‘या’ अभिनेत्रीची मुलगी बनली ‘मिस दादर’, कलाकार करतायत कौतुकाचा वर्षाव!

टियासोबत मिसेस दादर रिया परळकर आणि मिसेस दादर आजी म्हणून प्रज्ञा सबनीस विजेत्या ठरल्या. या स्पर्धेचं विशेष म्हणजे वय वर्ष सतरा ते वय वर्ष सत्तरपर्यंत अनेकजणींनी यात हिरहिरीनं सहभाग घेतला होता.

    गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही ‘मिस आणि मिसेस दादर’ ही स्पर्धा अंग्रेजी ढाबा या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडली. या स्पर्धेत टिया तळवलकर हिनं ‘मिस दादर’चा यावर्षीचा मान पटकावला आहे. टियाबाबत सांगायचं तर ही दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांची नात आणि सुलेखा तळवलकरची मुलगी आहे. टिया उत्तम होम शेफ असून, वयाच्या बाराव्या वर्षी शाळेत शिकत असतानाच तिनं होम शेफ म्हणून काम सुरू केलं आहे.

    टियासोबत मिसेस दादर रिया परळकर आणि मिसेस दादर आजी म्हणून प्रज्ञा सबनीस विजेत्या ठरल्या. या स्पर्धेचं विशेष म्हणजे वय वर्ष सतरा ते वय वर्ष सत्तरपर्यंत अनेकजणींनी यात हिरहिरीनं सहभाग घेतला होता. केवळ सौंदर्य किंवा फिगर नाही, तर एकूणच व्यक्तिमत्त्व, हुशारी, सभा चातुर्य, कलागुण आणि धडाडी या गुणांवर या स्पर्धेचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. डॉक्टर संदेश मयेकर, अर्चना नेवरेकर, संजय मोने, भारत अँड डोरिस, मेघना जाधव, यश सरदेसाई, अभिजित पानसे, कुणाल विजयकार, मेघा धाडे इत्यादी विविध क्षेत्रांतील मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थित होते.

    स्पर्धा आयोजक मनाली कामत यांनी सांगितलं की, या स्पर्धेमुळं विविध क्षेत्रांतील महिलांचं मनोबल उंचवण्यास आणि त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करण्यात मोठा हातभार लागतो असा अनुभव आहे. याच कारणामुळं महिलांनी अशा स्पर्धेत भाग घेणं खूप गरजेचं आहे.