‘चार चम्मच शक्कर की चाय, दिमाग की बत्ती जलाए’, असा तयार झाला डायलॉग, मंगेश देसाई सांगितला खास किस्सा!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर प्रसारीत होणाऱ्या या शोच्या निमित्तानं मंगेशला प्रथमच पोलीसी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. याबाबत 'नवराष्ट्र'शी बातचीत करताना मंगेशनं 'क्राइम पट्रोल' आणि आपल्या व्यक्तिरेखेबाबत सविस्तरपणं सांगितलं.

  समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करत त्याचं वास्तववादी चित्रण घराघरात पोहोचवणारा ‘क्राइम पट्रोल’ हा शो २००३ पासून म्हणजेच मागील १८ वर्षांपासून जनतेला जागरुक करण्याचं काम करत आहे. मराठमोळा अभिनेता मंगेश देसाई २०१८पासून या शोचा भाग बनला आहे. गुन्हेगार आणि गुन्ह्यांशी निगडीत असलेल्या या शोमध्ये मंगेश साकारत असलेला पोलीस आॅफिसर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर प्रसारीत होणाऱ्या या शोच्या निमित्तानं मंगेशला प्रथमच पोलीसी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. याबाबत ‘नवराष्ट्र’शी बातचीत करताना मंगेशनं ‘क्राइम पट्रोल’ आणि आपल्या व्यक्तिरेखेबाबत सविस्तरपणं सांगितलं.

  कारकिर्दीच्या सुरुवातीला विनोदी भूमिका साकारत नावारूपाला आलेला मंगेश देसाई मागील काही वर्षांपासून गंभीर भूमिकांद्वारे रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. कोणतीही व्यक्तिरेखा आपण पूर्ण ताकदीनिशी साकारू शकतो याची पावती त्यानं ‘एक अलबेला’ या चित्रपटात भगवानदादांची भूमिका साकारून दिली आहे. सध्या ‘क्राइम पट्रोल’मध्ये तो साकारत असलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे. याबाबत मंगेश म्हणाला की, राकेश सारंग यांच्या कॅम्प्स क्लब प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या या शोच्या निमित्तानं प्रथमच पोलीस साकारत आहे. यात काम करण्यासाठी यापूर्वीही त्यांचे फोन आले होते, पण मी गेलो नव्हतो. पोलिसाच्या आॅडीशनसाठी जेव्हा मला बोलावलं, तेव्हा गेलो. इथं सारं काही नॅचरल हवं असतं. अॅक्टींग करायची नसते. त्यामुळं तशा प्रकारे आॅडीशन दिली. या कॅरेक्टरला लोकांचं खूप प्रेम मिळत आहे. ‘तुमच्यासारखा नॅचरल पीआय पाहिला नाही’, असं लोकं म्हणतात. या कॅरेक्टरला खूप चहा पिण्याची सवय आहे, पण हा नॅार्मल चहा पीत नाही. चार चमचे साखर घातलेला चहा पितो. यासाठी मी एक डायलॅाग तयार केला, ‘चार चम्मच शक्कर की चाय, दिमाग की बत्ती जलाए’. हा डायलॅाग आॅडीयन्समध्ये खूप फेमस झालाय. त्यामुळं आता मला रिस्पॅान्सही तसेच येतात. ‘तुम्ही खरंच इतका गोड चहा पिता का?’ असा प्रश्न लोकं विचारतात. ‘एवढा गोड चहा पिऊ नका, तुम्हाला त्रास होईल’ असं काही चाहते सांगतात.

  मंगेशनं साकारलेल्या विनोदी भूमिकांप्रमाणेच ‘खेळ मांडला’सारख्या चित्रपटात त्यानं वठवलेल्या गंभीर व्यक्तिरेखेचंही सर्वांनी कौतुक केलं आहे. यातील व्यक्तिरेखेबाबत मंगेश म्हणाला की, यात मी सुनील केळकर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा थोडासा कॅामिक आहे. सिनीयरशी बोलताना आदरानं बोलतो. एखाद्या संशयिताशी बोलतो तेव्हा ते कशा पद्धतीचे आहेत हे ओळखून बोलतो. एखादा मोठा गुन्हेगार असेल, तर त्याला हा त्याच पद्धतीनं ट्रीट करतो. संशयितांना थोड्याशा लाइटर मूडननं ट्रीटमेंट देतो. हा परिस्थिती पाहून रिअॅक्ट होणारा आहे. उगाच आरडाओरड करणं याच्या स्वभावात नाही. आपल्या स्टाफवर प्रेम करतो, कर्तव्यनिष्ठ आहे आणि येणाऱ्या केसकडं अतिशय गांभीर्यानं पहातो, पण हे कॅरेक्टर विनोदी अंगानं जाणारं असल्यानं लोकांना ते पहावंसं वाटतंय. माझ्या मारण्याच्या स्टाइलवरही लोकं खूप बोलतात.

  …म्हणून तो पोलीस आहे
  माझं म्हणणं आहे की, पोलीस डिपार्टमेंटमधील व्यक्ती त्या खुर्चीवर बसली आहे, काही जबाबदाऱ्या त्या व्यक्तीच्या खांद्यावर आहेत म्हणून ती पोलीस आहे. अदरवाईज तो माणूसच आहे. प्रत्येक माणसाला असतात तशा सर्व फिलींग्ज पोलिसालाही आहेत. त्याचं जीवनही एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा फार वेगळं नाही. नॅार्मल माणसांप्रमाणेच त्याच्याही मागं सुख-दु:खाचं रहाटगाडगं आहे. यात मी साकारलेल्या सुनील केळकरला पत्नीचा सारखा फोन येत असतो. कधी मुलाचाही फोन येतो. बायकोही त्याला चहाबाबत सांगते की, इतकं गोड पिऊ नका. माझा असिस्टंट शिर्के आहे. त्याला ती सांगते की जरा साहेबांकडे लक्ष ठेव. जे नॅार्मल पोलीस स्टेशनमध्ये घडू शकतं ते सर्व माझ्या पोलीस स्टेशनमध्ये घडतं. लोकं ते सगळं रिलेट करत असल्यानं मला खूप आनंद होतो.

  केळकरच्या अदांवर प्रेक्षक फिदा…
  नुकताच एक एपिसोड झाला. त्यामध्ये बायकोनं मला पाठवलेलं जेवण प्रचंड तिखट असतं. एक घास खातो आणि एवढा कसला राग काढलाय बायकोनं असं तो म्हणतो. तो धागा पकडून संपूर्ण सीन स्पायसी जेवणाचा रेफ्रन्स ठेवून केला आहे. तोही लोकांना खूप आवडला. ‘क्या मजा आ रहा था सर’ अशा रिअॅक्शन्स लोकांनी दिल्या. यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यांच्यातील होऊन काही गोष्टी केल्या, तर ते स्वत:ला रिलेट करतात. आतापर्यंत मी या शोचे जवळपास २५० एपिसोडस केले आहेत. मागच्या लॅाकडाऊनमध्ये खूप लोकांनी क्राइम पेट्राल खूप लोकांनी पाहिलं. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, लोकं आपल्याशी रिलेट करू पाहताहेत. आताचं युग सोशल मीडियाचं आहे. तुम्ही इस्टाग्रामवर किंवा इतर सोशल मीडियावर किती दिसता त्यावर बरीच गणितं अवलंबून असतात. त्यामुळं घरूनही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहण्याचा आग्रह होता. त्यातून छोटे-छोटे व्हिडीओ बनवून पोस्ट करतोय. तेही लोकांना खूप आवडत आहेत.

  हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं
  या शोमध्ये मी जास्तीत जास्त रेप आणि मर्डरच्या केसेस हाताळल्या आहेत. हे मेजर गुन्हे आहेत. त्यातून एक गोष्ट लक्षात आली की, टिनेजर्ससोबत घडणारे गुन्हे खूप वाईट आहेत. याबाबतचा अवेअरनेस अद्यापही आपल्यात आलेला आहे की नाही हे सांगता येत नाही. या गुन्हेगारांना असं का वाटतं? किंवा यांच्याबद्दल त्यांच्या मनात राग आहे असं काय घडलं आहे? ते समजत नाही. दोन प्रकारचे प्रेक्षक ‘क्राइम पट्रोल’ पाहतात. गुन्हा का होतो हे पाहून त्यापासून सावध राहण्यासाठी काही लोक हा शो पाहतात. काही लोकांचं म्हणणं आहे की, यामुळं गुन्हा कसा करावा हे देखील गुन्हेगाराला कळतं, पण माझं असं म्हणणं आहे की, नाण्याला दोन बाजू असतात. गोड लोकांना आवडतं आणि मधुमेहाला आमंत्रणही देतं. आपण पॅाझिटीव्ह गोष्ट पहायला हवी. या केसेस पाहून काय करू नये हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं. त्यामुळं हा शो जनमानसामध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस निर्माण करणारा असल्याचं माझं मत आहे.

  सिनीयर-ज्युनियरची केमिस्ट्री
  यात पीएसआय शिर्केच्या भूमिकेत नीरज सिंग आहे. आमची केमिस्ट्री खूप चांगली जमली आहे. आमच्यातील गिव्ह अँड टेक लोकांना आवडतंय. सिनीयर-ज्युनियर प्लस फ्रेंडशिंप हे गणित चांगलं जुळून आलंय. इतरही बरेच कलाकार येतात आणि जातात. ही सिरीयल सुरू होऊन आज १८ वर्षे झाली आहेत. सुरुवातीच्या काळात बालकलाकाराचं काम केलेली मुलं आज मोठ्या मुलांचं काम करताना दिसतात. याच शोनं घडवलेल्या कलाकारांना नॅचरल अॅक्टिंग करताना पाहून समाधान वाटतं. इथं सर्व नॅचरल हवं असल्यानं इतर शोच्या तुलनेत लाईट्स खूप कमी असतात. जास्त हाय-फाय कॅमेरा नसतो. इतर मालिकांप्रमाणे इथं चकचकीतपणा नाही. कारण त्याची गरज या मालिकेत नाही. कधी कधी आम्हाला अतिशय घाणेरड्या ठिकाणी जाऊन शूट करावं लागतं, पण आम्ही ते करतो.