mayuri deshmukh

अभिनेत्री मयुरू देशमुखही शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर अस्वस्थ झालीये. मयुरीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी सोमवारी सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकार सोशल मीडियावर व्यक्त झाले. अभिनेत्री मयुरू देशमुखही शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर अस्वस्थ झालीये. मयुरीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मयुरीचा पती आशुतोष भाकरेयाने नैराश्यातून आत्महत्येचं पाऊल उचललं होतं. त्यामुळे शितल यांच्या आत्महत्येमुळे मयुरी मनमोकळेपणाने व्यक्त झालीये.

 

मयुरी म्हणते…

शीतल आमटे यांच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ झालेय. शीतल आमटे यांनी काही आठवड्यांपूर्वी मला फेसबुकवर मेसेज केला होता. त्यांनी मला खूप धीर दिला. माझा नंबर घेतला आणि माझ्यामागे त्या खंबीरपणे उभ्या आहेत असही मला सांगितलं. आमची अजिबात ओळख नसतानाही त्यांनी माझ्यासाठी सर्वकाही केलं. दुसरे म्हणजे काही महिन्यांपूर्वी ताईंचा एक व्हिडिओ मी पाहिला होता. तो व्हिडिओ मी आशूलाही दाखवला होता. आम्हा दोघांनाही त्यांच खूप कौतुक वाटलं होतं.

शीतल आमटेंच्या जाण्याने मला खूप त्रास होतोय. मला माहित नाही माझी मतं बरोबर आहेत की चुकीची पण आज मी त्याबद्दल नक्की बोलेन. एक समाज म्हणून आपण ताकद आणि सहनशीलता या व्याख्यांना खूप चुकीच्या पद्धतीने मांडलंय. मुलांनी रडलं नाही पाहिजे, सगळी संकटं एकट्याने पेलली पाहिजेत, समाजातल्या मोठ्या व्यक्तींवरही हा भार आपण टाकतो. पण ते बदलणं खूप गरजेचं आहे. अशी बुरसटलेली व्याख्या आपल्यासाठीच घातक ठरतेय.

आशुतोष गेल्यानंतर मी खूप रडले…

आशुतोष गेल्यानंतर मला अनेकांनी मेसेज केले की तू खूप धीरानं घेतलसं.पण मी तर रोज रडतेय, रोज मला त्रास होतोय. मग मी स्ट्राँग कशी? पण मी माझ्या जवळच्या व्यक्तींना माझ्या मनातलं सर्वकाही सांगतेय. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा तरी असा व्यक्ती असावा, की ज्याला आपण कसलाही विचार न करता सर्वकाही सांगू शकतो. शेअर करणं सध्या खूप गरजेचं आहे. शेअर न केल्यास त्या गोष्टी मनात साचून राहतात आणि नंतर वाटच सापडत नाही. कुणाचीही मदत मागण्यात काही चुकीचं नाही. यात स्वाभिमान कुठेच मध्ये येत नाही. सोशल मीडियावरील ९९ टक्के मी लोकांना ओळखत नाही. पण सगळ्यांनी असंख्य मेसेज केले. तीच ऊर्जा घेऊन मी पुन्हा काम करतेय. पण समाज म्हणून आपण काही बदल केले तर असे मौल्यवान जीव भविष्यात गमावणार नाही.”