दानिशला आजोबांकडून मिळालं गायनाचं वरदान!

'इंडियन आयडॉल'चा ग्रँड फिनाले पर्यंत पोहचलेला मोहम्मद दानिशनं सर्वांनाच आपल्या गायकीनं प्रभावित केलं आहे. त्याच दानिशनं 'नवराष्ट्र'शी केलेली खास बातचित...

    देशाच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या उदयोन्मुख गायकांचं हक्काचं व्यासपीठ असलेला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवरील ‘इंडियन आयडॉल’चं बारावं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे.  लवकरच  ‘इंडियन आयडॉल’चा ग्रँड फिनाले होणार आहे. शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या सहा स्पर्धकांमध्ये असलेल्या मोहम्मद दानिशनं सर्वांनाच आपल्या गायकीनं प्रभावित केलं आहे. त्याच दानिशनं ‘नवराष्ट्र’शी केलेली खास बातचित…

    ‘इंडियन आयडॉल’ यां मंचानं जसं मोठ्या शहरांतील स्पर्धकांना संधी दिली, तशीच लहान शहरांमधील कलाकारांनाही वाव दिला. मुजफ्फरनगरसारख्या लहानशा शहरातून आलेल्या दानिशच्या पाठीलर संगीतक्षेत्रातील जवळपास सर्वच दिग्गजांनी कौतुकाची थाप मारली आहे. ‘इंडियन आयडॉल’मध्ये येण्याच्या अनुभबाबाबत दानिश म्हणाला की, ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावरून गाण्याचा अनुभव कमालीचा आहे. आजवर पाहिलेली सर्व स्वप्न या मंचावरून साकार होत आहेत. लोकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. इथं आल्यामुळं माझ्यात खूप डेव्हलपमेंट झाली. बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आजवरच्या आठ-नऊ महिन्यांच्या प्रवासात खू गोष्टी शिकलो ज्याचा भविष्यात फायदा होईल. प्रत्येक पावलावर काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळत आहे. मग ती गायनाबाबत असो, वा व्यक्तिमत्त्वाबाबत… परीक्षक तर आम्हाला नेहमी शिकवतच असतात, पण इथं येणाऱ्या गेस्टचं मार्गदर्शनही खूप मोलाचं ठरत आहे. आज ‘इंडियन आयडॉल’ हे आमचं एक कुटुंब बनलं आहे. त्यामुळं मी म्हणेन माझ्यासाठी हा लाईफ चेंजिंग एक्सपिरीयन्स किंवा गोल्डन अनुभव आहे. लुकवाईज माझ्यात जास्त बदल झाले नाहीत. पूर्वी जसा असायचो तसाच इथंही आहे. त्यामुळं लुकमध्ये फार बदल झाल्याचं भासत नाही.

    घरीच संगीताचा वारसा असल्यानं दानिशला बालपणीच संगीताचं बाळकडू पाजलं गेलं आहे. याबाबत तो म्हणाला की, मी संगीतातील नामवंत किराणा घराण्यातील गायक आहे. खरं तर माझ्या घराण्यातच म्युझिक आहे. बालपणी जेव्हा मला समजायला लागलं तेव्हापासून मी माझे मोठे आजोबा उस्ताद इक्बाल सोनी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेऊ लागलो. माझे आजोबा अकबाल खानसाहब यांच्याकडून स्टेज परफॅार्मंस शिकलो, तर आईचे वडील आजोबा उस्ताद ईर्शाद अहमद वारसी यांच्याकडूनही क्लासिकल गाणं शिकलो आहे. माझं बालपण मुजफ्फरनगरमध्येच गेलं असून, मी कधीपासून गातोय हे मलाच ठाऊक नाही. घरातच संगीताचा वारसा असल्यानं जेव्हापासून बोलायला सुरुवात केली, तेव्हापासूनच अनाहुतपणं गायनाचं बाळकडू पाजलं गेलं असावं. बालपणी जेव्हा घरी आजोबांचे शिष्य रियाज करण्यासाठी यायचो, तेव्हा मी त्यांच्यासोबत बसायचो आणि गायचो. त्यामुळं मी गाणं नेमकं कोणत्या वयात सुरू केलं हे मलाही ठाऊक नाही. बालपणी शाळेतील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ लागलो आणि तिथून उत्साह वाढत गेला. आज मी ज्याप्रकारे परफॅार्म करतोय, ते पाहून कुटुंबातील सर्व खूप खुश आहेत. दानिशनं आयुष्यात काहीतरी करावं, आपलं नाव कमवावं हे कुटुंबातील सर्वांचं स्वप्न होतं. ते साकार होत असल्यानं त्यांना खूप बरं वाटत आहे.

    इथं येण्यापूर्वी शो करायचो
    ‘इंडियन आयडॉल’मध्ये येण्यापूर्वी इव्हेन्टस आणि शोज करायचो, पण माझी स्वत:ची ओळख नव्हती. राज्यस्तरावरील लहानसहान स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. बरेच लहान-मोठे कार्यक्रम केले आहेत. एक दिवस ‘इंडियन आयडॉल’चे आॅडीशन्स सुरू असल्याची माहिती मिळाली. आॅडीशन दिल्यानंतर प्रत्येक स्टेजवर सिलेक्ट होत गेलो आणि इंडियन आयडॅालच्या मंचावर आल्यावर माझं आयुष्य नक्कीच बदलून गेलं आहे. आॅडीशन दिली तेव्हा आपण फायनलपर्यंत मजल मारू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्रत्येक वेळी समोर येणारी स्टेज पार करत गेलो आणि छान गाणं सादर करत राहिलो. मी या शोसाठी सिलेक्ट होईन की नाही याचीही मला शश्वती नव्हती. या शोनं माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संपूर्ण टीमचा आभारी आहे. ही देशपातळीवरील स्पर्धा आहे. इथं कमालीचं गायन करणारे स्पर्धक संपूर्ण देशातून येतात. त्यातून आपलं सिलेक्शन होणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.

    … आणि डोळ्यांतून अश्रू ओघळतात
    खरं सांगायचं तर समोर गाणारा कोणीही असला तरी मी त्या गाण्याशी कनेक्ट होतो. कोणत्याही गाण्यात मी डुबून जातो. एखादं सॅड गाणं गाताना मी ते फिल करतो. डान्सचं गाणं असेल तर त्यात मी मस्तीही करतो. गाणं गाणारा जोपर्यंत गाण्याशी कनेक्ट होत नाही, तोपर्यंत ती मजा येत नाही. गाण्याशी कनेक्ट झाल्यानंतर स्वत:लाही गाणं गाताना मजा येते. एखादं गाणं माझ्या मनाला भिडतं, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अनाहुतपणे अश्रू ओघळू लागतात. जेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू येतात तेव्हा ते गाणं माझ्या मनाला भिडलेलं असतं. मला हार्मोनियम, किबोर्ड, पियानो, गिटार ही वाद्यं वाजवता येतात.

    कोणाची कॅापी करत नाही
    माझा एक गाण्याचा वेगळा झोन आहे. मी कोणाचीही कॅापी करत नाही. आपल्याच शैलीत गातो. त्यामुळं माझा आवाज खूप वेगळा असल्याचं बोललं जातं. माझा आवाज किंवा व्हॅाईस टेक्चर कोणाशीच मिळत नाही. मला सुखविंदर सिंग यांचं गाणं आवडतं. त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करतो. कायम डोक्यात तेच विचार सुरू असतात. सुखविंदर स्वत: म्हणाले की, तुझ्या आवाजात खांसाहेबांची झलक आहे. त्यांची गायकी आणखी ऐकत जा, असं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले म्हणाल्या की, माझा आवाज खूप बुलंद आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तरसाहेब आले होते. ते म्हणाले की, तुझा आवाज सुफियाना शैलीतील असून, दमदार आहे. आनंदजीभाई आले होते तेव्हा मी त्यांचंच सॅड गाणं गायलं होतं. त्यांनीही माझ्या गाण्याचं कौतुक केलं. मी गायलेलं मोहम्मद रफीसाहेबांचं गाणं खूप आवडलं होतं. तू फक्त सूफीच गात नाहीस, तर प्रत्येक प्रकारचे जॅानर गातोस ही खूप चांगली गोष्ट असल्याचं म्हणत त्यांनी उत्साह वाढवला.

    स्टार दडल्याचं रेखा म्हणाल्या
    रेखा आल्या त्या एपिसोडला आम्ही सर्वांनी धमाल केली. त्या मला म्हणाल्या की, मुझ्या आत एक स्टार दडला आहे. त्यांना माझं गाणं खूप भावलं होतं. सर्व परीक्षकांनी नेहमीच चांगले-वाईट गुण दाखवत परीक्षण केलं आहे. मी जर चांगलं केलं तर त्याचं कौतुक केलं आहे. जिथे चुकलो तिथे त्यांनी समजावून सांगितलं आहे. सर्वच जज नेहमी उत्साह वाढवतात. तू ठरवलंच तर काहीही करू शकतोस असं त्यांचं म्हणणं आहे. विशाल ददलानींपासून, अन्नू मलिक, नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, सोनू कक्कर या सर्वच जजेसनी पावलोपावली केलेल्या मार्गदर्शनाच्याच बळावर इथवर पोहोचलो आहे. हिमेशसरांसोबत गाणं करण्याचा अनुभव खूप मोठा आहे. या शोमध्ये असतानाच हिमेशसरांसोबत माझं गाणं येईल याचा कधी विचारही केला नव्हता. हे गाणं रसिकांना इतकं भावलं की, एका दिवसात त्याचे १२ मिलियन्स व्ह्यूजही झाले. इतक्या मोठ्या लिजेंडसोबत काम करण्याची संधी मिळाल्याची भावना मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सोनूमॅडम खूप सपोर्टीव्ह आहेत. अन्नूसर नेहमी इनकरेज करतात.

    कलंदर गायकांची टीम
    मूळात ही स्पर्धाच असल्याचं वाटत नाही. ही एक फॅमिली आहे. त्यामुळं इथून कोणी जातं, तेव्हा खूप दु:ख होतं. कोणीही गेलं तरी वाईट वाटतं. सर्वांसोबत इतकं चांगलं बाँडींग जमल्यानं कोणी जाऊच नये असं वाटतं. एकत्र रहातो, मिळूनच रियाज करतो, एकमेकांसोबतच जेवतो. त्यामुळं एका कुटुंबाची भावना रुजली आहे. इथं आलेले सर्वजण व्हर्सेटाईल आहेत. शन्मुखप्रिया केवळ वेस्टर्नच गात नाही, तर तिला सर्व जॅानर्स येतात. नुकतंच तिनं गायलेलं क्लासिकल गाणं खूप छान झालं होतं. तिच्याकडून क्लासिकल गाण्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. यावेळी खूप कलंदर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळं प्रत्येकाला संगीताच्या सर्व प्रकारांबाबत ठाऊक आहे.

    इंडस्ट्रीसोबतच रहायचंय
    लोकांना इतकंच सांगायचंय की, तुम्हाला जर माझं गाणं आवडत असेल तर मला विजयी करण्यासाठी वोट करा हीच माझी विनंती आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाची पावती वोट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. जेणेकरून भविष्यातही आणखी सुंदर गीतरचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची नवी उर्मी येईल. आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचा आभारी आहे. या शोचा रिझल्ट काहीही लागो, पण भविष्यात मी संगीताचीच सेवा करणार आहे. मला इंडस्ट्रीसोबत काम करायचं आहे. आता इथं आल्यावर परत जायचंच नाही. या इंडस्ट्रीतील दिग्गजांसोबत काम करण्याचं स्वप्न कधी साकार होतात ते पहायचं आहे. एक सिंगल आलं. आता पुढेही बरीच गाणी आणि सिंगल्स येतील. भविष्यात मला गायनावर खूप फोकस करायचा आहे.