‘बळी’ चित्रपटाचं पोस्टर बघून अंगावर आला काटा, चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली!

“बळी’च्या माध्यमातून आम्हाला नवीन प्रकार हाताळायला मिळतो आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. हॉरर चित्रपट म्हटला की विशाल फुरियापेक्षा आणखी चांगला पर्याय काय असू शकतो? त्यांचा ‘लपाछपी’ हा अलीकडच्या काळातील एक सर्वोत्तम हॉरर चित्रपट आहे.

  जीसिम्सची निर्मिती असलेल्या प्रस्तुतकर्ते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नवीन व बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. आधीच उत्तम अशी निर्मितीमुल्ये जपणाऱ्या टीमचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहिलेल्या ‘बळी’च्या या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.  ‘बळी’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे आहे. प्रेक्षकांचा लाडका स्टार स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत आहे.

  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर स्वप्निलचा अगदी घाबरवून टाकणाऱ्या अदेतील चेहरा आहे. अत्यंत रक्तरंजित अशा मनगटांनी त्याचा चेहरा घट्ट पकडला असून स्वप्निलच्या चेहऱ्यावर रक्ताचे लोट दिसत आहेत. ज्याच्या मनगटांमध्ये स्वप्निलचा चेहरा जखडला आहे, त्याचा चेहरा दिसत नसला तरी तो खूप भयावह आहे, हे जाणवते. स्वप्निलच्या डोळ्यांतील अंगार हे पोस्टर पाहणाऱ्याच्या काळजात धडकी भरविल्याशिवाय राहत नाही. त्यातच या पोस्टरवरील ‘कोण आहे एलिझाबेथ?’ हा प्रश्न आणखी अनेकानेक प्रश्न निर्माण करतो.

  हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर घेवून येतोय, याची खुणगाठ बांधण्यासाठी हे पोस्टर पुरेसे ठरते. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-२’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

  या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, “लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिसादाला दाद म्हणून मी मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवित राहायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.”

  ते पुढे म्हणतात, “अर्जुन आणि कार्तिक यांच्यासारखे उत्तम निर्माते या माझ्या दुसऱ्या हॉरर चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटासाठी मला स्वप्निलसारखा स्टार मिळाला आहे. त्याला मराठी प्रेक्षकांकडून नेहमीच चांगले प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते की, एक अभिनेता म्हणून स्वप्निलची प्रतिभा आतापर्यंत म्हणावी तशी वापरली गेली नाही. त्याला भेटल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की, तो या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. त्याशिवाय तो एक स्टार आहे आणि त्यामुळे आमचा हा चित्रपट सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला मदतसुद्धा होईल. ‘बळी’ हा ‘लपाछपी’पेक्षाही अधिक भीतीदायक आणि थ्रिलिंग असेल, अशी हमी मी प्रेक्षकांना देवू शकतो.”

  या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”

  तो पुढे म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”

  त्याशिवाय मराठी चित्रपटक्षेत्रातील एक सर्वोत्तम नट स्वप्निल जोशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्यासाठीसुद्धा वेगळा प्रकार हाताळण्याची ही एक संधी होती,” असे उद्गार निर्माते आणि जीसिम्सचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.