“लव सुलभ”  चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच,या अनोख्या चित्रपटाची रंगतेय सोशल मीडियावर चर्चा!

देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी "लव सुलभ" चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर,  विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे.

    लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. “लव सुलभ” नावाच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.  ठाणे येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे विद्यमान महापौर मा.श्री. नरेशजी म्हसके आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब ह्यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.

    देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी “लव सुलभ” चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर,  विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून छायांकन  केदार गायकवाड करणार आहेत तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.

    “लव सुलभ” हे चित्रपटाचं नाव अतिशय आकर्षक आहे. चित्रपटाच्या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता येतो. टीजर पोस्टरवर मेहंदी असलेल्या हातावरील बोटांत अंगठी आहे आणि त्या हातानं भिंतीवर स्त्री-पुरुषाची आकृती काढलेली दिसते पण चित्रपटाच्या कथेचा आशय अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. चित्रपटाचं नाव, स्टारकास्ट आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण झालं आहे.