
टेलिव्हिजन आणि नाटक या दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रिया मराठे ही नुकतीच झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रिया ही नचिकेतच्या आईच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहे. तिच्या याच नवीन भूमिकेबद्दल तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. तुमच्या या भूमिकेविषयी काय सांगाल? आईची भूमिका स्वीकारण्यामागे तुमची भावना काय होती?
मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत नचिकेतची आई इरावती देशपांडेची भूमिका साकारतेय. मी कधीही कुठली भूमिका स्वीकारताना त्या रोलला आणि त्या कॅरेक्टरला जास्त महत्व देते. मी याआधी देखील आईची भूमिका टेलिव्हिजनवर साकारली आहे, त्यामुळे आईचा रोल करणं हे मला कुठेच कमीपणाचं नाही वाटत. जर त्या भूमिकेचं कथेतील महत्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. मी कधीच कुठलीही भूमिका मला किती जास्त वेळ साकारायला मिळेल किंवा त्या व्यक्तिरेखेचं दिसणं कसं असेल याला जास्त महत्व दिलं नाही आहे. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल.
२. तुम्ही या भूमिकेसाठी काय तयारी केली?
इरा ही NRI आहे. ती लग्नानंतर ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे. ती एक मॉडर्न आई आहे आणि परदेशात राहिल्यामुळे तिची विचारसरणीदेखील मॉडर्न आहे. ती NRI असल्यामुळे तिची इंग्लिश बोलण्याची, शब्द उच्चारण्याची पद्धत वेगळी आहे. तसंच इरा ही खूप कॉन्फिडन्ट आहे त्यामुळे मी तिची भूमिका साकारत असताना माझ्या बॉडीलँग्वेजकडे ही खूप लक्ष देतेय.
View this post on Instagram
३. तुम्ही भूमिका स्वीकारताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष देता? व्यक्तिरेखेचं वय तुमच्यासाठी महत्वाचं आहे का?
भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्वाची आहे यांच्याकडे माझा लक्ष असतो. जर भूमिका खूप ताकदवर असेल तर व्यक्तिरेखेचं वय माझ्यासाठी महत्वाचं नसतं. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत मी साकारत असलेली इराची भूमिका मालिकेत खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे आणि या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली. मला स्वतःला असं वाटतं की टेलिव्हिजवरील एका आईची इमेज ही बदलली पाहिजे. माझ्या वयाच्या असलेल्या आई जेव्हा मी खऱ्या आयुष्यात पाहते तर त्या मॉडर्न असतात, मॉडर्न कपडे घालतात, त्यांना सगळं ठाऊक असतं, त्यांचं वागणं फारसं खूप मोठ्या माणसांसारखं नसतं, त्यांना बघून त्या २० वर्षाच्या मुलाची आई वाटत नाहीत आणि अशीच आई मी पडद्यावर साकारतेय.
View this post on Instagram
४. ही भूमिका साकारताना काय जास्त आव्हानात्मक वाटलं?
जसं मी आधी म्हंटल की मी भूमिकेच्या कथेतील स्थानाला जास्त महत्व देते. त्यामुळे मी या आधी अनेक प्रकारच्या आणि विविध शैलीतील भूमिका साकारल्या आहेत. पण ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण हा एक लाईटहार्टेड कॉमेडी ड्रम आहे. ही शैली मुळात खूप आव्हानात्मक आहे. मी अशाप्रकारच्या जॉनरमध्ये आधी जास्त काम केलं नाही आहे. यात अंगविक्षेप करून हसवण्यापेक्षा छोट्या छोट्या घटनांमधून विनोदनिर्मिती करून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं असतं. त्यामुळे ही भूमिका साकारताना मी माझे १०० टक्के देणार आहे.
View this post on Instagram
५. थिएटर आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमात सक्रिय आहेस, तुला कुठलं माध्यम जास्त आवडतं?
हा खूपच कठीण प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या आधी आमचं अ परफेक्ट मर्डर हे नाटक चालू होतं आता लवकरच आम्ही त्याचे प्रयोग पुन्हा सुरु करणार आहोत. नाटक करताना तुम्हाला प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्म करायला मिळतं, त्यांना प्रतिसाद तुम्हाला मिळतो. त्यामुळे थिएटरची नशाच वेगळी आहे पण टेलिव्हिजन या माध्यमात देखील मी भरपूर काम केलं आहे. मालिका करणं सुद्धा खूप आव्हानात्मक आहे. रोज तुमच्या व्यक्तिरेखेत काहीतरी नावीन्य दाखवणं, रोज वेगवेगळ्या प्रकारचे सिन शूट करणं, मालिकेत कधीही काहीही ट्विस्ट येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला कुठलाही बदल स्वीकारण्यासाठी नेहमी तयार राहावं लागतं. मला टीव्ही आणि थिएटर ही दोन्ही माध्यमं तितकीच आवडतात.