‘मैं शेरनी…’ विद्या बालनच्या चित्रपटातील हे दमदार गाणं प्रदर्शित!

महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसल्याचं सिद्ध करणाऱ्या महिलांना आम्ही 'मैं शेरनी...'च्या माध्यमातून वंदन करतो.

    विद्या बालनचा ‘शेरनी’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अमेझॉन प्राइम व्हिडीओनं ‘मैं शेरनी…’ हे दमदार गाणं प्रदर्शित केलं आहे. यात विद्यासोबत काही अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. तगून राहण्याच्या जिद्दीची यशोगाथा मांडणारं हे खास गाणं अकासा आणि रफ्तार यांनी गायलं आहे. पारंपरिक समजूतींना मोडीत काढत सर्व आव्हानांविरोधात ठामपणे उभं राहत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या या शेरनींच्या साहसाला या गाण्यातून सलाम करण्यात आला आहे.

    या म्युझिक व्हिडीओमध्ये एफफोर रेसर आणि ड्रायव्हर कोच मीरा एर्डा, बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्ल्युएन्सर आणि योगा ट्रेनर नताशा नोएल, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि हुला-हूप डान्सर एश्ना कुट्टी, कर्नाटकातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर त्रिनेत्रा हलदार, बी.वाय.एल. नायर हॉस्पिटलमधील आघाडीची लढवय्यी जयश्री माने, आघाडीच्या लढवय्यांना जेवण पुरवणारी विद्यार्थिनी रिद्धी आर्या, सुरक्षा रक्षक अनिता देवी, शिक्षिका सीमा दुग्गल, घरकाम करणारी अर्चना जाधव यांच्यासोबत विद्याही आहे.

    राघव यांनी लिहिलेल्या ‘मैं शेरनी…’ या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याबाबत विद्या म्हणाली की, कधीही हार न मानण्याची जिद्द बाळगणाऱ्या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे ‘मैं शेरनी…’ हा म्युझिक व्हिडीओ. महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसल्याचं सिद्ध करणाऱ्या महिलांना आम्ही ‘मैं शेरनी…’च्या माध्यमातून वंदन करतो.