त्या’ मिळाला.
  आजघडीला या चित्रपटानं देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये ५३ पुरस्कार पटकावले आहेत. यापैकी सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी मला वैयक्तिक सहा पुरस्कार मिळाले आहेत. यात ल्युलिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल स्वीडन, प्राग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, इंडो-फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पाँडीचेरी, उरुवट्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, स्वीडन फिल्म अॅवॅार्डस, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल रोमानिया अशा एकूण सहा पुरस्कारांचा समावेश् आहे.

  दिग्दर्शकांचं व्हिजन क्लिअर होतं
  दिग्दर्शन काय किंवा लेखन काय हे प्रोफेशन असल्याचं मला वाटतं. प्रत्येक माणसाकडे एक गोष्ट असते. मग तो त्याच्या लाईफचा स्ट्रगल असो, वा आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी असोत. त्यामुळं प्रत्येकाला स्टोरी टेलिंग येत असते. लेखक ते कागदावर उतरवतात. कागदावर उतरवलेली गोष्ट पडद्यावर कशी दाखवता येईल हे दिग्दर्शक पहातो. इतकाच काय तो फरक आहे. विठ्ठल भोसले यांनी मला ऐकवलेली कथा खूप ओरिजनल होती. शेवटी एखादी गोष्ट तुमच्या अनुभवांची असते, तेव्हा ती ओरिजनल असते. ओरिजनल गोष्ट प्रत्येकाला कुठे ना कुठे भावते. तशी ती मलाही भावली. यात कोणताही आर्टिफिशीअल टच नव्हता. भोसलेंनी अगोदर दिग्दर्शन केलेलं नसणं हे खरं तर या गोष्टीसाठी फायदेशीर होतं. कारण जर खूप स्कील्ड माणसाकडं ती गोष्ट गेली असती तर त्यातील रॅानेस निघून जाण्याची भीती होती. गोष्ट सुंदर असली की ती भावते. मग फ्रेम कोणती लावलीय, अँगल कोणता आहे हे दुय्यम ठरतं. त्यात काँटेंट काय आहे हे शेवटी महत्त्वाचं ठरतं आणि भोसलेंचं व्हिजन अतिशय क्लिअर होतं.

  पांडुरंगाच्या शिक्षणाचा स्ट्रगल
  यात मी पांडुरंगची व्यक्तिरेखा साकारली आहे. हे कॅरेक्टर साकारताना आजूबाजूला असलेली मुलं, मित्र, वर्गातील क्लासमेटस हे सगळे त्यात असल्याचं जाणवलं. गावाकडून पायी प्रवास करून शाळेत जाणारी मुलं पाहिली आहेत. मी लहानाचा मोठा झालो ते बार्शी हे गाव जरी तालुक्याचं असलं तरी शिक्षणाच्या उत्तम सोयी आहेत, पण त्या शाळेतील माझे काही मित्र रोज पायी आठ-दहा किलोमीटर चालत शाळेत यायचे. आम्ही कधी कधी त्यांच्या शेतात हुरडा खायला जायचो. त्यामुळं हा चित्रपट करताना माझ्यासाठी तो नॅास्टेल्जिया होता. याचा फायदा कॅरेक्टर साकारताना झाला आणि बरेच सिन्स सहजपणे होत गेले. मी पुण्यात राहिलोय, पण हॅास्टेलचं लाईफ बार्शीत शिक्षणासाठी आलेल्या मुलांच्या माध्यमातून पाहिलं आहे. त्यांच्या खोलीवरचं वातावरण माझ्यासाठी फॅमिलीयर होत्या. त्यामुळं त्याच्याशी अगदी सहज एकरूप झालो. ध्येय असणं आणि त्यासाठी झटणं हे युनिव्हर्सल असल्यानं पांडुरंगचं कॅरेक्टर माझ्यासाठी रिलेटेबल झालं. ‘फिरस्त्या’ हा मी साकारलेल्या पांडुरंगचा जर्नी आहे. हा प्रवास जरी सिनेमॅटीक असला तरी तो खरा आहे. हा एफर्टचा जर्नी असल्यानं प्रत्येक ध्येयवेड्या व्यक्तीला ही स्टोरी आपलीशी वाटावी अशी आहे.

  एक कोपरा लव्हस्टोरीचा…
  लव्हस्टोरीबाबत इतकंच सांगेन की प्रत्येकजण कधी ना कधी प्रेमात पडतो. तसाच एक नाजूक क्षण पांडुरंगच्या जीवनातही येतो, पण ही लव्हस्टोरी अजिबात कथानकात घुसडलेली नाही. ही लव्हस्टोरी कथानकात प्रवाहासोबत आल्यानं कृत्रिमरीत्या काहीतरी केल्यासारखं वाटत नाही. कथा सुरू असताना अचानक रंगीबेरंगी कपडे घालून डान्स आणि गाणं सुरू होत असल्याचं चित्रपटात कुठेही जाणवणार नाही. कथेच्या प्रवाहाबरोबर लव्हस्टोरीसोबत त्यातील इमोशन्सही येतात. हा एक वेगळा स्ट्रगल आहे. मयूरी कापडणे या चित्रपटात माझ्यासोबत आहे. ही रॅा आणि आॅरगॅनिक लव्हस्टोरी आहे. हा हिरो-हिरोईनचा सिनेमा नसून, यातील कथाच नायक आहे.

  याचा कधी विचारही केला नव्हता
  ‘फिरस्त्या’ला ५३ पुरस्कार मिळतील असा विचारही चित्रपट करताना कधी मनात आला नव्हता. आपण निवडलेल्या या सिनेमाची गोष्ट खूप छान असून, ती लोकांना नक्कीच भावणार याची खात्री आहे. लीड म्हणून माझा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळं ही भूमिका साकारताना ती कुठेही खोटी वाटता कामा नये हा प्रामाणिक प्रयत्न होता. गोष्टीतला रॅानेस हाच ‘फिरस्त्या’चा युएसपी असल्याचं मला वाटतं. जितकी सिंपल पद्धतीनं ही स्टोरी लिहीली आहे तितक्याच साध्या पद्धतीनं त्यातील कॅरेक्टर साकारणं गरजेचं होतं. नाहीतर त्यातील गंमत निघून गेली असती. कुठेही आपलं कॅरेक्टर ओव्हर दर टॅाप काहीतरी करतंय, हिरोसारखं करतंय असं वाटणार नाही याची काळजी घेतली. या कॅरेक्टरच्या चालण्यावर आणि बॅाडी लँग्वेजवरही मी खूप काम केलं.

  हिच या सिनेमाची ब्युटी
  एक सुंदर, रॅा आणि आॅरगनिक गोष्ट ‘फिरस्त्या’मध्ये आहे. यात आम्ही बरेचसे नवीन लोकं आहोत. कोणी मोठा स्टार नाही. प्रत्येकजण इथं अॅक्टर आहे. सिनेमातल्या व्यक्तिरेखा जो संघर्ष करत आहेत तसाच संघर्ष करत या पायरीवर आम्ही सर्वजण पोहोचलो आहोत. सिनेमॅटोग्राफर गिरीश जांभळीकर यांनी कुठेही प्रखर लाईट वापरलेली नाही. चकचकीतपणा कुठेही नाही. खूप साध्या आणि नॅचरल पद्धतीच्या लाईटिंगमध्ये सर्व चित्रीकरण केलं आहे जे बघायला खूप सुंदर वाटतं. त्यामुळं सिनेमातील वातावरणही कथेशी एकरूप होतं. हिच या सिनेमाची ब्युटी आहे. जगभर फिरस्ती करत ५३ पुरस्कार पटकावत या चित्रपटानं मराठी सिनेसृष्टीच्या मुकूटात मानाचा तुरा खोवणारा ‘फिरस्त्या’ प्रत्येकानं नक्की पहायला हवा असं मला वाटतं.