शब्दांचे जादूगार गुलजार

प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या बंदिनी सिनेमासाठी गीत लिहिण्याची पहिली संधी गुलजार यांना मिळाली. गुलजार यांचे शब्द आणि एस.डी.बर्मन यांचं संगीत.. मोरा गोरा अंग लइ ले, मोहे श्याम रंग दई दे हे गुलाजार यांनी लिहिलेलं पहिलं गाणं. बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जी यांच्यासह गुलजार यांची कारकीर्द बहरली.

शब्दांचे जादूगार म्हणजे गुलजार … साहित्य विश्वाला पडलेलं सुरेख स्वप्न म्हणजे गुलजार.. गीतकार, दिग्दर्शक, कवी, लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडणाऱ्या या अवलियाबद्दल लिहिताना शब्दही अपुरे पडतात. गुलजार यांचा आज ८६ वा वाढदिवस त्यानिमित्ताने हा शब्दप्रपंच.

गुलजार यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा. पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर कालरा कुटुंब भारतात स्थायिक झालं. मुंबईत आल्यानंतर गुलजार यांनी उदरनिर्वाहासाठी छोटंमोठं काम करायला सुरुवात केली. पण, त्यांच्यातला लेखक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या बंदिनी सिनेमासाठी गीत लिहिण्याची पहिली संधी गुलजार यांना मिळाली. गुलजार यांचे शब्द आणि एस.डी.बर्मन यांचं संगीत.. ‘मोरा गोरा अंग लइ ले, मोहे श्याम रंग दई दे…’ हे गुलजार यांनी लिहिलेलं पहिलं गाणं. बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जी यांच्यासह गुलजार यांची कारकीर्द बहरली. त्यानंतर गुलजार यांनी पंचमदा, सलील चौधरी, विशाल भारद्वाज, ए.आर. रेहमान,  अशा अनेक संगीतकारांसह काम केलं. ‘आंधी’, ‘कोशिश’, ‘मोसम,“परिचय’ अशा अनेक चित्रपटांसाठी गुलजार यांनी गाणी लिहिली. आशा भोसले यांचा जादुई स्वर, पंचमदा यांचं संगीत आणि गुलजार यांच्या लेखणीतून अवतरलेलं ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..’ हे गाणं काळजाला हात घालतं. तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘इस मोड से जाते है’, गाणं असो.. आजही या ओळी आपल्या ओठांवर तरळतात. 

लेखन, गीतकार यासोबतच त्यांची दिग्दर्शक म्हणून एक ओळख निर्माण झाली ती आंधी आणि किरदार या सिनेमांच दिग्दर्शन केल्यानंतर. थेट हृदयाला हात घालणारी गाणी लिहिणाऱ्या गुलजार यांचे शब्द काळाशी सुसंगत राहिले. मग ते ओमकारामधलं ‘बिडी जलैले..’ असो किंवा बंटी और बबलीमधलं ‘कजरारे’ असो.. आजच्या जनरेशनला कनेक्ट होतील असे शब्द गाण्यात गुंफणं ही गुलजार साहेबांची ताकद. स्मॉल स्क्रीनवरच्या ‘मिर्झा गालिब’ या मालिकेचे दिग्दर्शनही त्यांनी केलं. तर ‘जंगल बुक’, ‘मोटू पतलू’ या कार्टून्सची टायटल साँग्जही त्यांनी लिहिली आहेत. 

 गुलजार यांना २००४ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बल २० फिल्मफेअर त्यांनी पटकावलेत. पाच नॅशनल अवॉर्डसह एक ऑस्कर आणि एक ग्रॅमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.  या शब्दांच्या दुनियेतील अवलियाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.