‘किरण आणि अजितकुमार या भिन्न टोकाच्या व्यक्ती’, अभिनेता किरणने सांगितला ‘देवमाणूस’पर्यंतचा प्रवास!

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'देवमाणूस' या मालिकेत डॅाक्टर अजितकुमार देवची भूमिका साकारणाऱ्या किरण गायकवाड या अभिनेत्याच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. 'नवराष्ट्र'शी खास बातचित करताना किरणरनं आपल्या जीवनातील रहस्य उघड केलं.

  करायला गेलो एक’ हे कोणत्याही नाटक किंवा सिनेमाचं टायटल नसून, असंख्य व्यक्तींच्या आयुष्यातील वास्तव आहे. बरेच जण काहीतरी वेगळंच करण्यासाठी एखाद्या क्षेत्रात दाखल होतात, पण भलतंच करणं त्यांच्या नशिबी येतं. सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. काही जण इथं अभिनयासाठी येतात, पण दिग्दर्शनात रमतात, तर दिग्दर्शनासाठी आलेले काही अभिनयात बाजी मारतात. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘देवमाणूस’ या मालिकेत डॅाक्टर अजितकुमार देवची भूमिका साकारणाऱ्या किरण गायकवाड या अभिनेत्याच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. ‘नवराष्ट्र’शी खास बातचित करताना किरणरनं आपल्या जीवनातील रहस्य उघड केलं.

  पहिल्या भागापासून घराघरात चर्चेचा विषय ठरलेली झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत किरण साकारत असलेला डॅाक्टरच्या रूपातील खलनायक चांगलाच चर्चेत आहे. खलनायक बनण्यापूर्वी अभिनयाकडं वळण्याबाबतच्या प्रवासाबाबत किरण म्हणाला की, मी एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीत दाखल झालो. एकांकीका, नाटकं, शॅार्टफिल्म लिहील्या आणि दिग्दर्शितही केल्या. सिनेमांमध्ये लहान-सहान कामं केली. कोणीतरी बोललं की, ‘किरण तुला अभिनय नीट जमत नाही.’ पण मी हार मानली नाही. कारण मला याच फिल्डमध्ये काहीतरी करायचं होतं. त्यामुळं मी लेखन-दिग्दर्शन करू लागलो. ‘बिघाड’ नावाची शॅार्टफिल्म लिहून दिग्दर्शित केली. शॅार्टफिल्मचं कौतुकही झालं आणि पुरस्कारही मिळाले. दोन-तीन वर्षं दिग्दर्शन करताना कॅमेऱ्यामागं राहून मला अभिनय करण्याचं तंत्र समजून घेता आलं. मलाही एखादा चांगला दिग्दर्शक मिळाला तर माझ्यातीलही अभिनेता उत्तमरीत्या बाहेर येऊ शकेल असं वाटलं. अभिनेता अक्षय टांकसाळे माझा मित्र आहे. त्याच्याकडून ‘फुंतरू’च्या कास्टिंगविषयी समजलं. मराठीत प्रथमच साय-फाय फिल्म बनत होती. सुजय डहाकेच्या कामाच्या मी प्रेमात होतोच. त्यामुळं ‘फुंतरू’मध्ये मॅाब सीनमध्ये काम केलं. तिथे मला एक सीनही करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘वाय झेड’, ‘बस स्टॅाप’, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांमध्ये काम केलं.

  किरणचं पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण पुण्यात आणि नंतर सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीजवळ असलेल्या पिंपळनेरमध्ये दहावीपर्यंतच शिक्षण झालं आहे. अकरावीनंतरचं शिक्षण पुण्यातच झालं आहे. वर्कशॅाप्सच्या माध्यमातून किरण अभिनय शिकला आहे. एकलव्याप्रमाणं जिथून ज्ञान मिळेल तिथून शिकत त्यानं स्वत:ला अपडेट ठेवण्याचं काम केलं आहे. मालिकेत खलनायकी भूमिका साकारण्याची संधी मिळण्याबाबत किरण म्हणाला की, मला एका सिनेमात खलनायक साकारण्यासाठी बोलावलं होतं, पण काही कारणास्तव त्या दिवशी शूट झालं नाही आणि आठवड्यानंतर ठरवलं गेलं. तेवढ्यात ‘लागीरं झालं जी’ या मालिकेची आॅफर आली. त्यावेळी मालिका की सिनेमा असा प्रश्न माझ्यासमोर होता. मी ‘लागीरं झालं जी’ निवडली. माझा निर्णय अचूक ठरला. आता ‘देवमाणूस’ बनून सर्वांच्या घरात पोहोचलो आहे.

  असा भेटला अजितकुमार

  डॅाक्टर अजितकुमार देव या व्यक्तिरेखेकडे मी डबल रोल म्हणून पहातो. गावकऱ्यांसमोर तो वेगळा आणि स्वतंत्रपणे खूप निराळा आहे. देवमाणूसचं शूट सुरू होण्यापूर्वी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यावेळी मी एका स्वतंत्र रूममध्ये आयसोलेट झालो होतो. या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये मी अजितकुमार देवचा शोध घेतला. दिग्दर्शक राजू सावंत आणि लेखक विशाल कदम यांच्यासोबत चर्चा करताना अजितकुमारचे विविध पैलू उलगडत गेले. बऱ्याचदा एखादं कॅरेक्टर करताना आजूबाजूच्या माणसांचे गुण घेण्याचा प्रयत्न करतो, पण निगेटीव्ह शेड करताना अशी माणसंच सापडत नाहीत. त्यामुळं एक स्वतंत्र व्हिज्युअल तयार करावं लागलं.

  डॅाक्टर रात्री झोपू देत नव्हता

  ‘लागीरं झालं जी’मधाील भैयासाहेब आणि ‘देवमाणूस’मधील अजितकुमार हे दोघेही जरी खलनायक असले तरी दोघांमध्ये प्रचंड तफावत आहे. भैयासाहेब हा प्रेमळही होता. लोक त्याच्या प्रेमातही पडायचे. प्रेमाच्या बाबतीत तो खराही तितकाच होता, पण इथे हव्यास आहे. मला हवंय म्हणजे हवंय. मग ते कुठल्याही थराला जाऊन मिळवण्याची याची वृत्ती आहे. ‘देवमाणूस’चं शूट सुरू झाल्यावर सुरुवातीला एक-दीड महिना मला झोप लागत नव्हती. अजितकुमार देव माझ्यासोबतच आहे की काय असंच वाटायचं. माझी वृत्तीच तशी होतेय असं वाटायचं, पण मेडीटेशन करावं तसं मला अजितकुमारपासून अलिप्त राहता आलं. माझे एपिसोड पाहताना मलाच माझा राग यायचा. किरण गायकवाड एखाद्याला कानाखालीही मारू शकत नाही आणि हा चक्क माणसं मारतो. धडाधड खोटं बोलतो. मी खोटं बोलत नाही. स्पष्ट बोलतो. किरण आणि अजितकुमार या भिन्न टोकाच्या व्यक्ती आहेत.

  आजीनं खूप शिव्या घातल्या…

  या कॅरेक्टरला प्रेक्षकांनी पहिल्या भागापासून खूप शिव्या द्यायला सुरुवात केली. हेच या कॅरेक्टरचं यश आहे. वाईतील खडे गावात शूट सुरू होतं. सुरुवातीला एका आजीला वाटलं गावात डॅाक्टर आले तर तपासून घेऊ. त्या आल्या आणि दुखणी सांगू लागल्या. मी खोटा डॅाक्टर असून, अभिनेता असल्याचं त्यांना सांगितलं. पुढच्या आठवडयात त्याच आजी पुन्हा आल्या. तोपर्यंत ‘देवमाणूस’ आॅनएअर गेली होती आणि अजितकुमारनं दोन माणसांना मारलं होतं. त्यामुळं संतापलेल्या त्या आजींनी अक्षरश: मला शिव्या दिल्या. हा खोटा डॅाक्टर आहे. माणसं मारतोय. आयाबहिणींकडं वाईट नजरेनं बघणाऱ्या या डॅाक्टरला गावातून हाकलून द्या असं म्हणाल्या. त्यांच्या मुलानं समजून सांगितल्यावर त्या शांत झाल्या. लेखक-दिग्दर्शकांनी ही गोष्ट हेरली आणि मला म्हणाले ‘किरण सही जा रहे हो भाई… कॅरेक्टर हिट है…’