‘माझ्यासारखे पोरके व्हायचे नसेल तर कृपया…’ अभिनेत्री अश्विनी महांगडेने केली रूग्णालयाची पोलखोल!

वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने मांडली व्यथा म्हणाली जर आधी हे माहित असतं तर आज नाना गेले नसते...

  सध्याच्या कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. या काळात अनेक सेलिब्रिटींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनीही जीव गमावला आहे. मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने काहीच दिवसांपूर्वी कोरोनाने आपल्या वडिलांना गमावलं. याची बातमी तिने स्वतःच सोशल मीडियावर दिली होती. पण आता तिने रुग्णलायाचा हलगर्जीपणाही समोर आणला आहे. अश्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत खाजगी रुग्णालायांवर ताशेरे ओढले आहेत. तिने एक मोठी पोस्ट लिहीत आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

  अश्विनी म्हणते… वाई व पंचक्रोशील लोकांसाठी महत्वाचे…!

  पेशंट दगावला म्हणून तोडफोड करणे हा पेशा नाही आपला कारण वैद्यकीय सेवा देत असलेल्या प्रामाणिक लोकांचा आदर आहे. पण जे घडले आहे त्यावर व्यक्त व्हावे लागेल…

  नाना : माझ्या वडीलांना जाऊन १५ दिवस झाले. आम्ही पोरके झालो. आता व्यक्त व्हायला हवे कारण आमच्यासारखे आणखी कोणी पोरके होऊ नये हेच वाटतेय. जिथे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या मार्गाने मदत करत आहोत, कोरोना विरुद्ध जनजागृती करत आहोत, तिथे स्वतःच्या वडिलांची नीट काळजी घेणार नाही का ? नांनांचा रिपोर्ट पॅासीटीव्ह आला म्हणून त्याच काळजीपोटी आमचे जवळचे डॉक्टर यांनी आम्हाला वाई मधील *बाबर हॉस्पिटल* मध्ये जाण्यास सांगितले. अर्थात त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आम्ही नानांना बाबर हॉस्पिटल इथे उपचारासाठी तयार केले. जेव्हा नाना कोरोना पॅासिटीव्ह आले तेव्हाच आमच्या पायाखालची जमीन सरकली. पण भीती वर ताबा ठेवून आम्ही त्यांना *बाबर हॉस्पिटल, वाई* इथे त्यांच्या कोरोनाची लागण झाल्याच्या ४ थ्या दिवशी संध्याकाळी उपचारासाठी पाठवले. यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा HRCT स्कोर काहीच नव्हता  म्हणजेच त्यांना इन्फेकशन काहीच नव्हते मात्र शुगर ४०० कडे गेली होती. त्यांना भरती केले ते याच कारणासाठी.

  ४ थ्या दिवशी ज्या माणसाचा HRCT स्कोर झिरो येतो त्या माणसाचा ९ व्या दिवशी HRCT स्कोर २० कडे कसा काय जात असेल ? म्हणजे थोडक्यात डॉक्टर बाबर या नेमका सरकारचा कोणता प्रोटोकॉल अंमलात आणत होत्या ? कारण त्यांना जेव्हा केव्हा नानांच्या तब्बेतीबद्दल फोन केला तेव्हा त्यांनी मला हेच सांगितले की, सरकारच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही सगळे उपचार करत आहोत.(म्हणजे आता त्या म्हणतात यावर विश्वास ठेवावा तर सरकारला आपले प्रोटोकॉल बदलावे लागतील कारण त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करता HRCT स्कोर तर वाढतोय की)

   ६व्या दिवशी संध्याकाळी त्यांना ऑक्सिजन कमी होत असल्यामुळे ICU मध्ये हलवले आहे असे डॉक्टर बाबर मॅडम यांनी फोन वरून सांगितले. (याचा अर्थ इन्फेकशन वाढले का किंवा गोळ्या नीट देत आहेत का? उपचार नीट सुरू आहे का ? असे १०० प्रश्न सतत मनात येत होते ) ८ व्या दिवशी मला फोन वर त्यांनी असे सांगितले की त्यांचा HRCT तापसण्याससाठी गीतांजली हॉस्पिटल, वाई इथे बोलणे केलेय पण त्यांचे मशीन बंद आहे.( आणखी एक खोटे). मी उद्या वाई ला पोहोचतेय तर भेटूया या माझ्या प्रश्नावर ११.३० नंतर या मी राऊंड साठी तेव्हा खाली येते असे उत्तर मिळाले. ( माझे हात दगडाखाली आहेत याची जाणीव व्हायला लागली) भेटल्यावर ‘ मी घेऊन जाते HRCT साठी सातारा ला यावर हो जा असे उत्तर मिळाले. अर्थात त्यांनी तेव्हाच ठरवले असणार की आपण कमवायचे तेवढे कमवले आहेत आणि आता आणखी एक मृत्यू स्वतःच्या माथी घेण्यापेक्षा  हात वर केलेले बरे.

  निघण्या आधी त्यांच्या माणसांनी रीतसर पैसे भरायला सांगितले. माझ्या मनात येऊन गेले की उपचारासाठी परत इथेच येणार आहोत, आल्यावर भरू शकतो की, पण त्यांचे आधीच ठरल्याप्रमाणे आमच्याकडून पैसे घेतले गेले. ( बिल किती झाले हे अजूनही त्यांना विचारले नाही पण पैसे त्या पेक्षा जास्त घेतले असणारच. नानांचे सामान सुद्धा घ्यायला त्या हॉस्पिटल ची पायरी चढले नाही.)

  नानांचा HRCT स्कोर २० आला आणि या बाईंना फोन केला, अर्थात त्यांचे ठरले होते त्या प्रमाणे हात वर केले आणि त्यांना व्हेंटिलेटर लागेल तर आपल्याकडे नाही असे सांगून फोन ठेवला. ( नानांना भोर ला ऍडमिट केले तेव्हा सुद्धा व्हेंटिलेटरची गरज लागली नाही हे नमूद करणे गरजेचे आहे)  मला जे समजायचे ते समजून गेले होते. भोर ला शिफ्ट केले तेव्हा डॉ. बाबर मॅडम यांना तुम्ही नेमके काय उपचार केले ते पेपर पाठवा तसे इथे डॉक्टरांनां सांगता येईल यावर त्यांनी मला काहीही पाठवले नाही. आज जेव्हा नानांच्या जाण्याची कारणं शोधतोय तेव्हा त्यात *बाबर हॉस्पिटल आणि डॉ. बाबर हे दाम्पत्य* किती आणि नेमके कसे जबाबदार आहेत हे समजतंय. तसेच वाई मधील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आणि इतर राजकीय मंडळी हे सगळेच बाबर हॉस्पिटल बद्दल वाईट बोलत आहेत.( मी ही माहिती आधी का नाही काढली? यासाठी स्वतःचा राग येतोय आणि ज्यांनी मला या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले त्यांच्यावर एवढा आंधळा विश्वास का ठेवला मी? म्हणून संताप होतोय)

  माझ्या बऱ्याच जवळच्या पोलीस आणि वकिलांनी हेच सांगितले की केस करा. पण मला माहित आहे आज त्यांच्या लेटर पॅड वर लिहून पुरावे देऊन कायद्याच्या कचाट्यातून कसे बाहेर पडायचे हे यांना नवीन नाही. नाना उपचारासाठी दाखल झाल्यापासून त्यांच्यावर काय उपचार झाला? यातले आम्हाला काहीच माहीत नाही. ना आमच्यापैकी कोणी नानांना आत जाऊन भेटले. हे डॉक्टर नेमका काय उपचार करत आहेत हे सांगण्यासाठी ते बांधील नाहीत का? म्हणजे फक्त बिल भरण्यासाठी नातेवाईक गरजेचे आहेत. पण आपण  प्रश्न विचारला तर या डॉक्टरांचा इगो दुखावतो की यांना काय अक्कल आहे की हे आम्हाला प्रश्न विचारतात?

  मी *बाबर हॉस्पिटल आणि डॉ. बाबर दाम्पत्य* यांच्यावर केस करणार नाही पण *वाई आणि आजूबाजूच्या सर्व गावातील माझ्या तमाम बंधू- भगिनींना विनंती मात्र नक्की करेन की तुम्हाला माझ्यासारखे पोरके व्हायचे नसेल तर कृपया आपल्या नातेवाईकांना *बाबर हॉस्पिटल, वाई मध्ये उपचारासाठी पाठवू नका.*  कारण सरकारी प्रोटोकॉल या दोन अक्षरांच्या छताखाली हे लोक काय उपचार करतात हे त्यांचे त्यांना सुद्धा माहीत नसेल कदाचित आणि यांना पैसे कमवायचे आहेत फक्त.

  आजूबाजूला खाजगी हॉस्पिटल बद्दल हेच ऐकत आणि वाचत होते. पण हे माझ्या आयुष्यात घडेल असे कधीच वाटले नाही. या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आपले आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे साहेब यांना विचारायचा आहे की ज्या खाजगी हॉस्पिटल ला तुम्ही कोरोना सेंटर म्हणून पत्र देता त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहीतच धरता का ? मी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारचं.

  पेशंटवर कधी व कोणते उपचार सुरू आहेत याची माहीती घरच्यांनी जाणून घेणे हा गुन्हा आहे का.? असेच चालत राहीले तर यांना कोणीच जाब विचरणारे राहणार नाहीत. बाकी कागदोपत्री यांना पोसणारे सरकारी यंत्रणेतील मंडळी आहेतचं. यात शेवटी गोरगरीब व तोंड गप्प ठेवणाराचं भरडला जाणार.