मराठमोळ्या मृणाल ठाकूरची ‘तूफानी’ जर्नी!

केश ओमप्रकाश मेहरांच्या 'तूफान' या आगामी चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं 'नवराष्ट्र'शी बातचित करताना मृणालनं आपली 'तूफानी' जर्नी सांगितली.

  मृणाल ठाकूर नावाची एक मराठमोळी अभिनेत्री आज हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करत असल्याचा तमाम मराठी रसिकांना अभिमान आहे. राकेश ओमप्रकाश मेहरांच्या ‘तूफान’ या आगामी चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ‘नवराष्ट्र’शी बातचित करताना मृणालनं आपली ‘तूफानी’ जर्नी सांगितली.

  ‘मुझसे कुछ कहती है… ये खामोशीयां’ या मालिकेपासून सुरू झालेला मृणालचा प्रवास तिला ‘तूफान’सारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटापर्यंत घेऊन आला आहे. आपल्या या ‘तूफानी’ जर्नीबाबत मृणाल म्हणाली की, माझी आजवरची जर्नी खूप महत्त्वाची आहे. लोकांना असं वाटतं की तुमचे आऊटकम महत्त्वाचे असतात, पण माझा दृष्टिकोन वेगळा आहे. या प्रवासात काही असे चित्रपट होते जे मिळाले असते पण मिळाले नाहीत. टेलिव्हीजन ते मराठी चित्रपट, मराठी चित्रपट ते ‘लव्ह सोनिया’सारखा हॅालिवूडपट आणि पुढे बॅालिवूडपटांपर्यंतचा प्रवास खूप डिफिकल्ट होता, पण इम्पॅासिबल नव्हता. काही अॅक्टर्स स्वत:ला एका साच्यात बंदिस्त करतात. टीव्ही अॅक्टर असल्यानं आपल्याला बॅालिवूड किंवा हॅालिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळणार नाही असं मानणाऱ्या कलाकारांना मेसेज द्यायचा आहे की, तुम्हाला कोणी थांबवत नाही, तर तुम्ही स्वत: थांबत आहात. तुमच्या विचारसरणीमुळं तुमची गती मंदावते. लोखंडाला गंज लागते, तेव्हा स्वत:च स्वत:ला खातं. ‘तूफान’सारख्या चित्रपटासाठी थांबू नका. तुम्ही स्वत: तूफान बना. त्यामुळंच मला माझी ही जर्नी एकदमच ‘तूफानी’ असल्यासारखं वाटतं. कारण मी काही रिस्की डिसिजन्सही घेतले. तीन वर्षं घरीही बसले, पण आता नाही केलं तर कधीच करू शकणार नाही हे मला माहित होतं. वेळ निघून गेल्यावर मी पस्तावणार आणि पश्चातापाला माझ्या आयुष्यात कोणतीही जागा नाही. त्यामुळं डू आॅर डाय सिच्युएशनमध्ये मी चांगलं परफॅार्म करू शकले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

  ‘तूफान’मध्ये काम करण्याच्या अनुभवाबाबत मृणाल म्हणाली की, चित्रपटाच्या टायटलप्रमाणेच हा एकदम ‘तूफानी’ एक्सपिरीयन्स होता. चित्रपट रिलीजसाठी होणार असल्यानं थोडासा नर्व्हसनेस आहे. आम्ही जी एक्झाम दिली त्याचा रिझल्ट येणार असल्यानं थोडी धाकधूक आहे. लॅाकडाऊनमुळं हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊ शकत नसला तरी अॅमेझॅान प्राइम व्हिडीओ अग्रगण्य ओटीटीवर रिलीज होत असल्याचा आनंद आहे. हिंदीसोबतच इंग्रजीमध्येही प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी २४० देशांमध्ये हा चित्रपट रिलीज होणं ही एका अॅक्टरसाठी खूप मोठी अॅचिव्हमेंट आहे. या माध्यमातून ‘तूफान’ ग्लोबली रिलीज होणार आहे. नुकताच न्यूयॅार्कमध्ये टाईम्स स्क्वेअरमध्ये ‘तूफान’चं पोस्टर झळकलं आहे. तुमच्या मराठमोळ्या मृणालनं ‘तूफान’मध्ये अनन्या हे मराठमोळं कॅरेक्टर साकारलं आहे. लॅाकडाऊनच्या काळात आपण बऱ्याच आपल्यांना गमावलं आहे. या काळात पॅाझिटीव्ह कसं रहायचं हे शिकण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. काही समस्यांमुळं किंवा कारणांमुळं ज्यांनी आपली स्वप्नं अर्धवट सोडली त्यांच्या मनात हा चित्रपट स्वप्नं साकार करण्याची जिद्द निर्माण करेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

   

  डेडली कॅाम्बिनेशन
  फरहान आणि राकेशसरांचं डेडली कॅाम्बिनेशन यापूर्वी ‘भाग मिल्खा भाग’मध्ये पाहिलं आहे. यात त्यांच्या जोडीला परेश रावल आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव प्रगल्भ करणारा होता. कारण ते स्वत: एक इन्स्टिट्यूटच आहेत. तुम्ही कितीही अॅक्टींग स्कूलमध्ये जा, पण यांच्यासोबत जो एक्सपिरीयन्स मिळाला तो कुठेही मिळू शकणार नाही. सुप्रिया पाठक, हुसेन दलाल, विजयराज, डॅा. मोहन आगाशे हे सर्व दिग्गज कलाकार आहेत. यांच्यासोबत राहून माझी अॅक्टींग स्कील सुधारल्याचं मी म्हणेन. यात साकारलेल्या अनन्यानं मला खूप मोटिव्हेट केलं आहे. त्यामुळं ‘तूफान’ची जर्नी माझ्यासाठी स्पेशल आहे. राकेशसरांनी करियरच्या या टप्प्यावर संधी दिली, केवळ चारच चित्रपटांचा अनुभव असूनही जो विश्वास दाखवला, या चित्रपटाचा आत्मा असलेलं महत्त्वाचं कॅरेक्टर दिलं त्याबद्दल त्यांची आभारी आहे. फरहान-राकेशसरांचं बाँडींग खूप सायलेंट आहे. डोळ्यांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. इशाऱ्या इशाऱ्यामध्ये कधी बोलतात ते समजतही नाही. राकेशसर जेव्हा आम्हाला दिग्दर्शित करायचे, तेव्हा त्यांच्या केमिस्ट्रीची कल्पना यायची. दोघांचं अंडरस्टँडींगच खूप वेगळं आहे. क्रिएटीव्हली जेव्हा आम्ही सीन वाचून परफॅार्म करायचो, तेव्हा ज्या पद्धतीनं तो सीन एलिव्हेट व्हायचा ते पाहून माझ्या डोक्यात प्रश्न यायचा की मी तर हा विचारच केला नव्हता. हे लोकं कसं काय करतात?

  माझ्यासाठी बहिण मार्गदर्शक
  आयुष्यात बऱ्याचदा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणारे प्रसंग घडतात. यामुळं बरेच जण करियर सोडतात. अनन्या ही एक अशी मुलगी आहे, जी स्वत: डॅाक्टर आहे. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी राहूनही ती सरकारी रुग्णालयात काम करतेय. आपल्या व्यवसायाद्वारे लोकांना हिल करावं, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावं हा तिचा उद्देश आहे. आयुष्यात खूप घटना घडूनही ती खूप सकारात्मकतेनं वाटचाल करतेय. प्रत्येकाच्या जीवनात एक अशी व्यक्ती येते जी चुकीच्या मार्गावरून दिशा दाखवत योग्य मार्गदर्शन करते. माझ्यासाठी बहिण मार्गदर्शक आहे. तिनं नेहमीच सपोर्ट करत मला मार्गदर्शन केलं आहे. तशी ही अनन्या आहे. या चित्रपटात डॅाक्टरच्या भूमिकेत असल्यानं निडल आणि स्टीचेस करायचे होते. अज्जू जखमी झाल्यावर त्याला टाके घालायचे होते. त्यासाठी टाके घालायला शिकले. यासाठी थोडंसं कापलेलं केळं देऊन त्याला टाके घालायला सांगितले. ते तितकं ईझी मुळीच नव्हतं. केळ्यावर आणि स्कीनवर प्रयोग करणं या भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळं आता रिअल लाईफमध्ये जर असा एखादा प्रसंग आला आणि तिथे डॅाक्टर उपलब्ध नसतील तर मी थोडीफार मदत नक्कीच करू शकेन.

  दाखवून दे की तू काय आहेस…
  फरहानकडून एक गोष्ट शिकलेय. ते सेटवर यायचे तेव्हा स्वत:ला सरेंडर करून द्यायचे. स्वत:ला कधीही दिग्दर्शक समजायचे नसत. त्यामुळं ते एक उत्तम दिग्दर्शकही असल्याचं कधी मला जाणवलंही नाही. स्वत:ला ते दिग्दर्शकांच्या स्वाधीन करायचे. हे सर्वात महत्त्वाचं असतं. दिग्दर्शकावर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. ही महत्त्वाची गोष्ट फरहानकडून शिकले. अनन्या थोडी वीक वाटतेय किंवा मृणाल नर्व्हस झालीय असं वाटायचं, तेव्हा फरहान नेहमी सपोर्ट करायचे. फरहान नेहमी मला सांगायचे की, या संधीची तू खूप प्रतीक्षा केली आहेस. आता तुला संधी मिळालीय, तेव्हा दाखवून दे की तू काय आहेस… रील लाईफमध्ये अनन्या अज्जूला स्ट्रेन्थ देत असल्याचं तुम्ही पहाल, पण रिअल लाईफमध्ये फरहान मृणालला स्ट्रेन्थ देतात.

  डॅाक्टर, पोलीस व पत्रकारांना सॅल्यूट
  बॅटमॅन, स्पायडरमॅन किंवा क्रिष हे सुपरहिरो आपण पाहिले आहेत, पण मागील दीड वर्षांमध्ये डॅाक्टर्सच सुपरहिरोसारखं काम करत आहेत. मानवजातीला वाचवण्याच्या महान कार्यासाठी जगभरातील सर्व डॅाक्टरांना माझा सलाम… जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. ज्या डॅाक्टरांनी यात आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली. आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचं त्यांच्या कुटुंबियांना सांगायचंय. फ्रंटलाईन वर्कर असणं खूप अवघड आहे. अनन्या हे सांगेल की, स्वत:चे पर्सनल प्रॅाब्लेम विसरून डॅाक्टर लोकांचा जीव वाचवतात, नर्सेस, पोलीस, बँकर्स, महानगरपालिकेचे कर्मचारी, जर्नलिस्ट यांचीही आभारी आहे. न्यूज चांगली असो, वा वाईट जर्नलिस्टनी लॅाकडाऊनमध्येही आमच्यापर्यंत बातम्या पोहोचवल्या आहेत. मी काही जर्नलिस्ट मित्रांना गमावलं आहे. त्यांनाही खूप मोठा सॅल्यूट…

  …आणि योग जुळून आला
  २०१८ मध्ये ‘बाटला हाऊस’चं डबिंग सुरू असताना राकेशसरांनी माझ्याबाबत विचारण्यासाठी निखिलसरांना कॅाल केला होता. माझ्या टीमनंही फरहानला माझं नाव सजेस्ट केलं होतं. एक आठवड्यानंतर राकेशसरांना भेटले. त्यावेळी त्यांनी फिल्मसाठी भेटतोय वगैरे काही सांगितलं नाही. आमच्या फॅार्मल गप्पा झाल्या. ते ‘तूफान’साठी एक मुलगी शोधत असल्याचं आठवड्याभरानंतर समजलं. त्यानंतर नंदिनी आणि करण या कास्टिंग डायरेक्टर्सना भेटले. अनन्याच्या आॅडीशनसाठी मी पहिली मुलगी असल्याचं समजल्यावर मीच शेवटचीही असेन हे ठरवलं. या चित्रपटात काम करायला मी खूप उत्सुक होते. रोल कसाही असो, पण करायचा ठरवलं होतं. कारण या चित्रपटात काम करताना खूप शिकायला मिळणार होतं. राकेशसर आणि फरहानसोबत काम करायला मिळाल्यानं स्वत:ला लकी मानते. यात माझं एक गाणंही आहे.

  आता मॅानीटर पहात नाही
  राकेशसरांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकले. अॅक्टर म्हणून कशी दिसतेय, मेकअप-हेअर व्यवस्थित आहे ना, आऊटफिटस चांगले आहे ना हे पाहण्याची सवय सर्वांना असते. त्यामुळं प्रत्येक अॅक्टर शॅाट दिल्यावर मॅानिटरवर बघतात. शॅाट पाहून बऱ्याचदा डिस्ट्रॅक्ट होतात. राकेशसरांकडून मी हे शिकलेय, की दिग्दर्शक हा कॅप्टन आॅफ द शिप असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. जोपर्यंत तुम्ही सरेंडर करणार नाही, तोपर्यंत तुमच्या मनात प्रश्न येत राहणार. मॅानिटरवर जाऊन कधीही पहायचं नाही ही गोष्ट राकेशसरांकडून शिकले. तुम्ही चुकीचा शॅाट देणार नाही याची दिग्दर्शक, तर इतर डिपार्टमेंटस तुम्ही सुंदर दिसावे याची काळजी घेत असतात. राकेशसरांसोबत काम केल्यानंतर आता मी कधीच मेकअप आणि हेअरवर लक्ष देणार नाही, तर माझ्या परफॅार्मंसवर लक्ष केंद्रित करेन. राकेशसर वरवर खूप स्ट्रीक्ट दिसतात, पण आतून बोक्यासारखे सॅाफ्ट आहेत. त्यामुळं वास्तवातही मी त्यांना बोक्याच म्हणते.