‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचे चित्रीकरण होणार नाशिकमध्ये

झी मराठीवरची लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे चित्रीकरण आता नाशिकमध्ये होणार आहे. यापूर्वी हे शूटिंग ठाण्याला होत होतं. पण, ठाण्यातल्या ज्या इमारतीमध्ये या मालिकेचं चित्रीकरण व्हायचं तिथे आता परवानगी मिळत नाहीय. त्यामुळे हे शूटिंग मुंबईबाहेर म्हणजेच नाशिकजवळच्या इगतपुरीला हलवण्यात आलं आहे. या भागात एक संपूर्ण रिसॉर्ट भाड्यानं घेण्यात आलं असून, कलाकारांसह मालिकेची संपूर्ण टीम सध्या तिथेच राहून चित्रीकरण करणार आहे.

सोमवारपासून मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, एपिसोड्सचे एडिटिंग देखील तेथेच होणार आहे. त्याबरोबरच मुंबई, ठाण्यात ‘भाभीजी घर पर है’, ‘मोलकरीण बाई’ यासारख्या अनेक हिंदी-मराठी मालिकांच्या चित्रीकरणालादेखील सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊननंतर चित्रीकरणाला सुरुवात होत असताना, कमीत कमी युनिटमध्ये काम करणं बंधनकारक आहे. त्यामुळे सेटवर सध्या रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) आणि केशरचनाकार यांची (हेअर आर्टिस्ट) टीम नसेल. कलाकारांच्या मदतीसाठी एखाद-दुसरा मेकअप किंवा हेअर आर्टिस्ट असतील. त्यामुळे कलाकार हातात मेकअपचा ब्रशन घेऊन स्वत:च स्वत:चा मेकअप करणार आहेत.

याविषयी बोलताना अभिनेता अभिजित खांडकेकर (गुरुनाथ, माझ्या नवऱ्याची बायको) याने सांगितले की, “तूर्तास पाच-सहा मुख्य कलाकारांसह आमच्या मालिकेच शूटिंग सुरू होणार आहे. त्यातल्या आम्हा सगळ्यांनाच मेकअप करता येतो. शिवाय, गरज भासल्यास आम्ही कलाकार एकमेकांच्या कमीत-कमी संपर्कात येऊन मदत करण्याचंही ठरवलं आहे. त्यामुळे शक्यतो आम्ही आमचा मेकअप स्वतः करू. गरज असल्यास फक्त आणि फक्त मेकअप किंवा केशभूषेसाठी अगदी कमीत कमी मदत घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. मी सेटवर कधी माझा मेकअप केला नव्हता. पण, मालिकेच्या शूटिंगसाठी सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा माझा मेकअप करायला मी शिकलो होतो. त्या गोष्टीचा फायदा मला आता होईल याचा आनंद आहे. आता लॉकडाउनच्या दिवसांतही घरून केलेल्या शूटिंगच्या वेळी मेकअप करताना मला त्याची मदत झाली.”

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा लेखक अभिजीत गुरू म्हणतो की, “मालिकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत प्रत्यक्ष किंवा वेगळा असा काही ट्रॅक दाखवला जाणार नाही. किंवा त्याबाबत अजून काही सूचना मिळालेल्या नाहीत. पण, अर्थातच अगदी साध्या साध्या गोष्टी नक्कीच दाखवल्या जातील. कारण मालिका या वास्तवदर्शी असतात. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर करणं, चेहऱ्यावर मास्कचा वापर दाखवणं, सुरक्षित वावर इत्यादी गोष्टी मी लिहित असलेल्या मालिकांमध्ये तरी दाखवल्या जातील.”