राजू दाखवणार जामिनीखाली गेलेल्या ‘माळीण’चा थरार!

ध्येयवेडा दिग्दर्शक राजू राणे यानं पदार्पणातच जणू शिव धनुष्य उचलत या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटासाठी रिसर्च करत असताना अनुभवलेला थरार राजूनं 'नवराष्ट्र'सोबत शेअर केला.

  सत्य घटनांवर आधारित असलेले वास्तववादी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांवर जादू करत आले आहेत. याच कारणामुळं समाजात घडणाऱ्या घटना किंवा नैसर्गिग दुर्घटनांचे पडसाद मोठ्या पडद्यावर उमटत असतात. माळीण गावात घडलेली दुर्घटना कोणीही विसरू शकणार नाही. ३० जुलै २०१४ ची सकाळ एक अख्खं गाव गिळंकृत करणारी ठरली होती. धो धो पावसामुळं डोंगर कोसळल्यानं माळीण गाव गाडलं गेलं होतं. याच गावाची कथा ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाद्वारे जगासमोर येणार आहे. ध्येयवेडा दिग्दर्शक राजू राणे यानं पदार्पणातच जणू शिव धनुष्य उचलत या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटासाठी रिसर्च करत असताना अनुभवलेला थरार राजूनं ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला.

  दिग्दर्शन क्षेत्रात काहीतरी करू पाहणारे तरुण दिग्दर्शक आपल्या पदार्पणातील सिनेमासाठी प्रचंड रिसर्च करत असल्याचं निदर्शनास येत आहे. मूळचा बदलापूरचाच असलेल्या राजू राणे या तरुण दिग्दर्शकानंही केवळ दिग्दर्शक बनण्याच्या आवडीपोटी फार मोठा संघर्ष केला आहे. आपल्या बालपणापासूनच्या प्रवासाबबत राजू म्हणाला की, बालपणापासून एकांकिका, नाट्यस्पर्धा असा माझा प्रवास सुरू झाला. भविष्यात लेखन-दिग्दर्शनच करण्याचं ध्येय होतं. त्यासाठी मुंबई विद्यापीठातून डिप्लोमा केला. दिग्दर्शनासाठी लागणाऱ्या बाजूंचा बेसिक अभ्यास केला. शास्त्रीय संगीतही शिकलो. कीबोर्ड, ढोलक, अॅक्टॅापॅड वाजवतो. स्वत:चा आॅर्केस्ट्राही होता. माझ्याकडे कमर्शिअल आर्टचा डिप्लोमा आहे. २० वर्षांपासून मी चित्र काढतोय. पाच-सहा वर्षे मी व्यावसायिक चित्रकलाही केली. डिजिटलमुळं माध्यम बदलावं लागलं, पण फिल्म करणं हेच ध्येय होतं. मध्यंतरी नोकरीही केली. कलर फॅार्म्युलेशनमध्ये हातखंडा असल्यानं मुंबईतील पंचतारांकीत हॅाटेलसाठी कलर शेड्स तयार करण्याचं काम करायचो. हे सर्व करताना एक दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. सिनेमा करण्यापूर्वी व्हीएफएक्स आणि एडीटींगही शिकलो. माळीणच्या घटनेवरील चित्रपटासाठी व्हीएफएक्स शिकणं गरजेचं होतं. तांत्रिकदृष्ट्या स्ट्राँग झाल्यानंतर सिनेमाकडे वळलो.

  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव एका दुर्घटनेमुळं जगाच्या नकाशावरून पुसून टाकलं होतं. त्या दुर्घटनेवर चित्रपट बनवण्याबाबत राजू म्हणाला की, २०१४मध्ये घडलेली माळीणची घटना टीव्हीवर पाहताना यावर सिनेमा बनवण्याचा विचार मनात आला. हा चित्रपट मराठीतच बनवायचा होता. त्यासाठी एक वर्ष रिसर्च केला. घटनेच्या मूळापर्यंत गेलो. इंडस्ट्रीशी काहीही संबंध नसलेल्या सात जणांची टीम घेऊन माळीणमध्ये गेलो. महिनाभर गावी राहिलो. कोणाची ओळख नव्हती, पण योगायोगानं एक व्यक्ती भेटली. ते शिक्षक आहेत. ते मला माळीणमध्ये घेऊन गेले. माळीणचं चित्र मला वास्तववादी दाखवायचं होतं. त्याला कुठेही काल्पनिकतेची झालर लावायची नव्हती. प्रत्येक सीन तिथे घडलेला वाटायला हवा हा अट्टाहास होता. गावातील प्रत्येक व्यक्तीशी बोललो. ते शूट करून घेऊन आल्यावर त्यावर पटकथा लिहीली. कोट्यावधींचं बजेट असल्यानं मध्यंतरी थोडा घाबरलो होतो. कारण मी कधी कुणाला असिस्टही केलेलं नाही. केवळ थोडं बेसिक शिक्षण, आवड आणि स्टडी इतकीच शिदोरी घेऊन मी सिनेमा बनवायला निघालो होतो. दत्ता गायकर यांना सोबत घेऊन दिग्दर्शन केलं आहे. यासाठी असंख्य गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं.

  … आणि अख्खं गाव गाडलं गेलं

  ६७ घरं आणि जवळपास ४०० लोकांची वस्ती माळीणमध्ये होती. डोंगरच कर्दनकाळ बनला आणि ४५ ते ४७ घरं गाडली गेली. या दुर्घटनेत १५१ लोकांचा बळी गेला. चारी बाजूंनी डोंगर आणि मध्ये वसलेलं गाव अशी माळीणची नैसर्गिक रचना आहे. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी नसून, डोंगराच्या कुशीत आहे. वरून पाण्याचा लोंढा आला आणि संपूर्ण गाव जमिनदोस्त झालं. ही घटना सकाळी सव्वा आठ वाजताची. न्यूज फ्लॅश झाली तेव्हा ती वेगवेगळ्या पद्धतीनं समोर आल्या, पण तिथं गेल्यानं मला प्रत्यक्षदर्शींनी ही वेळ सांगितली. मूळात या गावात एसटी जात नाही. माळीण फाट्यापासून अर्धा किलोमीटरवर गाव आहे. बस ड्रायव्हरला गावकऱ्यांनी कळवलं असेल आणि मग त्यांनी पुढे माहिती देण्यात आली असेल. सिनेमात त्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या गावात एक आजोबा आहेत. त्यांचं पूर्ण कुटुंब गेलं. कुटुंब जाताना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं, पण काही करू शकले नाहीत.

  माळीणचा भव्य सेट उभारला

  २०१७ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली. त्यापूर्वी लिखाण झालं होतं. आॅक्टोबर २०१७ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. डोंगर कोसळणं, चिखल करणं आणि तो थरार पडद्यावर दाखवण्यासाठी अर्धा सिनेमा रेस्क्यू आॅपरेशनवर आधारीत आहे. त्यामुळं मला उन्हाळ्यात पाऊस पाडून शूट करायचं नव्हतं. ते लॅाजिकली ठीक दिसलंही नसतं आणि वास्तववादी वाटलं नसतं. फक्त दोन दिवस माळीणमध्ये शूट केलं. इतर चित्रपट तिथे शूट करता येणार नव्हता. त्यासाठी बदलापूरमध्ये चार-पाच एकरमध्ये भव्य सेट उभारून जूननंतर भर पावसात चित्रपट शूट केला. मला गावातील फोटोग्राफ सापडले. त्यावरून सेट उभारला. कोणतंही गाव मला माळीण म्हणून दाखवायचं नव्हतं. त्यामुळं आता जेव्हा या गावातील लोकं हा सिनेमा पाहतील तेव्हा दुर्घटना घडण्यापूर्वी हे लोक कधी येऊन शूट करून गेले असा प्रश्न त्यांच्या मनात येईल. प्रत्येक गोष्टीचं अचूक मोजमाप काढून चार ते पाच एकर जागेत सेट उभारला होता. शाळा, मंदिर, गल्ल्या अगदी हुबेहूब तयार करण्यात आली होती. जूनमध्ये सेट उभारायला सुरुवात केली, तेव्हा पाऊस सुरू झाला तो ८ आॅगस्टला शूट संपल्यावर बंद झाला. चार वेळा सेट पाण्यात गेला होता. सात वेळा रंगकाम केलं. हॅालिवूडमधल्या एखाद्या मुव्ही प्रमाणे यातील डिझास्टरचा सीन डिझाइन केला आहे.

  नावाजलेले कलाकार नाहीत

  मोठे आणि नावाजलेले कलाकार घेण्याच्या मी विरोधात होतो. कारण मोठ्या कलाकारांची प्रत्येकाच्या मनात एक छबी निर्माण झालेली आहे. ज्यावेळी एखाद्या दुर्घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात एखादा पॅाप्युलर कलाकार घेतला जातो, तेव्हा तो त्या दुर्घटनेशी एकरूप होईल की नाही याची भीती असते. या चित्रपटात हिरोही डोंगर आणि व्हीलनही. या चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीत-संगीत युवराज गोंगळे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी, हरीदास शिंदे यांनी गाणी गायली आहेत. हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात रिलीज होणार होता, पण लॅाकडाऊन आणि पुन्हा लॅाकडाऊनमुळं थांबावं लागलं आहे