‘बाई, बुब्स आणि ब्रा’ लिहणारी अभिनेत्री हेमांगी कवी म्हणते, टॉपलेस? सध्या तरी नाही!

काम नसेल म्हणून हेमांगी नसते उद्योग करत असेल अशा प्रकारची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. या मागील सत्य जाणून घेण्यासाठी हेमांगीशी संपर्क साधला असता 'नवराष्ट्र'शी बोलताना तिनं अशा प्रकारची बोल्ड पोस्ट करण्यामागील कारणं उघड केली.

  मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांसोबतच हिंदीतही अभिनय करणारी हेमांगी कवी-धुमाळ नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार व्यक्त करत असते. यावेळी मात्र हेमांगीनं थेट ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या मथळ्यांतर्गत भली मोठी पोस्ट लिहीली आहे. यावर समाजातील विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्रामुळं स्त्रियांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं सांगणाऱ्या हेमांगीनं स्वत: मात्र टॅापलेस होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

  हेमांगीनं आजवर ‘मनातल्या मनात’, ‘धुडगूस’, ‘पिपाणी’, ‘जय शंकर’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘भूतकाळ’, ‘बंदिशाळा’ ‘गडद जांभळ’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ आदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याखेरीज ‘ठष्ट’, ‘ती फुलराणी’ आदी नाटकं आणि ‘अवघाची संसार’, ‘तेरी लाडली मैं’, ‘वादळवाट’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. कॅमेऱ्यासमोर अभिनय करणाऱ्या हेमांगीनं नेहमीच आपले बोल्ड विचार सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. यापैकी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ हा विषय खूपच बोल्ड आणि आजवर कधीही न बोललेला असल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यात काहीतरी स्टंट असेल, एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल म्हणून हा पब्लिसिटी फंडा असेल, काही काम नसेल म्हणून हेमांगी नसते उद्योग करत असेल अशा प्रकारची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. या मागील सत्य जाणून घेण्यासाठी हेमांगीशी संपर्क साधला असता ‘नवराष्ट्र’शी बोलताना तिनं अशा प्रकारची बोल्ड पोस्ट करण्यामागील कारणं उघड केली.

  आजवर दबक्या आवाजात चर्चा होणाऱ्या विषयावर व्यक्त होत अचनक ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही  बोल्ड पोस्ट शेअर करण्याबाबत हेमांगी म्हणाली की, अशा गोष्टी नेहमीच अचानक होत असतात. जेव्हा होतात तेव्हा त्या अचानकच वाटू शकतात. या पोस्टच्या निमित्तानं समाज जागृती करणारं एखादं कॅम्पेन सुरू झालं तर उत्तमच होईल. यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. घरापासून सुरुवात केली तरी खूप आहे. या गोष्टीकडं कॅम्पेन म्हणून पहायला काहीच हरकत नाही. मी एक पोस्ट टाकून माझी सुरुवात केली आहे. आता इतरांनी पुढाकार घ्यायला हवा. आता या विषयाला खूप फाटेही फुटू शकतात. टॅापलेस होण्याबाबत सांगायचं तर सध्या तरी माझा टॅापलेस वगैरे येण्याचा काही विचार नाही. मी टॅापलेस झाल्यानंतर मला कोणी फॅालो करणार नाही. फॅालो करायचंच असेल तर माझ्या विचारांसाठी करतील. सध्या तरी मला टॅापलेस होण्याची गरज वाटत नाही. पुढे माहित नाही.

  माझा अनुभव मी लिहीला
  ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टमध्ये एक स्त्री म्हणून मला आलेला अनुभव मी लिहीला आहे. घरी असल्यावर आपण ब्रालेस फिरावं असं प्रत्येक तरुणीला, महिलेला वाटत असतं. मी अभिनेत्री असल्यानं त्यांच्यापेक्षा वेगळी आहे असं मुळीच नाही. प्रत्येकाला मनात वाटत असतं, पण कोणी बोलत नाही. मी फक्त ते बोललेय दुसरं काहीच नाही. सिनेसृष्टीत विविध विचारांची माणसं आहेत. ते नेहमीच काही ना काही बोलत असतात. मराठी इंडस्ट्रीतील लोकं काही एलियन्स नाहीत. तीसुद्धा माणसंच आहेत. त्यामुळं ते इतरांपेक्षा वेगळे नाहीत. इंडस्ट्रीमधले असो, बाहेरचे असो किंवा कोणीही असो बोलणारे बोलतच असतात.

  मला स्वातंत्र्य हवंय
  मी लिहिलेला विषय जेनेरीक आहे. मी याच इंडस्ट्रीतील आहे. मला स्वातंत्र्य हवंय या उद्देशानं मी ही पोस्ट लिहीलेली नाही. ही फार जेनरीक  गोष्ट आहे. ही माझ्या बहिणीची गोष्ट आहे, ही तुझी गोष्ट आहे, माझी गोष्ट आहे, ही माझ्याकडं काम करणाऱ्या बाईचीही गोष्ट आहे. त्यामुळं मला कोणी काही पर्सनलवर बोलल्यानं मी हे लिहिलंय असं मुळीच नाही. यावर कोणीतरी, कधीतरी बोलायला हवं होतं, जे मी बोलले. कारण हा त्रास असतो. या त्रासाविषयी आपण बोलायला हवं. हा काहीतरी स्टंट आहे, काँट्रोव्हर्सी करण्याचा प्रकार आहे, प्रायव्हेट गोष्टींवर चर्चा करायचीय म्हणून मी व्यक्त झालेली नाही. या गोष्टीचा त्रास होऊ शकतो.

  १० वर्षात चित्र बदललं ना…
  मानसिक, शारीरिक या गोष्टींकडेही बघायला हवं. आपण सर्वच गोष्टींवर बोलतो. आपल्याला बरं नसेल, तर मला अमूक होतंय, तमूक होतंय असं बोलतोच ना. मग या गोष्टीवर का बोलत नाही? लाज वाटते? लोकं काय म्हणतील? हा विचार येतो. ही लाज वगैरे लगेच जाणार नाही. उद्याच काही सर्व बदल होणार नाही. काही वर्षांपूर्वी ब्राचा कवेळ व्हाईट पट्टा दिसला तरी आपण काहीतरी भयानक दिसल्यासारखे वागायचो. मुलीसुद्धा याला अपवाद नाहीत. अनेकदा मुलीच मुलींना ब्राचा पट्टा दिसत असल्याचं सांगतात. जसं काही एखाद्याचा खून केला की काय इतकी भीती त्यांच्या मनात असते. आता ब्राचा पट्टा दाखवला जातो. ब्राच्या वेगवेगळ्या स्ट्राइप्स मिळतात. मागील १० वर्षांत हे चित्र बदललं ना. आता हेसुद्धा बदलेल, पण त्याची सुरुवात झाली पाहिजे.

  हेमांगीनं आपलं प्रांजळ मत मांडलं आहे. आजवर मी तिच्या बऱ्याच पोस्ट वाचल्या आहेत. यापूर्वी तिनं टॅायलेटबाबत लिहीलेली पोस्टही चर्चेचा विषय ठरली होती. आपला समाज अद्यापही अशा गोष्टी स्वीकारायला तयार नाही. आजही मानसिकता बदललेली नाही. याच कारणामुळं सोशल मीडियावर खूप सांभाळून लिहावं लागतं. बऱ्याचदा बचावात्मकच पोस्ट लिहावी लागते. लिहिणाऱ्याची मतं स्पष्ट असतात, पण इथं एक वर्ग तयार झाला आहे, जो आपण कितीही चांगलं मत व्यक्त केलं तरी तो त्याला विरोधच करतो. त्यामुळं हेमांगीनं मांडलेलं मत काहींना आवडलंय तर काहींना रुचलेलं नाही. माझ्या मते तिनं आपला प्रांजळपणा कायम ठेवावा.

  –  दिलीप ठाकूर (ज्येष्ठ सिनेपत्रकार)