‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’मध्ये मनीष पॉलने बाप्पांसाठी केला ‘झिंगाट’ डान्स!

लॉकडाऊननंतर पुन्हा प्रसारित होऊ लागलेल्या ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या रिॲलिटी कार्यक्रमातील टॉप १० बालस्पर्धकांनी गेले काही आठवडे आपल्या अप्रतिम आवाजात सादर केलेल्या सुरेल कामगिरीने प्रेक्षकांच्या मनाची पकड पुन्हा एकदा घेतली आहे.

मुंबई : लॉकडाऊननंतर पुन्हा प्रसारित होऊ लागलेल्या ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या रिॲलिटी कार्यक्रमातील टॉप १० बालस्पर्धकांनी गेले काही आठवडे आपल्या अप्रतिम आवाजात सादर केलेल्या सुरेल कामगिरीने प्रेक्षकांच्या मनाची पकड पुन्हा एकदा घेतली आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या आगामी भागाला मात्र उत्सवी स्वरूप लाभले आहे.

आजपासून भारतात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ हा कार्यक्रमही त्यात मागे राहणार नाही. येत्या वीकेण्डचा भाग हा ‘गणपती विशेष’ म्हणून प्रसारित केला जाणार आहे. अलका याज्ञिक, हिमेश रेशमिया आणि जावेद अली या तिन्ही परीक्षकांमधील सौहार्दाचे दर्शन तर यात घडेलच, पण सूत्रसंचालक मनीष पॉलनेही गणपती बाप्पांसाठी खास ‘झिंगाट’ नृत्य सादर करून या कार्यक्रमात खळबळ उडवून दिली आहे!

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चा सूत्रसंचालक मनीष पॉलने आपल्या अनेक विदुषकीचाळ्यांनी यापूर्वीही प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. त्याच्या या विक्षिप्त चाळ्यांनी कार्यक्रमात तर जिवंतपणा भरून राहिला आहेच, पण मनीष पॉल पडद्यामागेही विविध करामती करून सर्वांना हसते ठेवतो. कधी बालस्पर्धक गुरूकीरतशी पंजाबीतून बोलून तो आपली पंजाबी ओळख दाखवून देतो, तर परीक्षक आणि ज्यूरी सदस्यांबरोबर हलकेफुलके विनोद करून वातावरण नेहमी हसतेखेळते ठेवताना दिसतो.

या ‘गणपती विशेष’ भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी मनीषने ‘झिंगाट’ या विलक्षण लोकप्रिय गाण्यावर नृत्य करून त्यात कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले. कार्यक्रमात मंचावर बालस्पर्धकांबरोबर त्याने आपले नृत्य सुरू केले आणि थोड्याच वेळात तो मंचावरून खाली उतरला आणि तेथे उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांबरोबरही त्याने हे नृत्य केले. इतकेच नव्हे, तर तो नाचत नाचत मंचामागे असलेल्या नियंत्रण कक्षात आला, दिग्दर्शकांबरोबरही त्याने नाच केला आणि हे सर्व करताना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळायला मात्र तो विसरला नाही!

सेटच्या सर्व भागात त्याने नृत्य करता करता फेरी मारली आणि सर्वत्र उत्सवाचा उत्साह पसरला. याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात त्याने विविध सणांसाठी असलेली गाणी ढोलकीच्या तालावर गाऊन इतरांचे मनोरंजन केले. सध्याच्या चिंतेच्या काळात लोक उत्सवही तोलून-मापून साजरे करीत असताना मनीषने उत्सवातील निखळ आनंद आपल्या कृतीने सर्वांच्या मनात भरला.

या विशेष भागात बालस्पर्धक विविध सणांशी संबंधित गीते अफलातून आवाजात सादर करताना दिसतील. माधव अरोरा आणि झैद अली यांनी गायलेल्या ‘देवा हो देवा’ या गाण्याने सर्वांची मने जिंकली, तनिष्का आणि सौम्याने सादर केलेल्या ‘मोरया रे’ या ठेकेदार गाण्याने सर्वांना ताल धरायला लावला. एकंदरीतच या ‘गणपती विशेष’ भागात प्रेक्षकांना अनेक सुरेल गाणी ऐकायला आणि काही अनपेक्षित प्रसंग पाहायला मिळतील. एकंदरीतच आगामी ‘गणपती विशेष’ भागात प्रेक्षकांना अनेक संस्मरणीय प्रसंग आणि किस्से ऐकायला मिळतील.

हा ‘गणपती विशेष’ भाग पाहण्यासाठी पाहा ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ भाग शनिवार आणि रविवारी रात्री ८.०० वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!